शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (16:50 IST)

समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणाऱ्या सरकारने राज्यात इकडे लक्ष द्या - शिवसेना

शिवसेना मुखपत्र सामना मधून सरकारच्या अपयशावर जोरदार हल्ला केला असून. दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची ट्रीप नेतांना झालेल्या भीषण अपघातात ३३ ठार झाले आहे. यावर सरकार कधी जागे होणार आहे अशी विचारणा शिवसेना करत आहे. समृद्धी महामार्गाचा हट्ट धरताय मात्र दरी खोरयात असलेल्या आपल्या राज्यातील प्रवास करत असेल्या लाखो प्रवासी वर्गाची आधी काळजी घ्या, जे आहेत ते रस्ते आधी बनवा मग पुढील प्रगती करा. सध्या राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ,समाजात तेढ आणि मानसिक खच्चीकरण सुरु आहे. सरकार काय करतय असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचा अग्रलेखात काय भूमिका मांडली आहे.
 
हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे. अपघात हा अपघात असतो आणि मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी दापोलीच्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मात्र असे प्रसंग सरकारवर रोज येणे चांगले नाही. सध्या चाणक्यसूत्रांचा जोर राजकारणात वाढला आहे, पण युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत असतो. हे पाप राजाच्या डोक्यावरच असते असेही कुठेतरी चाणक्याने लिहून ठेवले आहे काय? चाणक्य असेही सांगतो… हिंदुस्थानात सर्वाधिक बळी रस्त्यांवरच जात आहेत. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होत असतात व अपघातांतील मृतांचे आकडे पाहून आपण फक्त हळहळत असतो. दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस दरीत कोसळली व ३० जणांचा त्यात मृत्यू झाला ही बातमी मन विषण्ण करणारी आहे. या अपघातामुळे फक्त कोकणवासीयच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दापोली कृषी विद्यापीठ हे देशातील एक सक्षम आणि संशोधन कार्यात क्रांती करणारे विद्यापीठ आहे. राज्यभरातले विद्यार्थी येथे कृषी पदवीधारक होण्यासाठी येतात व राज्यभरातील अनेक शिक्षक, प्राध्यापक, संशोधक येथे ज्ञानदानाचे काम करतात. ज्या ३० लोकांवर काळाने झडप घातली त्यात हे असेच अनेक जण होते. राज्यात हिरवळ फुलवणारे, धान्य, फुले, फळे, भाज्यांत नवे शोध लावणारे हे कोकण कृषी विद्यापीठ आता जणू उजाड झाले आहे. एकाच संस्थेतील हे सामुदायिक मृत्युकांड महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला पाच पावले मागे ढकलणारे आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण तसे बरे नाही. हत्या, आत्महत्या व रस्त्यांवरील हिंसाचाराचा भडका उडाला आहे. जनतेचे मन स्थिर नाही व महाराष्ट्र एका रहस्यमय सावटाखाली जगतो आहे. राजकारणात कोणताही विषय चालतो, पण पोलादपूर – महाबळेश्वरदरम्यान आंबेनळी घाटात बस कोसळून एकाच वेळी ३० जण मृत्यू पावतात हे तितकेच गंभीर आहे. आंबेनळी घाटातील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली हे सांगितले जाते, पण महाराष्ट्राचा प्रवास हा दर्‍याखोर्‍या आणि कडेकपारीतूनच आहे. समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.