गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By

अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी देणार निकाल

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ शनिवारी सकाळी साडेदहापासून निकालवाचन सुरू करणार आहे. 
 
दरम्यान, अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आधीच देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येलाही पोलीस छावणीचे रूप आलेले आहे.
 
६ ऑगस्टपासून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने अयोध्या खटल्यावर दररोज सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी घटनापीठाने अयोध्या प्रकरणी १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल व १७ नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण करत घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान कोणत्याही तारखेला दिला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता हा निकाल 9 नोव्हेंबर दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.