1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2019 (10:18 IST)

पाणी स्थिती गंभीर चोरट्यांनी चोरले पाणी, पोलिसांत तक्रार

पूर्ण राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आता यात भर म्हणून पाण्याच्या चोरीची भर पडली आहे. चोरांनी आता साठवलेल्या पाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
 
मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात अशीच एक घटना घडली असून, घटनेत चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या ३०० लिटर पाण्यावर डल्ला मारला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या या  घटनेमुळे नागरिकांना धक्का बसला आहे.
 
या चोरी प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ  गाठल्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात २२ ते २५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पालिकेतर्फे दिले जाणारे हे पाणी एक महिना पुरवावे लागते. त्यामुळे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी घरातील ग्लासा पासून मोठ्या भांडया पर्यंत पाणी भरून ठेवण्यासाठी घरातील सर्वच जण धडपड करतात.
 
विलास आहिरे यांनी त्यांच्या छतावर असलेल्या टाकीत पाणी भरून ठेवले होते. त्यांचा घराचा  जिना बाहेरून असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जावून टाकीत भरून ठेवलेल्या ५०० पैकी ३०० लिटर पाणी चोरून पसार झाले आहेत. सकाळी टाकीतून पाणी येत नसल्याचे पाहून आहिरे छतावर जावून पहिले असता टाकीत पाणी नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत रीतसर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला आहे. यामुळे आता पाण्याला सुरुक्षा देणे गरजेचे झाले आहे.