मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (08:42 IST)

Bihar report बिहारचा अहवाल पाहून जातनिहाय सर्व्हेक्षणाबाबत निर्णय

devendra fadnavis
Decision regarding caste wise survey : बिहारच्या नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही या मागणीने उचल घेतली आहे. विरोधकांबरोबरच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
 
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बिहार सरकारने अद्याप संपूर्ण अहवाल जाहीर केलेला नाही. संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्याची अचूकता पडताळून जातनिहाय सर्व्हेक्षण करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी घेतील, असे सांगितले. ओबीसी सर्व्हेक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मकच आहे. त्याबाबत आम्ही कधीच नकारात्मक भूमिका घेतलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
बिहारच्या जातनिहाय जनगणनेबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसींसंदर्भात बिहार सरकारची काही आकडेवारी बाहेर येत आहे. त्यांनी अद्याप संपूर्ण अहवाल जाहीर केलेला नाही. तो संपूर्ण अहवाल आल्यानंतर आम्ही तो पाहू. त्याची अचूकता किती आहे हे पडताळून पाहू. बिहारने जी पद्धत अवलंबली तीच अवलंबायची की अन्य पद्धतीने सर्व्हेक्षण करायचे याचा निर्णय घ्यावा लागेल. बिहार वगळता अन्य कोणत्याही राज्याने अगदी काँग्रेसप्रणित राज्यातही या संदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ओबीसी सर्व्हेक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकच आहे. आम्ही त्या बाबत कधीच विरोधी भूमिका घेतलेली नाही. सर्व्हेक्षणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य वेळी घेतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले