रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात पावसाचे पुनरागमन

पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत विस्तारित असल्याने पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच आगामी चोवीस तासात कोकण व गोव्याच्या काही भागात मुसळधार तर राज्यात अनेक भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 
तळकोकणात गेल्या दोन दिवसापासून धुवाधर पाऊस कोसळत असून करूळ घाटात दरड कोसळली. गगनबावड्यापासून 2 किमी अंतरावर ही दरड कोसळली. भुईबावडा घाटातही पतझड सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
मुंबई व कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पुढील 24 तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. मुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल. चार दिवसानंतर म्हणजे गुरूवारनंतर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.