1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पंढरपूर , मंगळवार, 2 जून 2020 (12:44 IST)

श्री विठ्ठल मंदिर 30 जूनपर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला तर राज्य शासनानेही धार्मिक स्थळे 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती मंदिरे समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता 17 मार्च पासून पंढरीचे श्री विठ्ठल रुक्मिणी  मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंदच ठेवण्यात आले आहे. केंद्र व राज्य  सरकारने 31 मे पर्यंत चार वेळा लॉकडाउन वाढविल्याने धार्मिक स्थळे ही बंदच ठेवण्यात आली होती. आता लॉकडाउन पाचची घोषणा झाली असून या काळात अनेक बाबींना सूट देण्यात आली असली तरी महाराष्ट्र सरकारने येथील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात धार्मिक स्थळे अद्यापही बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आता 30 जूनपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे.
 
अद्यापही राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात ही याचा प्रादुर्भाव आहे. पंढरपूर तालुक्यात ही कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लॉकडाउनमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही याची पुरेपर दक्षता घेतली जात आहे. वारकरी संप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख हे सर्व उपचार तसेच सध्या सुरू आहेत. उन्हाळतील चंदन उटी पूजा परंपरेनुसार केली जात आहे. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने मंदिरात साजरे करण्यात येत असल्याचे मंदिरे समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय समितीने घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.