सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (15:42 IST)

उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतील : किशोरी पेडणेकर

kishori pednekar
शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे. या  प्रकरणावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे  हेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतील, असे किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.
 
प्रत्येक वर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अर्जाबाबत आयुक्त निर्णय देत असतात. तुम्ही हवे तर दरवर्षीचे रेकॉर्ड तपासा. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. गणेशोत्सवानंतरच यावर निर्णय होईल. कोणी काही म्हणत असले, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
 
एकनाथ शिंदे हे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात. बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेतोय असे म्हणतात. मग आम्ही कोण आहोत. आम्हीही शिवसैनिकच आहोत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. नरेश म्हस्के योग्यच बोलले आहेत. हिंदुत्वाच्या तत्त्वांवर चालणारेच दसरा मेळावा घेणार, मग हिंदुत्व हे बाळासाहेबांचेच आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच शिवसेना मोठी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मेळावा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेच घेणार. गेली १० ते १५ वर्ष उद्धव ठाकरे नियमितपणे दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्दांचा किस पाडू तेढ वाढवली जाऊ नये. दोन्ही गटात तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.