Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक युनिटला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Updated: गुरूवार, 21 मार्च 2024 (15:23 IST)
 
फॅक्ट चेक युनिट
2023 मध्ये, इंटरमीडियरी गाइडलाइन अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड-2021 मध्ये सुधारणा करण्यात आली. हे नियम इंटरमीडिएटरीजला नियंत्रित करतात. ज्यात दूरसंचार सेवा, वेब होस्टिंग सेवा, फेसबुक, YouTube सारख्या सोशल मीडिया वेबसाइट्स आणि Google सारख्या सर्च इंजिनचा समावेश आहे. सुधारित नियमांमध्ये म्हटलंय की, केंद्र सरकारला फॅक्ट चेक युनिट नियुक्त करण्याचा अधिकार असेल. या युनिटला केंद्र सरकारच्या कामकाजाशी संबंधित कोणतीही बातमी 'बनावट, खोटी किंवा दिशाभूल करणारी' म्हणून घोषित करण्याचा अधिकार असेल. याला कॉमेडियन कुणाल कामरा आणि संपादकांची संघटना एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया यांनी आव्हान दिलं आहे. वेब होस्टिंग सेवा आणि सोशल मीडिया वेबसाइट्सप्रमाणं न्यूज वेबसाइट्स थेट इंटरमीडिएटरीजच्या व्याख्येत येत नाहीत. याचा अर्थ ज्या बातमीला खोटं म्हणून सांगितलं जाईल तिला इंटरनेटवरून काढलं जाऊ शकतं.
 
एखादी बातमी खोटी म्हणून सांगितली तर?
IT नियमांनुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणारी माहिती प्रदर्शित किंवा अपलोड होणार नाही याची खात्री करण्यासाठी इंटरमीडियरीजनी योग्य पावलं उचलली पाहिजेत. यामुळे, इंटरमीडियरीजला ती माहिती 36 तासांच्या आत हटवावी लागेल. जर त्यांनी तसं केलं नाही तर त्याला कायदेशीर शिक्षेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं जाऊ शकतं. सध्या हे संरक्षण त्या वेबसाईट्स आणि सेवा प्रदात्यांना देण्यात आलं आहे जे लोकांच्या वतीने पोस्ट केलेली माहिती होस्ट करतात. ही व्यवस्था त्याच्या वेबसाईटवर इतरांनी पोस्ट केलेल्या कंटेटसाठी जबाबदार धरण्यापासून संरक्षण देते. वापरकर्त्याला इंटरमीडियरीने नियुक्त केलेल्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय असेल. तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या निर्णयावर वापरकर्ता समाधानी नसल्यास, तो तक्रार घेऊन अपील समितीकडे जाऊ शकतो. केंद्र सरकारने नियुक्त केलेली ही त्रिसदस्यीय समिती आहे.
 
या नियमावर टीका का होत आहे?
सरकारच्या या नियमावर अनेक लोकांनी जोरदार टीका केली आहे. एडिटर गिल्ड या संपादकांच्या संघटनेनं एक निवेदन जारी करुन सरकारला ही दुरुस्ती मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. गिल्डने म्हटलंय की, सरकारचं हे पाऊल त्रासदायक आहे कारण यानुसार सरकार स्वतःशी संबंधित बातम्यांवर सेन्सॉरशिप लादेल. 'ॲक्सेस नाऊ' आणि 'इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशन' सारख्या 17 डिजिटल अधिकार संस्थांनी म्हटलंय की, ही दुरुस्ती घटनात्मकतेच्या कसोटीवर उतरत नाही कारण यामुळे भाषण स्वातंत्र्याचा अधिकार धोक्यात येतो आणि याचा वापर 'असहमती दडपण्यासाठी' केला जाऊ शकतो. यामुळे राजकीय व्यंगचित्र, विडंबन किंवा राजकीय टिप्पण्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, असाही याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे.
 
सरकार काय म्हणतं?
सरकारने या नियमांचे समर्थन केलं आहे. सरकारनं म्हटलं की, "खोट्या बातम्या शेअर केल्यानं गंभीर सार्वजनिक संकट येउ शकतं. सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो." हे नियम एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा भाषण स्वातंत्र्यावर बंधन घालत नाहीत. त्यात तक्रार निवारण यंत्रणाही देण्यात आली आहे, असंही सरकार म्हणतं. याव्यतिरिक्त, असंही स्पष्ट करण्यात आलंय की, "हे युनिट फक्त बनावट आणि बिनबुडाच्या तथ्यांवर निर्बंध घालेल, जे सरकारी दस्तऐवजांमध्ये दिलेली तथ्ये आणि आकड्यांच्या स्पष्टीकरणाहून भिन्न आहेत."
 
सरकारचे स्वतःचे युनिट
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) अंतर्गत सरकारच्या विद्यमान फॅक्ट चेक युनिटनं काही बातम्या खोट्या असल्याचं घोषित केल्यानं अनेक लोक घाबरले आहेत. हे युनिट अनेकदा सरकारवर टीका करणाऱ्या माहितीला खोटी बातमी म्हणून लेबल करतं, असंही अनेक पत्रकारांनी म्हटलं आहे. सरकारी फॅक्ट चेक संस्थेनेच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या कशा पसरवल्या, हे बीबीसीने यापूर्वीच रिपोर्टमध्ये दाखवलं आहे. 'अल्ट न्यूज' या फॅक्ट चेक वेबसाइटचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा म्हणतात की, या युनिटचा वापर केवळ सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी करण्यात आला आहे. "PIB च्या फॅक्ट चेकमध्ये निश्चित प्रक्रिया नसते, जशी ती इतर फॅक्ट चेक करणारे सहसा करतात. PIB पूर्ण संदर्भ न देता एखादी गोष्ट 'बरोबर की चूक' म्हणून घोषित करते," असंही ते म्हणाले.
 
मुंबई हायकोर्टात आतापर्यंत काय झालं?
या फॅक्ट चेक युनिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुरुवातीपासून सुनावणी सुरू आहे. 31 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयानं याच्या घटनात्मकतेबाबत निकाल दिला. न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी या युनिटशी संबंधित नियम असंवैधानिक असल्याचं म्हटलं होतं. यात 'सरकारचं कामकाज', 'बनावट' आणि 'दिशाभूल करणारे' या शब्दांची व्याख्या नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. ते म्हणाले की, सरकारच्या कारभारात कोणतचं सत्य पूर्ण नाहीये. ही दुरुस्ती सरकारबाबत पूर्णपणे चुकीच्या तत्त्वावर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं. नागरिकांना फक्त 'योग्य माहिती' मिळेल याची काळजी घेणं हे कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. दुसरीकडे न्यायमूर्ती नीला गोखले यांनी या दुरुस्तीला घटनात्मक म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की, यात माहिती काढून टाकली जाणं आवश्यक नाही, पण इंटरमीडियरीजला सूचनांसह माहिती प्रदर्शित करण्याचा पर्याय देखील असेल. त्या म्हणाल्या की, "या युनिटचे कामकाज काय आहे हे अद्याप कळलेले नाही. पुढे चालून पक्षपातीपणाचा कोणताही मुद्दा समोर आल्यास, पीडित व्यक्ती न्यायालयातही जाऊ शकते. हा नियम व्यंगचित्र, विडंबन, टीका किंवा मत यांना लागू होणार नाही." "आपल्या कामकाजाशी संबंधित कोणत्याही पैलूवर योग्य तथ्ये प्रदान करणारे हे सरकार सर्वोत्तम स्थितीत आहे," असं त्यांनी निर्णयात लिहिलं. आता हे प्रकरण तिसऱ्या न्यायाधीशांसमोर ठेवण्यात आलं आहे.
 
Published By- Dhanashri Naik 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उप-वर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये एल्गार महा मोर्चा,हजारो आंदोलक रस्त्यावर

ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीची सहकारी तरुणांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments