गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:16 IST)

माताच मुलासाठी वैरीण ठरली, आईनेच प्रियकराच्या मदतीने केली मुलाची हत्या

प्रेमामध्ये अडथळा ठरणार्‍या स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आईने प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री पोलिसांना घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह सापडला. 
 
तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे (वय २२) या विवाहित महिलेने तिच्या जावाला उपचारासाठी अंबड येथे एका खासगी रूग्णालयात दाखल केले. नंतर औषध आणण्याच्या निमित्ताने शीतल आपल्या सहा वर्षाचा मुलगा आदित्यला सोबत घेऊन गेली आणि मुलाला तिथे एक व्यक्तीच्या हवाली केले. नंतर शीतल उघडे हिने मुलगा हरवल्याची अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. 
 
तोंडात कापडी बोळा कोंबून हत्या
परंतू नंतर पोलिस यंत्रणा तपास करत असताना धक्कादायक बाबी समोर आल्या. ज्यात शीतल उघडे हिने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याचं कळून आलं. शीतलचा प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने मुलाला अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे.
 
शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली करून खून करवले.
 
दरम्यान आरोपी माता शीतल उघडे हिच्यासह तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि एका साथीदाराला अंबड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.