सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 12 जून 2021 (08:27 IST)

एकविरा देवीचे मंदिर आणि किल्ले राजगडावर जाण्यासाठी रोप-वे तयार होणार

एकविरा देवीचे मंदिर आणि किल्ले राजगडावर जाण्यासाठी रोप-वे तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय पोर्ट रेल आणि रोप-वे महामंडळासोबत पर्यटन संचलनालयाने सामंजस्य करार केला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर सह्या करण्यात आल्या.
 
रोप-वे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी हा करार करण्यात आला. राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला. हे दोन्ही रोप-वे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याची योजना आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल.
शुक्रवारी करण्यात आलेले दोन्ही सामंजस्य करार राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत. एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याची शक्तीपीठ, भक्तीपीठ आहेत. या ठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. भारतीय पोर्ट रेल आणि रोप-वे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करून पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.