शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (08:54 IST)

रत्नागिरी : दरडप्रवण 47 गावांमधील 2 हजार 177 ग्रामस्थांचे स्थलांतर

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील व पूरप्रवण क्षेत्रातील तब्बल 2 हजार 177 नागरिकांचे जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता एकूण 181 गावं ही दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

या परिसरात वाढणारा पावसाचा जोर पाहून गावातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याबाबतच्या सूचना संबंधित महसूल विभागांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे पत्रकार परिषदेत बोलत होते. जुलै महिन्यातील 18 व 19 या तारखेला जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 200 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस बरसला होता. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी व चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी या दोन्ही नद्या इशारा पातळीच्यावरुन वाहत होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले होते.

तसेच आता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे कोसळलेल्या दरडीच्या घटनेनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रांची यादी करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेनुसार रत्नागिरी जिह्यात 123 गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आणखी काही गावे यात समाविष्ठ करण्यात आली आहेत. त्यानुसार आता 181 गावे ही दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्येही वर्गवारी करुन अतिसंवेदनशील तसेच तुलनेने कमी संवेदनशील असे गावांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

दरड प्रवणक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्येही वर्ग-1 म्हणजे अतिसंवेदनशील गावांमध्ये 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर वर्ग-2 मध्ये 13, वर्ग-3 मध्ये 79 आणि वर्ग-4 मध्ये 46 गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या 181 गावांपैकी 23 गावांतील 571 कुटुंबांतील 1 हजार 700 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पूरप्रवण क्षेत्रातील 50 गावांपैकी 24 गावांतील 477 ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 9 मुख्य धरणे 100 टक्क्यापर्यंत भरली आहेत. तर उर्वरित धरणे 70 टक्के भरल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच पावसाचा वाढता जोर बघता या धरणांची पाणीपातळी तसेच विसर्ग याकडे वेळोवेळी लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Edited By- Ratnadeep Ranshoor