शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:10 IST)

लम्पी रोखण्यासाठी 4 हजार 850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू

cow
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मंगळवार 27 सप्टेंबर अखेर लम्पी आजारावरील एकूण 106.62 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1906 गावातील 43.83 लाख आणि परिघाबाहेरील 28.96 लाख अशा 72.79 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
 
गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस मात्रा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता सर्व 4 हजार 850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
 
राज्यात दि. 27 सप्टेंबर, 2022 पर्यंत जळगाव 165, अहमदनगर 84, धुळे 17, अकोला 148, पुणे 66, लातूर 10, औरंगाबाद 23, बीड 1, सातारा 62, बुलडाणा 97, अमरावती 113, उस्मानाबाद 3, कोल्हापूर 49, सांगली 13, यवतमाळ 1, सोलापूर 7, वाशिम 9, नाशिक 2, जालना 10, पालघर 2, ठाणे 10,नांदेड 6, नागपूर 3, रायगड 2, नंदुरबार 2 व वर्धा 2 जिल्ह्यात एकूण 907 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. उपरोक्त बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.
 
सिंह म्हणाले, लम्पी रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश जनावरे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी आजाराच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
 
लम्पी आजाराबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय / जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन  सिंह यांनी केले.