शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (15:39 IST)

व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा सत्तेत, भारत-रशिया संंबंधांवर काय परिणाम होईल?

अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. गेल्या 24 वर्षांत भारतानं हे तीन पंतप्रधान पाहिले आहेत. पण तिकडे रशियात एकजण सत्तेत आहे. व्लादिमीर पुतिन.सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. आपल्या तीन प्रतिस्पर्ध्यांना हरवत आणि 87 टक्के मतं मिळवत पुतिन यांनी विजय मिळवल्याचं रशियानं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे रशियातल्या या निवडणुकीच्या निष्पक्षतेवर अनेक देशांनी आणि रशियातील काही जणांनीही शंका उपस्थित केली आहे.पण सध्या रशियाच्या सत्तेवर पुतिन यांनी मजबूत पकड घेतली आहे. त्यांचा पुन्हा विजय झाल्यानं जगावर राजकीय आणि आर्थिक परिणाम होतील का, त्यांचं भारतासोबतचं नातं यापुढे कसं असेल जाणून घेऊया.
 
71 वर्षांचे व्लादिमीर पुतिन हे 2000 सालापासून म्हणजे गेल्या 24 वर्षांपासून सलग रशियात सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. जोसेफ स्टालिन यांना मागे टाकून सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे रशियन राष्ट्रप्रमुख बनण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू आहे.

आधी 1999 मध्ये काळजीवाहू पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष, मग 2000 ते 2008 या काळात राष्ट्राध्यक्षपदी सलग दोनदा निवड, त्यानंतर सलग तिसरी टर्म लढवता येत नसल्यानं 2008 ते 2012 दरम्यान पंतप्रधानपद, 2012 ते 2024 अशा दोन टर्म्स राष्ट्राध्यक्ष असा पुतिन यांचा प्रवास.
खरं तर रशियाच्या राज्यघटनेनुसार कुणाही नेत्याला दोनपेक्षा अधिक वर्षे राष्ट्राध्यक्ष बनता येत नसे. मात्र 2021 साली घटनादुरुस्ती केल्यावर पुतिन यांचा 2024 ची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आणि ते सत्तेत कायम राहिले.
 
विरोधकांचा आवज दाबत असल्याचे आरोप
या निवडणुकीच्या निकालाच्या वैधतेवर पुतिन यांच्या विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एकतर या निवडणुकीत रशियानं स्वतंत्र निवडणूक निरिक्षक संस्थांवर बंदी घातली होती.
तसाही पुतिन यांच्या विरोधातला आवाज रशियात फारसा उरलेला नाही. कारण त्यांचे अनेक विरोधक एकतर देशाबाहेर आहेत, तुरुंगात आहेत किंवा त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
अगदी अलीकडेच पुतिन यांचे विरोधक अॅलेक्सी नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्यावर त्यामागे सरकारचा हात असल्याचे आरोप झाले.

आजच्या घडीला रशियात अनेकजण गरिबीचा सामना करतायत. तिथे सुविधांची कमतरता आहे, आरोग्याच्या समस्या जाणवतायत आणि शिक्षण क्षेत्रातली स्थिती बिकट बनलीय.
आता पुतिन यांची पुन्हा निवड झाल्यावर तिथली ही परिस्थिती फारशी बदलणार नाही, असंच विश्लेषक सांगतात. पण आपल्याला रशियन नागरिकांचं मोठं पाठबळ आहे असं सांगून पुतिन त्यांच्या कुठल्याही निर्णयांचं समर्थन करू शकतात.
 
पुतिन सत्तेत आल्यानं जगावर काय परिणाम होईल?
युक्रेन-रशिया संघर्षाचं हे सलग तिसरं वर्ष आहे आणि ही लढाई इतक्यात कायमची थांबेल असं दिसत नाही.उलट जनमताचा आधार असल्याचं सांगत पुतिन आणखी आक्रामक भूमिका घेऊ शकतात, अशीही शक्यता नाकारता येणार नाही. याचा परिणाम युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या नागरिकांवर होऊ शकतो.युरोपातल्या इतर देशांसोबत रशियाचा छुपा संघर्ष आणखी बळावू शकतो. विशेषतः आर्क्टिक प्रदेशात. रशिया आणि इतर आर्क्टिक देशांमध्ये अलीकडे स्पर्धा आणि वैमनस्य वाढलं आहे. अलीकडेच स्वीडननं नेटो राष्ट्रगटात प्रवेश केल्यानं परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.
 
असा अंदाज आहे की, जगातल्या एकूण तेल आणि गॅससाठ्यांपैकी एक चतुर्थांश हिस्सा इथल्या समुद्राखाली आहे. त्यावर रशियानं दावा ठोकला, तर आर्क्टिकमधला संघर्ष पेटू शकतो.
या प्रदेशात आणि इतरही काही ठिकाणी पुतिन यांनी चीनसोबत सहकार्य वाढवलं आहे, ज्यामुळे आधीच जगाच्या राजकारणात तणाव वाढवण्याचीच शक्यता निर्माण झालीय.
पुतिन पुन्हा सत्तेत आल्यामुळे आता हा संघर्ष एवढ्यात निवण्याऐवजी आणखी चिघळेल अशी भीती व्यक्त केली जाते आहे.पुतिन पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला अधिकृत विदेश दौरा चीनला होतोय हेही विशेष.
 
पुतिन पुन्हा सत्तेत आल्याचा भारतावर काय परिणाम?
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि रशिया अनेकदा एकमेकांची पाठराखण करताना दिसतात. अलीकडेच पंप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी जवळीक दाखवली, त्यानंतरही पुतिन यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या.
पुतिन यांच्या पाचव्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात भारतासोबतच्या त्यांच्या नात्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही.
 
याविषयी आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकार उत्तरा सहस्रबुद्धे सांगता, पुतिन यांच्या पाचव्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात भारतासोबतच्या त्यांच्या नात्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही.
सहस्रबुद्धे या मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापिका आहेत.
त्या सांगतात, “पुतिन निवडून आल्यानं रशिया-भारत संबंध आज जसे आहेत, तसेच पुढे राहतील. याचं कारण रशियाचं आंतरराष्ट्रीय धोरणात बहुध्रुवियता महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे, एकूण जागतिक राजकारणावर अमेरिकेचंच वर्चस्व असू नये, असं रशियाला वाटतं.

त्याचवेळी रशिया भारताकडे ‘उगवती सत्ता’ म्हणून पाहते. त्यामुळे भारताच्या योग्यतेनुसार भारताला मिळालं पाहिजे, असं रशियाचं हे बहुध्रुवियतेचं धोरणं सांगतं. म्हणून भारत आणि रशिया यांचे संबंध कायमच चांगले राहिलेत आणि पुढेही राहू शकतात. ""भारतही बहुध्रुवियतेला महत्त्व देणारा देश आहे. कारण अमेरिकेचे आपण मित्र असलो, तरी अमेरिकेचे चांगले संबंध नसलेल्या देशासोबतही आपले चांगले संबंध आहेत. एकूणच बहुध्रुवियता हा समान धागा भारत आणि रशियात आहे."
 
तसंच, “कुठल्याही देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप असू नये, अशी भारताची भूमिका असते. आपण आजही कित्येक देशांशी चांगले संबंध राखून आहोत, ज्या देशांची व्यवस्था पूर्णपणे लोकशाहीची आहेच, असं नाही. आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देऊन भारत हे निर्णय घेत राहतं.
 
अमेरिका आणि पाश्चिमात्य देश भारतावर रशियाशी संबंध ठेवल्यावर टीका करतील, पण अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांचे संबंध असलेले सगळे देश लोकशाहीप्रधानच आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतोच,” असंही उत्तरा सहस्रबुद्धे म्हणाल्या.
 
एकीकडे स्वतःला जगातली सर्वांत मोठी लोकशाही म्हणवणारा भारत आणि दुसरीकडे ज्यांच्यावर लोकशाहीच्या पायमल्लीचा आरोप केला जातो, ते व्लादिमिर पुतिन यांच्यातले संबंध कसे असतील यावर भारतीय उपखंडातली काही समीकरणं नक्कीच अवलंबून राहतील.

Published By- Priya Dixit