शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 27 जून 2022 (20:44 IST)

आमची तुर्तास व्हेट अॅन्ड वॉचची भूमिका – सुधीर मुनगंटीवार

sudhir manguttiwar
सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर भाजपचं बारीक लक्ष आहे. आम्ही शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांना बंडखोर समजत नाही. शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर आमची कोअर टीम त्यावर निर्णय घेईल. एकनाथ शिंदेकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय.
 
मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपच्या आमदारांना राज्य किंवा देशाबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
 
"कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत भाजपच्या कोअर टीममध्ये चर्चा झाली. सध्या आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची गरज वाटत नाही. आम्ही व्हेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत," असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
अडीच वर्षे आम्ही फक्त नावालाच राज्यमंत्री होतो - शंभूराजे देसाई
गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो, आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही, असं मत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं आहे.
 
"राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही," असंही देसाई म्हणाले आहेत.
 
ते पुढे म्हणाले, "नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधानपरिषदेत घोषणा केली होती. यासाठी 5 कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
 
"मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत."
 
"आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा. म्हणूनच एक स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला," असंही देसाई म्हणाले.
 
फ्लोअर टेस्टविषयी आदित्य ठाकरे म्हणतात...
"सध्याच्या राजकीय लढाईत आम्हीच जिंकू हा विश्वास. जे दगाफटका करतात, पळून जातात ते कधीच जिंकत नाही," असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "फ्लोअर टेस्टसाठी ते (बंडखोर आमदार) तयार आहेत की नाही हा प्रश्न आहे. आमची फ्लोअर टेस्ट काय आहे ते आम्ही सांगितलं आहे. फ्लोअर टेस्टपेक्षा जे पळून गेले, ज्यांना फसवलं गेलंय ते आमच्या संपर्कात आहे. ज्यांनी दगाफटका केलाय त्यांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं, की आम्ही काय चुकीचं केलं? हीच आमची फ्लोअर टेस्ट आहे."
 
तुमच्या संपर्कात किती आमदार आहे, असं विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "ते तुम्हाला माहिती आहे."
 
उदय सामंत कधी ना कधी समोर येतील, तेव्हा त्यांना डोळ्यात डोळे घालून बोलावं लागेल, असंही ते म्हणाले.
 
ईडीनं संजय राऊत यांना समन्स बजावलंय, यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "हे राजकारण नाही तर सर्कशीचा खेळ झालाय."