Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरदलक्ष्मी व्रत कथा

Published: शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 (15:43 IST)
 
चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी. आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी. तशाच विविध रंगांच्या रांगोळया काढाव्यात. त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत. पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी.
 
भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावित. त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावी. त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्णपात्रावर वस्त्र पसरावे.
 
हे सुबुद्धे चारुमती, त्या पूर्णपात्रावर सोन्याची चतुर्भुजलक्ष्मीची प्रतिमा समंत्रक स्थापन करावी व तिची पूजा करावी. पंचामृतस्नान घालावे. देवीसूक्ताने शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा. वस्त्रांदी उपचार अर्पावेत. देवीला अष्टगंध, चंदन ( हळद, कुंकू, सौभाग्यद्रव्ये सुवासिक वगैरे ) अर्पण करावीत. विविध प्रकारची पत्री अर्पण करावी.
 
ती येणेप्रमाणे - पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळिंबी, मोगरी, तुलसी, कण्हेर, केवडा, चाफा आदी एकवीस जातींची पाने प्रत्येकी एकवीसप्रमाणे वाहावीत. मोगरी इत्यादी नानाप्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत. तसेच सुवासिक धूप, दीप आदीकरुन इष्ट्काम पूर्ण करणार्‍या द्र्व्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे. नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भक्ष्य, भोज्य, चोश्य, लेह्य आदी युक्त तसेच एकवीस अनारसे, वडे, घारगे वा मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करुन देवीला समर्पण करावा. नैवेद्यास जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून पाच देवींच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा.
 
यथाशक्ती राजोपचार, नानाप्रकारचे शेषोपचार देवीला सन्मान - पूर्वक समर्पण करुन शरण जावे आणि इष्ट वरहेतूची देवी पाशी प्रार्थना करावी. शक्यनुसार नृत्य, गायनवादन करावे. लक्ष्मीची गाणी म्हणून प्रार्थना करावी. 
 
हे प्रियभाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठया अधिकारास पोहोचल्या, त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन, पाहिजे तो वर देईन. याप्रमाणे वरलक्ष्मीने चारुमतीस स्वप्नदृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, " हे वरलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जनांची जननी आहेत. तू पुण्यमूर्ती इथे प्रगट झाली आहेस, तुला मी नमस्कार करते.
 
हे शरणागताचे रक्षण करणार्‍या, हे जगत्पूज्ये, हे श्रीविष्णूच्या वक्षस्थलावर निरंतर वास करणारे, जिला तूं एकवार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच यात शंका नाही. 
 
मी पूर्वीच्या सहस्त्रावधी जन्मांत काहीतरी पुण्याचा संचय केला असेल तो असे की, ज्यामुळे हे हरिवल्लभे, आज मी तुझे चरणकमल पाहात आहे. "
 
याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरलक्ष्मी हास्य करुन अनंत वर देती झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठया गडबडीने जागी झाली. आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले. ते ऐकताच " छान छान, फार उत्तम " असे सर्व म्हणाले. 
 
नंतर वरलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पूर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्गप्रतीक्षा करीत बसली. त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पूर्णिमा शुक्रवारी आली. मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ, सुंदर, विविध उंची वस्त्रे धारण करुन ( तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून, तोरणे बांधून उत्तम रांगोळी काढून ) गव्हाच्या राशीवर तांदळांनी भरलेला कलश स्थापन करुन त्यावर सुवर्णप्रतिमा मांडून यथाविधी वर - लक्ष्मीची पूजा करुन प्रार्थना करतात.
 
" हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणारे, हे सर्वलोकापूज्ये, हे नारायण प्रिये, हे देवी, तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो " ( पद्मासने ) या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरलक्ष्मीची पूजा करुन त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले. 
 
ह्या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतःकरण होऊन क्षुधितांना अन्नदान करण्याविषयी व आप्तकुटुंबीवर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली. नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगलवेष धारण करुन देवीच्या सन्निध बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिराचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले.
 
शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तेथे तेथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठया थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या ज्या निरनिराळया मैत्रिणी, तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारीत, त्या वेळी चारुमती त्यांना मोठया प्रेमाने हे वरलक्ष्मीचे व्रत सांगत असे. 
 
सूत सांगतात, यावरुन हे व्रत खरोखर अत्यंत गुह्य आहे. याचे जो कोणी मानव आचरण करील तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहील. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली. नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकांत पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली. आणि तिने ज्या ज्या मैत्रिणींकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले. 
 
याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावे. जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गास जातील. जे कोणी नित्य स्वस्थ अंतःकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावाटे गातील किंवा श्रवणद्वारा ऐकतील त्यांचे घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्यांची समृद्धी होईल. 
 
ही भविष्योत्तरपुराणांतर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली.
 
श्रीवरदलक्ष्मी कथा समाप्त

सर्व पहा

ॐ तारकेश्वर स्तोत्रम् : भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धेने करा स्तोत्राचे पठण

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments