शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (19:09 IST)

अमरावती लॉकडाऊन : ‘तुम्हाला समजून नाही राहिले ना भाऊ, काऊन फिरता, काय काम आहे तुम्हाले?

मयांक भागवत
बीबीसी मराठी अमरावतीहून
विदर्भातील अमरावती कोरोना व्हायरसचा हॅाटस्पॅाट बनलंय. कोरोना अमरावती शहर आणि ग्रामीण भागात इपाट्याने हातपाय पसरतोय. त्यामुळे प्रशासनाने आठवडाभर लॅाकडाऊन जाहीर केलाय. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
अमरावतीत वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणं जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान का असणार आहे. हे मला अमरावतीत पहिल्या दिवशी फिरतानाच समजलं.
 
एटीच्या प्रवासात आलेले अनुभव
नागपुरहून मी अमरावतीला जाण्यासाठी एसी पकडली. ग्रामीण भागात ही लालपरी लोकांचं ऐकमेव प्रवासाचं साधन आहे.
 
बसमध्ये आम्ही 10 प्रवासी असू. मास्क महत्त्वाचा का आहे याबाबत अजूनही लोकांना गांभीर्य नाही हे दिसून आलं. काही प्रवासी विनामास्क बसले होते. तर काहींनी मास्क हनुवटीवर ठेवले होते.
 
एक सहप्रवासी 3 वर्षांच्या मुलाला घेऊन प्रवास करत होता. मी सहजच विचारलं, मास्क नाही घातलं. तर, म्हणाला "मास्कमध्ये लई त्रास होते भाऊ. श्वास कोंडल्यासारखं वाटतं. म्हणून घातला नाही."
 
प्रवासात खरंतर लोकांनी मास्क वापरायला हवा. पण लोकांना याचं गांभीर्य अजूनही कळालेलं नाही. या व्यक्तीचा 3 वर्षांचा मुलगाही विनामास्क बसला होता. मी जास्त काहीच बोललो नाही कारण, मास्क घाला असं सांगणं लोकांना अजिबात आवडत नाही.
 
हा प्रवासी पुढे उतरला पण चेहऱ्यावर मास्क नव्हता.
 
एसटीची परिस्थिती
अमरावतीत एका आठवड्याचा लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बस कंडक्टरने मला सांगितलं "तुम्हाले रहाटगावले उतरावं लागीन. लॅाकडाऊनमुळं बस शहराले जात नाही."
 
माझ्यासोबत अमरावतीला जाणारे 3-4 प्रवासी रहाटगावला उतरले. पण पुढे शहरात जाण्याचा प्रश्न होता. तुकळक रिक्षा होत्या. त्यामुळे काहींनी आपल्या कुटुंबातील लोकांना घेण्यासाठी बोलावलं होतं.
 
शहरात जाता येईल का? कसं जाणार? याची चिंता लोकांना होती.
 
अमरावती शहरात लॅाकडाऊन असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस शहरात जात नाहीत. लोकांना हायवेवर उतरावं लागत होतं.
 
काही बसेस शहरात येताना पाहायला मिळाल्या. दिवसभरात फक्त 20-25 बसेस शहरात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
 
एरव्ही प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटीस्टॅंडवर मंगळवारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी होते. अनेक प्रवासी बस नसल्याने पुन्हा घरी परत जाताना पाहायला मिळाले.
 
शहरातील दुकानं आणि मार्केट बंद
शहरातील इतवारी बाजारपेठ ज्याला शहरातील किराणा बाजारपेठ म्हणून ओळखलं जात. या भागात पूर्ण लॅाकडाऊन पाळण्यात आला होता.
 
दुकानं खुली ठेवण्याची वेळ संपल्यानंतर एकही दुकान उघडं पाहायला मिळालं नाही. फक्त मेडिकलची दुकानं दिवसभर सुरू होती.
 
हीच परिस्थिती कॅाटन मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकमल चौक आणि जयस्तंभ भागातील होती.
 
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. मोठे मॅालही बंद आहेत.
 
अमरावती शहरातील मोठी हॅाटेल बंद करण्यात आली आहेत. जेवणातच्या लहान हॅाटेलला फक्त पार्सल देण्याची परवानगी आहे. त्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांचे लोक बाईकवरून फिरताना आढळून आले.
 
रस्त्यावर फिरणारे लोक आणि पोलिसांची घरपकड
शहरात कडक लॅाकडाऊन करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पंचवटी चौकात पोलिसांची नाकाबंदी दिसून आली. प्रत्येक बाईक आणि गाडीची चौकशी करण्यात येत होती.
 
रुग्णालयात जाणारे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामान घेण्यासाठी बाहेर पडलेले लोक यांना विचारपूस केल्यानंतर सोडून देण्यात येत होतं.
पण महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडलेल्यांवर कारवाई होत होती. दोन रिक्षा चालकांना पोलिसांनी पकडलं होतं. एक रिक्षाचालक पोलिसांना कारवाई न करण्याची विनवणी करत होता.
 
"रोजीचं पोट हाय. काय करणार साहेब... करावे लागीन ना मले. इकवार माफ करा," असं तो रिक्षाचालक म्हणत होता. पण, विनाकारण लॅाकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलीस कारवाई करत होते.
 
काही लोक पोलिसांना चकवा देऊन भरधाव वेगाने बाईक चालवत पळूनही गेले.
 
स्थानिक लोक सांगतात, पहिला लॅाकडाऊन पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. या आठवड्यांतही तसंच केलं तर कोरोना नियंत्रणात येईल.
 
राजकमल चौक आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. आम्हालाही गाडीतून फिरताना तीन वेळा पोलिसांनी थांबवून विचारणा केली.
 
मास्कबाबत जागृती नाही
बाईकवरून जाणारे, गाडी चालवणारे अनेक लोकांच्या हनुवटीवर मास्क असल्याचं दिसून आलं. काहींच्या तोंडावर पूर्ण मास्क होता.
 
स्थानिक डॅाक्टर सांगतात, लोकांमध्ये मास्क घालण्याबाबत अजूनही गांभीर्य नाहीये. याचाच परिणाम या शहराला भोगावा लागत आहे.
 
या शहरात कुणीच हेल्मेट घालत नाही. डोक्यावर पांढरा गमचा घालून लोक फिरतात. काही हाच गमचा तोंडावर गुंडाळतात. मास्क म्हणून याचाच वापर करतात.
 
पोलीस दिसले की लोक मास्क तोंडावर घेतात. पुन्हा मास्क हनुवटीवर येतोच.
 
शहरातील एका रस्त्यात मुलं क्रिकेट खेळत होती. लॅाकडाऊन असल्याने रस्ता पीच बनला होता. पण पुन्हा परिस्थिती जैसे-थे. मुलांनी मास्क घातला नव्हता.
 
शहरात काही प्रमाणात लोक कारवाईच्या भीतीने मास्क घालताना दिसत आहेत. पण ग्रामीण भागात लोक अजूनही विना मास्क फिरत आहेत.
 
लोकांनी मास्कचा वापर करावा यासाठी कडक पावलं उचलण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.
 
अमरावती रेल्वे स्टेशनवर सामान्य दिवसात खूप गर्दी असते. मात्र मंगळवारी रेल्वे स्टेशन परिसरात चिटपाखरू नव्हतं. लॅाकडाऊनचा परिणाम दिसून येत होता.
 
पोलीस आणि बाईकवरून जाणाऱ्यांची चर्चा
"तुम्हाला समजून नाही राहिले ना भाऊ. काऊन फिरता. काय काम आहे तुम्हाले. काय बी सांगता." आशा आशयाची थोडी चर्चा होते आणि मग पोलीस समज देऊन सोडून देतात.
 
पोलीस कर्मचाऱ्यांवर खूप ताण आहे. ते सांगतात "कोणाला सांगायचं लोक ऐकत नाहीत. काय करणार? आम्हालाही भीती वाटते. कारवाई करावी लागते. पण दंडुका घेऊन नेहमीच चालत नाही. काही लोक असताताच नियम मोडणारे."