सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (13:41 IST)

26/11 मुंबई हल्ला: 'लोकांनी मला कसाबची मुलगीही म्हटलं कारण मी साक्ष दिली!'

जान्हवी मुळे, मयुरेश कोण्णूर
आम्ही देविका रोटावनला दोन वर्षांपूर्वी भेटलो तेव्हा ती कुठल्याही टीनएजर मुलीसारखीच अगदी अवखळ होती. पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदनादायी कहाणी दडली होती.
 
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान देविकाच्या पायाला गोळी लागली होती. "ही जखम मला सतत दिसत राहते, जाणवत राहते. मला तो दिवसही अजून आठवतो. मी कधी विसरू शकणार नाही, मरेपर्यंत नाही," देविका सांगते.
 
अकरा वर्षांपूर्वीच्या त्या रात्री दहा हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेलं कॅफे, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) आणि नरिमन हाऊस या ज्यू सेंटरवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर साठ तास चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले होते. सगळं जगच त्या हल्ल्यानं हादरून गेलं होतं.
 
तो भीषण दिवस
देविका तेव्हा फक्त नऊ वर्षांची होती. वडील नटवरलाल रोटावन आणि भाऊ जयेशसोबत ती CSTवरून पुण्याची ट्रेन पकडणार होती.
 
तेवढ्यातच, रात्री साडे नऊच्या सुमारास अजमल कसाब आणि इस्माईल खान CSTवर दाखल झाले होते. त्यांच्या हाती मशीनगन होत्या. अचानक गोळीबार सुरू झाला आणि देविकाचं जगच बदललं.
 
"गोळी झाडल्याचा आवाज आला. सगळे इकडे तिकडे पळू लागले, पळताना एकमेकांवर पडत होते. आम्ही पण तिथून पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कसाबनं झाडलेली गोळी माझ्या पायात लागली. मी खाली पडले, बेशुद्ध झाले. " देविका सांगत होती.
 
अकरा वर्षांनंतरही तो क्षण देविकाच्या अंगावर काटा आणतो.
 
त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये देविकावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आणि ती पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. इतकंच नाही तर देविकानं धीर एकवटून कोर्टात कसाब विरोधात साक्षही दिली.
 
धैर्य एकवटून साक्ष
26/11च्या हल्ल्यात जिवंत अटक झालेला अजमल कसाब एकमेव दहशतवादी होता. त्याच्याविरूद्ध साक्ष देणारी, कोर्टात त्याची ओळख पटवून देणारी देविका ही सर्वांत लहान साक्षीदार होती.
कोर्टात साक्ष देण्याच्या निर्णयावर देविका आणि तिचे वडील अगदी ठाम होते.
 
देविका पुढे सांगते, "जेव्हा गोळी लागली, तेव्हाच माझं लहानपण हरवलं. पण असंही वाटलं, ठीक आहे, मी देशासाठी उभी राहू शकले."
 
मीडियानं आणि जनतेनं देविकानं त्यावेळी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं. खटल्याचा निकाल लागला आणि कसाब फासावरही लटकला. पण साक्ष देणाऱ्या देविकाचं जगणं आणखी कठीण बनलं.
 
अतिरेकी तिच्या मागावर येतील, या भीतीनं समाजातील अनेकांनी देविका आणि तिच्या कुटुंबीयांपासून चार हात लांब राहणं पसंत केलं. "मी अतिरेक्याविरोधात साक्ष दिली होती. कोणी मला कसाबची मुलगीच म्हणालं, लोकांनी काय काय नावं ठेवली," देविका पोटतिडकीने सांगत होती.
 
देविकाच्या कुटुंबीयांना घरही बदलावं लागलं. सध्या ती आपले वडील आणि भावासोबत वांद्र्याच्या सुभाषनगरात एका बैठ्या चाळीतील छोट्या घरात राहते.
नातलगांनी वाळीत टाकलं
रोटावन परिवार मूळचा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुमेरपूरचा. गावच्या नातलगांनीही देविकाच्या कुटुंबीयांना दूर केलं आहे.
 
"काही समारंभ असेल, लग्न असेल तर आम्हाला सहसा बोलावत नाहीत. लोकांना भीती वाटते आमच्यामागे अतिरेकी येतील, आम्हाला मारतील. आम्ही आमच्या गावी गेलो तरी हॉटेलमध्ये थांबावं लागतं. आम्हाला घरी थांबू देत नाहीत," ती सांगते.
 
देविकाचे वडील नटवरलाल यांनाही या गोष्टीचं दु:ख वाटतं.
 
"माझी आई वारली, तेव्हा आम्हाला आधी कुणी सांगितलं नाही. नंतर आम्ही तिथं गेलो, तेव्हा तीन दिवसांपेक्षा जास्त राहू दिलं नाही."
 
आपल्याला फोनवरून धमक्या येत होत्या, असंही ते सांगतात.
 
त्यामुळं नटवरलाल यांना आता आपल्या मुलीची चिंता वाटते... तिचं पुढं काय होणार? लग्न तरी होईल की नाही? त्यांचा ड्रायफ्रूट्सचा धंदा आता बंद पडला आहे. काही नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीनं रोटावन परिवार दिवस काढतो आहे.
 
आणि आता याचा फटका देविकाच्या शिक्षणालाही बसतो आहे. 26 नोव्हेंबरचा हल्ला होण्याआधी छोट्या देविकाला आईच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला होता. त्यामुळं तिचं शिक्षण सुरूच झालं नव्हतं. पण मग कोर्टात साक्ष दिल्यामुळं तर तिला शाळेत प्रवेश मिळणं आणखीनच कठीण गेलं.
 
पण देविका खंबीरपणे उभी आहे, अभ्यास करते आहे आणि नवी स्वप्नंसुद्धा पाहते आहे. "मला शिकून IPS ऑफिसर बनायचं आहे. कसाबसारख्या अतिरेक्यांना संपवायचं आहे," ती सांगते.
 
26/11च्या हल्ल्यामागे दोषी असलेल्या सर्वांनाच शिक्षा मिळेल, अशी तिला आशा वाटते. म्हणूनच तिला आपली जखम आणि तो दिवस विसरायचा नाही.
 
"आम्ही विसरलो तर याचा अर्थ होईल, की मी अतिरेक्यांना माफ केलं आहे. पण मी त्यांना माफ करू शकत नाही, जिवंत असेपर्यंत नाही."