सनातन संस्थेवर बंदी घाला या खासदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सनातन संस्थेकडून महाराष्ट्रात दहशतवाद पसरवला जात असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात देखील या संस्थेचा सहभाग आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे खासदार हुसने दलवाई यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे ही मागणी केली आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेकडून हे शक्य होईल का, या प्रश्नावर शिवसेनेने कधीही सनातन संस्थेला पाठींबा दिलेला नाही त्यामुळे हे नक्कीच शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात आता पुरोगामी विचारांचे सरकार आले असून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात चूक केली होती. मात्र, हे सरकार महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी अशा संस्थांवर बंदी घालण्याबाबत विचार करेल. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांमागे सुत्रधार कोण आहेत याचा शोधही सरकारने घेतला पाहिजे, असे दलवाई म्हणाले आहेत.
भीमा कोरेगाव प्रकरणात काही लोकांना विनाकारण गोवण्यात आले आहे. या हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग होता. हे दोघेही दहशतवाद पसरवत आहेत त्यामुळे नव्या सरकारने यांच्याबाबतही भुमिका घ्यावी. सांगलीतील दंगलीच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंच्या बाजूने भुमिका घेतली होती. तशी भुमिका त्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणात घेऊ नये असे आपण त्यांना सांगणार आहोत. या लोकांना एकदा अद्दल घडली पाहीजे, असेही दलवाई पुढे म्हणाले.