गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राम मंदिर अयोध्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:51 IST)

अयोध्येतील राममंदिराच्या जागी डिसेंबर 1992 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत नेमकी काय स्थिती होती?

नीलेश धोत्रे, मयुरेश कोण्णूर
अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 ते 9 नोव्हेंबर 2019 दरम्यान परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती.
 
ज्याठिकाणी आता राममंदिर झालं आहे तिथं फोटो काढण्यास किंवा चित्रिकरण करण्यास सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे मनाई होती.
 
पण रामललाची मूर्ती तिथं स्थापित होती. त्यामुळे देशभरातून रामभक्तांची दर्शनासाठी तिथं थोड्याबहुत प्रमाणात गर्दी होतच होती.
 
जून 2019 आणि मार्च 2020 अशी दोनवेळा तिथं जाण्याची संधी मला मिळाली होती.
 
कोर्टाच्या आदेशामुळे तिथं फोटो तर काढता आले नाहीत.
 
पण तिथं 9 नोव्हेंबर 2019च्या आधीपर्यंतच नेमकी काय स्थिती होती आणि तिथं पोहोचण्यासाठी किती मोठ्या सुरक्षा कड्यातून पुढे जावं लागत होतं याचं चित्र मी या लेखाच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
जिथं आधी बाबरी मशीद होती आणि नंतर जिथं रामलला विराजमान होते त्या प्रत्यक्ष जागेवर पोहोचण्यासाठी 2 किलोमीटर आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांचं कड सुरू व्हायचं.
 
अयोध्येत पोहोचल्या पोहोचल्या मुख्य बाजारातून रस्ता काढत हिंदू भाविक आधी हनुमानगढीवर जातो. तिथूनच समोर अयोध्या नरेशचा दरबार आहे म्हणजेच राम दरबार आहे आणि या दोघांच्या मधला रस्ता सरळ पुढे रामलला विराजमानपर्यंत जात होता.
 
हनुमानाचं दर्शन घेऊन पुढे निघालं की या रस्त्याच्या दुतर्फा हार-फुलं, प्रसाद आणि पुजेच्या साहित्याची दुकानं होती. राम, सीता, हनुमान आणि वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती सजवून ठेवलेले फोटो स्टुडिओ होते.
 
त्यातून वाट काढत पुढे गेलं की वेगवेगळ्या आखाड्यांच्या हवेल्या होत्या. त्याच्याबरोबरीने भारतातल्या वेगवेगळ्या हिंदू संस्थानांच्या राजांनी बांधलेल्या आणि खूपच जिर्ण झालेल्या अनेक वास्तू उजव्या हाताला दिसत राहायच्या.
 
मोकाट गायी, त्यांना रस्त्यात टाकण्यात आलेला चारा आणि शेण हे चित्र ठिकठिकाणी दिसत राहायचं. त्यातून वाट काढत हनुमानगढीपासून साधारण अर्धा-एक किलोमीटर पुढे चालत गेलं की पहिला चेकपोस्ट लागयचा.
 
या चेकपोस्टच्या जवळ असलेल्या सर्व प्रसादाच्या दुकानांमध्ये छोटे-छोटे लॉकर उपलब्ध होते. तुम्ही चपला न काढता किंवा मोबाईल फोन जमा न करता पुढे निघालात की लगेचच त्या दुकानांमधली मंडळी तुम्हाला आवाज देत ‘आगे मोबाईल और चप्पल अलाऊड नही है’ असं ओरडून सांगायचे.
 
तासाला 30 रुपये भाडं देऊन एक छोटा लॉकर घेऊन त्यात मोबाईल फोन जमा करावा लागायचा. कारण फोटोग्राफीला परवानगी नव्हती.
 
तिथूनच पुढे असलेल्या यूपी पोलिसांच्या पहिल्या चेक पोस्टवर निट तपासणी केली जायची. तिथून पुढे गेल्यावर हाताच्या दोन्ही बाजूंना जीर्ण झालेल्या हवेल्या होत्या. या हवेल्यांवर दारं-खिडक्यांवर असलेली नक्षी, त्यांची स्थापत्य शैली आणि बांधकामासाठी वापरलेले दगड त्याकाळच्या त्या त्या संस्थानाच्या श्रीमंतीचा दाखला देत होत्या.
 
या हवेल्यांच्या बरोबरीनं तिथं पदोपदी दिसायचा तो केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा.
 
तिथून थोडं पुढे गेलं की पुढच्या संपूर्ण रस्त्याला टिनाची शेट टाकण्यात आली होती. या अंधाऱ्या टिनाच्या शेडमधून वाट काढतच पुढच्या चेक पोस्टपाशी जाता यायचं.
 
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा हा सर्वांत पहिला चेकपोस्ट होता. काही वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर सुरक्षा तपासणीसाठी नंबर लागायचा.
 
तिथं मात्र कसून तपासणी केल्यानंतरच आत सोडलं जायचं. प्रत्येक खिसा निट तपासला जायचा. कॉलर, कंबरेचा बेल्ट असं सगळ निट तापसलं जायचं.
 
तिथून आत सोडल्यावर मात्र तुम्ही एखाद्या जेलमध्ये जात आहात असा फिल यायचा. कारण आत प्रवेश केल्या केल्या मी एका मोठ्या आणि भव्य पिंजऱ्यात घुसलो होतो.
 
वर-खाली, डाव्या आणि उजव्या अशा चारही बाजूंना लोखंडी पिंजऱ्याचं अवरण आता इथून पुढचा साधारण 2 किलोमीटरचा परिसर प्रवेश केलेल्या माणसाच्या बरोबरीला असायचं.
 
या पिंजऱ्यातून वाट काढत थोडं पुढे गेल्या गेल्या पुन्हा एकदा सुरक्षारक्षक तपासणी करायचे. त्यानंतर आत प्रवेश केल्यावर पहिल्यांदा आधीच्या बाबरी मशिदीच्या जिर्ण झालेल्या कुंपणाचे अवशेष दिसायचे.
 
प्रवेश केलेल्या लोकांची दूरवर नजर जाऊ नये म्हणून मध्येच अडथळे टाकण्यात आले होते. टिना लावून बराचसा परिसर सील करण्यात आला होता.
 
इथून पुढे पिंजऱ्याच्या बाहेर दिसायची ती एकतर टिनाची शेड, टेहळणीसाठी उभारण्यात आलेले मनोरे किंवा दोन देशांच्या सीमेवर असतं तसं तारांचं कुंपण.
 
चुकून टिनाच्या शेडमधून बाहेर पाहाण्याची संधी मिळाली की दिसायचे ते आधीच्या मशिदीचे अवशेष, मातीचे ढिगारे आणि सर्वत्र माजलेलं झुडूप.
 
हे चित्र दिसत असताना कानावर मध्ये मध्ये पडत राहायचा तो रामभक्तांनी दिलेला जय श्रीरामचा जयघोष किंवा माकडांनी मांडलेला उच्छाद.
 
पिंजऱ्यातून चालत जाणारी माणसं पाहाणं बहुदा या माकडांसाठी पर्वणी असावी. माणसांना चिडवण्याची एकही संधी ही माकडं सोडत नसत. पिंजऱ्याच्या उजव्य-डाव्या आणि वरच्या दिशांना माकडांच्या कसरती सुरू असायच्या.
 
या पिंजऱ्याच्या रस्त्यात दर चारपाच मीटरवर सुरक्षा यंत्रणांचा पाहारा होता. जेणेकरून कुणीही पिंजऱ्यातून बाहेर जाऊ नये किंवा बाहेर जाण्यचा प्रयत्न करू नये. पण केंद्रीय सुरक्षा रक्षकांचं तिथल्या माकडांकडे मात्र साफ दूर्लक्ष असायचं. कारण त्यांच्यासाठी बहुदा हे रोजचंच असावं.
 
साधारण अर्धा किलोमीटर वळणावळणाचा आणि चढउताराचा हा पिंजऱ्यातून जाणारा रस्ता पार करता करता किमान आणखी 4 वेळा माणसांची तपासणी केली जायची. कुठली अनुचित वस्तू घेऊन कुणी प्रवेश करू नये हा त्यामागचा उद्देश. शिवाय कार्टाचे तसे आदेश.
 
हा असा सगळा द्रविडीप्रणायम पार केल्यानंतर एक तंबू दृष्टीपथास पडायचा. पाढऱ्या रंगाच्या ताडपत्रीच्या याच तंबूत श्रीरामाची बाल्यावस्थेतली मूर्ती स्थापित करण्यात आली होती. रामलला विराजमान असं त्याला नाव देण्यात आलं होतं. (ज्याच्या बाजूने सुप्रीम कोर्टानं फौसला सुनावला आहे.)
 
प्रत्यक्ष तंबूपासून साधारण 5 ते 7 मीटर अंतरावरून पिंजऱ्यातूनच भक्तांना रामललाचं दर्शन घेतलं जाऊ द्यायचं. फक्त हात जोडायचे आणि पुढे जायचं. एवढंच. घटकाभर रेंगाळायला किंवा पूजा-अर्चा करायला परवानगी नव्हती.
 
तिथून पुढे बाहेर पडण्याचा प्रवास देखील पिंजऱ्याच्या रस्त्यातूनच आणि पुढचं सगळं चित्र तसंच. वाढलेलं झुडूप, मातीचे ढिगारे, आधीच्या मशिदीचे अवशेष, टिनाच्या शेड, टेहळणी मनोरे आणि मकडांचा उच्छाद.
 
पुन्हा एकदा साधारण 1 किलोमीटरभरचा परिसर चालल्यानंतर पुन्हा एकदा जिथून सुरूवात केली होती तिथं माणूस दाखल व्हायचा.
 
1992च्या आसपास माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांनी एक भाषण केलं होतं, त्यात त्यांनी इथली जमीन समतल करण्याची भाषा केली होती. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर मधल्या काळात चांगलीच व्हायरल झाली होती.
 
या क्लिपचा इथं संदर्भ देण्याचं कारण म्हणजे बाबरीच्या कुंपणाच्या आतली जमीन खरोखर समतल होती.
 
पण आता हा वर लिहिलेला खूप दूरचा, अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास वाटावा अशी आजची अयोध्या दिसते आहे. आम्ही खर तर दोन वर्षांपूर्वीच इथं आलो होतो. तेव्हाची अयोध्या आणि आजची अयोध्या यातही जमीन-अस्मानाचा फरक वाटावा अशी स्थिती आहे.
 
अर्थात आता एका प्रकारच्या उत्सवाच्या वातावरणात अयोध्या आहे. सगळीकडे रंगरंगोटी, सजावट आहे. पण हे सगळं सोहळ्यानंतर उतरणार आहे. ते तात्पुरतं आहे.
 
पण ते उतरल्यावरही जी बदललेली अयोध्या आहे ती ओळखणं अवघड आहे. जे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा इथं आले आहेत, त्यांनाही ते पटेल.
 
आपल्या आधुनिक काळातल्या इतिहासापासून फारकत घेत असतांना, अयोध्या एकूणातच कात टाकते आहे.
 
जेव्हा तुम्ही लखनऊच्या दिशेनं फैजाबादमधून पुढे अयोध्येत प्रवेश करता, जो रस्ता थेट शरयूच्या घाटापर्यंत जाऊन पोहोचतो, काहीच दिवसांपूर्वी हा रस्ता अगदी एका गजबजलेल्या गल्लीसारखा होता. तो आता मोठा प्रशस्त झाला आहे.
 
दोन्ही बाजूंनी जवळपास पंधरा फूट तो रुंद केला गेला आहे. शहरातला हा रामपथ बदललेल्या अयोध्येचं प्रतिक आहे.
 
गल्लीबोळांची अयोध्या आता सिमेंट कॉंक्रिटच्या मोठ्या रस्त्यांची झाली आहे. पूर्वी अयोध्येत फिरतांना आपल्याकडच्या पंढरपूरच्या अथवा जुन्या नाशिकच्या गोदाकाठच्या गल्ल्यांमधून फिरल्यासारखं वाटायचं.
 
आजही आतली अयोध्या तशीच आहे. जुनी घरं, इथल्या मिश्र संस्कृतीची रचना, दर पावलागणिक एखादं मंदिर, मठ अथवा धर्मशाळा आणि त्यातून राहणारे महंत, महाराज, साधू आणि भाविक.
 
पण दर्शनी अयोध्या आता पूर्णपणे वेगळी आहे. ती चकचकीत आहे. एकाच रंगातली आणि एकसारखी आहे.
 
सगळ्या दुकानांवरच्या पाट्याही एकसारख्या आणि एकाच फॉंट-डिझाईनच्या आहेत.
 
तसं अर्थात जाणीवपूर्वक केलं गेलं आहे. सगळ्या इमारतींच्या दर्शनी भागाला एकच रंग दिला आहे. असंच काहीसं काही वर्षांपूर्वी वाराणसीमध्ये केलं होतं.
 
पण ही डागडुजी दिसत असतांना तुटलेल्या इमारतीही नजरेत आल्याशिवाय रहात नाही. वस्ती अक्षरश: कापून मोठे रस्ते केले गेले आहेत.
 
ज्या इमारती पडल्या आहेत, त्यातल्या अनेक अजूनही तशाच अवस्थेत उभ्या आहेत. ज्यांना अजून पुन्हा उभारणं जमलं नाही, ते त्या झाकायचा प्रयत्न करत आहेत. त्यावरूनच सगळीकडे स्थानिक प्रशासनानं एलईडी दिव्यांच्या माळा या समारोहासाठी उभारल्या आहेत.
 
पण रूंदीकरणासाठी, नूतनीकरणासाठी घरं, इमारती तोडल्या जात असल्याबद्दल मिश्र भावना अयोध्येच्या नागरिकांमध्ये आहे. त्यांना विचारलं की ते लगेच त्याविषयो बोलायला लागतात.
 
काहींना वाटतं की एवढ्या वर्षांनी मंदिर होतं आहे, अयोध्या मोठी होणार आहे, तिचा विकास होणार आहे तर असं होणारच.
 
काहींना मात्र हे वाटतं की अशा विकासात जर कुटुंबाचं घर जाऊन ते रस्त्यावर येत असतील तर काय उपयोग? त्यामुळे राग आणि समाधान अशा दोन्ही भावना जाणवतात.
 
अयोध्येच्या बाकी मंदिरांमध्ये मात्र जसे व्यवहार चालू होते, तसेच चालू आहेत. हनुमानगढी, कनकभवन आणि इतर सगळ्या छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये नेहमीचं अनेक वर्षांपासून चाललेलं कार्य आहे, तसंच चालू आहे.
 
गर्दी मात्र अयोध्येत भरपूर वाढली आहे. असं नव्हतं की या सगळ्या दरम्यानच्या काळात इथं गर्दी नव्हती. अयोध्येतले मेळे, रामकथा वाचन, बाकी धार्मिक कार्यक्रम चालूच होते.
 
पण सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर मंदिराचं काम सुरु झालं आणि इथली गर्दी वाढू लागली. इथल्या सरकारनंही अनेक नवीन बांधकामं सुरु केली. अयोध्या वाढू लागली. मुख्य जुन्या शहराबाहेरही आता अयोध्येचा विस्तार देशातल्या इतर शहरांसारखा सुरु झाला आहे.
 
इथे येणारी गुंतवणूक दिसते आहे. अनेक नवीन हॉटेल्स इथे आली आहेत. ज्यांचं काम चालू आहे अशा इमारतींची तर मोजदादच करता येणार नाही.
 
येत्या काळात इथं ज्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे ते पाहता अयोध्या अजूनही पूर्ण तयार नाही. त्यासाठी ती तयार होते आहे.
 
अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादानं इथलं वातावरण कायम संवेदनशील राहिलं आहे. मागची बरीच वर्षं शांततेत गेली असली, आता निवाडाही झालेला असला आणि सगळ्यांनी तो मान्यही केला असला, तरीही या इतिहासाची वातावरणातली जाणीव कायम आहे.
 
अयोध्या, फैजाबाद इथं आजही दोन्ही समुदायांची घरं गल्ल्यागल्ल्यांमध्ये एकत्रच आहेत आणि बाजारपेठेतले व्यवहारही सुरुळीत सुरु आहेत. पोलिसांची संख्या, सुरक्षा बंदोबस्त मात्र अयोध्येच्या वातावरणातलं गांभीर्य वाढवतो.
 
मंदिराच्या नव्या बांधकामाप्रमाणे, इतरही अनेक नवी बांधकामं अयोध्येत झाली आहेत. त्यामुळं तिचं रुपडं पूर्णपणे बदलून गेलं आहे. शरयूचा घाट पूर्णपणे नव्यानं बांधण्यात आला आहे. तिथे रोज रात्री वाराणसीच्या घाटावर होते तशी आरती होते. त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची सतत गर्दी असते.
 
या घाटाच्या बाजूला नवा 'लता मंगेशकर चौक' तयार करण्यात आला आहे आणि तिथे एका मोठ्या विणेची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे.
 
तिथून बायपास महामार्गाकडे जाणाऱ्या मोठ्या पुलावर कायमस्वरुपी रोषणाई करण्यात आली आहे. जुनी अयोध्या आणि नवी अयोध्या सहज नव्यानं येणाऱ्यालाही ओळखता येईल एवढी वेगवेगळी आहे.