रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:26 IST)

नरेंद्र मोदींचे विचार माझ्या बुद्धीला पटतात: अजित पवार

ajit pawar
‘अलीकडच्या काळात माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पटत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 24 तास कार्यरत असणारा दुसरा कोणताही राष्ट्रीय नेता सध्या दिसत नाही’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत शरद पवाराविषयी केलेले वादग्रस्त विधान आपल्याला ऐकू आले नसल्याचेही स्पष्ट केले. अजित पवार हे 28 ऑगस्ट रोजी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
 
काय म्हणाले अजित पवार..?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 24 तास कार्यरत असणारा दुसरा कोणताही राष्ट्रीय नेता सध्या दिसत नाही. विकासाच्या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यातूनच त्यांनी अर्थव्यवस्था बळकट करणे, रस्त्यांचे जाळे उभारणे, रेल्वे – मेट्रोची कामे जलदगतीने करणे आदी ठोस निर्णय त्यांनी घेतलेत. यामुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी मी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडच्या काळात माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पटत आहेत.
 
मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील सभेत शरद पवार यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य मला ठळकपणे ऐकू आले नाही. पण त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ही गोष्ट समजली. या प्रकरणी माझे भुजबळ यांच्याशी बोलणे झाले नाही.
 
राजकारणात वेगवेगळे मत प्रवाह असले तरी, आपल्या राज्याची राजकारण करण्याची व कामाची पद्धत वेगळी आहे. सध्या अनेक राजकारणी जगभरातील सर्व प्राण्यांच्या नावाचा वापर करून उपरोधिक टीका करतात. त्यांनी ते शब्द जपून वापरावेत. सर्व पक्षातील नेत्यांनी अशाप्रकारे एकमेकांवरील टीका थांबवली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor