रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (20:53 IST)

MPSC परीक्षेत 3 मोठे बदल, परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये बदल,एमपीएससीनं पत्रक जारी केलं

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एमपीएससीनं या संदर्भात पत्रक जारी केलं आहे.
 
आता,राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
 
या पत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात 3 बदल करण्यात आले आहेत.
 
1. आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.
 
2. सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
 
3. तसेच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.
 
राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
 
पूर्व परीक्षेतील बदल
राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक 2 सी-सॅट अर्हताकारी करण्यात आला आहे. नवीन बदलाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपासून केली जाणार आहे.
 
राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन अर्थात सी-सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती.
 
या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सी-सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला.
 
या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारसीही एमपीएससीने स्वीकारल्या आहेत.