शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडियम: जगातल्या सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम तुम्ही पाहिलंत का?

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असं वर्णन होणाऱ्या मोटेरा अर्थात सरदार पटेल स्टेडियमवर काही दिवसातच 2 टेस्ट आणि 5 ट्वेन्टी-20 होणार आहेत.
 
गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन झालं होतं. नमस्ते ट्रंप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांचं स्वागत केलं होतं. या सोहळ्याला ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप, मुलगी इव्हान्का ट्रंप, जावई जेरड कुश्नर हे उपस्थित होते.
 
आतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला सगळ्यात मोठ्या स्टेडियमचा मान होता. मात्र आता सरदार पटेल स्टेडियम जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम झालं आहे. या मैदानावर 1,10,000 लाख प्रेक्षक मॅचचा आनंद घेऊ शकतात.
तब्बल 63 एकर क्षेत्रफळावर हे मैदान पसरलं आहे. या मैदानाच्या निर्मितीसाठी तब्बल 700कोटीहून अधिक खर्च आला आहे.
 
आधीचं स्टेडियम पूर्णत: पाडून नव्याने या मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची पॉप्युलस आणि भारतातील लार्सन अँड टुब्रो यांनी या मैदानाची निर्मिती केली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचं हे मुख्यालय असणार आहे.
 
नव्या मोटेरा स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्सेस आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं क्लब हाऊसही स्टेडियच्या प्रांगणात आहे. ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आहे. प्रत्येक स्टँडमध्ये फूड कोर्ट आणि हॉस्पिटॅलिटी एरिया तयार करण्यात आला आहे.
 
स्टेडियमच्या परिसरातच क्रिकेट अकादमी आणि सरावासाठी खेळपट्ट्या आहेत. मॅचसाठी येणाऱ्या प्रेक्षकांना त्रास होऊ नये यासाठी 3,000 चारचाकी आणि 10,000 दुचाकी राहतील एवढी पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे.
 
गुजरात सरकारने 1982 मध्ये शंभर एकर जागा दिली आणि त्यातून जुनं मोटेरा स्टेडियम उभं राहिलं. त्याआधी शहरातल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्टेडियममध्ये मॅचेस व्हायच्या. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत मोटेराची उभारणी झाली होती. मृगेश जयकृष्ण या बीसीसीआयच्या माजी उपाध्यक्षांची भूमिका मोटेराच्या उभारणीत निर्णायक ठरली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. हे स्टेडियम त्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे.
 
जुन्या मोटेरा मैदानावर पहिली मॅच 1984-85मध्ये खेळवण्यात आली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली मॅच भारताने गमावली होती.
 
मोटेरा स्टेडियम हे आयसीसीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचं केंद्र राहिलं आहे. 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2011 वर्ल्डकपचे सामने या स्टेडियमवर खेळवण्यात आले होते.
 
याच मैदानावर भारतीय संघाने 2011 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व फेरीत नमवत दिमाखदार विजयाची नोंद केली होती.
 
आतापर्यंत या मैदानावर 12 टेस्ट खेळवण्यात आल्या असून, त्यापैकी फक्त 4मध्येच भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.
 
या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र या सामन्यात कपिल देव यांनी एका डावात 9 विकेट्स घेण्याची किमया केली होती.
 
वेंकटपथी राजू यांनी /याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळताना 11विकेट्स घेतल्या होत्या. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी दीडशतकी केली होती.
जवागल श्रीनाथ यांनी याच मैदानावर 1996 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना चौथ्या डावात 21 रन्समध्ये 6 विकेट्स घेत भारतीय संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 170 रन्सचं लक्ष्य होतं मात्र श्रीनाथ यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने विजय साकारला. याच सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मणने पदार्पण केलं होतं.
 
2001मध्ये या मैदानावर इंग्लंडच्या क्रेग व्हाईटने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतकी खेळी केली होती. अनुभवी सलामीवीर बॅट्समन मार्कस ट्रेस्कोथिकचं शतक अवघ्या एका रनने हुकलं होतं.
 
2003मध्ये राहुल द्रविडने या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात आकाश चोप्रा आणि लक्ष्मीपती बालाजी यांनी पदार्पण केलं होतं.
 
2005 मध्ये हरभजन सिंगने श्रीलंकेविरुद्ध 10 विकेट्स घेत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला होता.
 
2008मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डावाने पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाचा पहिला डाव 76 रन्समध्येच आटोपला. डेल स्टेनने 5विकेट्स घेतल्या होत्या. एबी डिव्हिलियर्सने 217 रन्सची मॅरेथॉन खेळी साकारली. जॅक कॅलिसनेही शतक केलं होतं.
 
2009 मध्ये भारत-श्रीलंका टेस्ट अनिर्णित झाली. यामध्ये भारताकडून राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी केल्या. श्रीलंकेकडून महेला जयवर्धने आणि प्रसन्न जयवर्धने यांनी सहाव्या विकेटसाठी 351रन्सची विक्रमी भागादारी केली. महेलाने 275रन्सची तर प्रसन्नने नाबाद 154 रन्सची खेळी केली. यानंतर गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर यांनीही शतकी खेळी केल्या होत्या.
2010 मध्ये न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने याच मैदानावर पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने शतकी खेळी केली. या सामन्यात भारताकडून वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, हरभजन सिंग यांनी शतकी खेळी केल्या.
 
या मैदानावर झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराने द्विशतकी खेळी केली होती. अलिस्टर कुकने फॉलोऑन मिळालेल्या डावात 176रन्सची दिमाखदार खेळी केली होती.
या मैदानावर टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स राहुल द्रविडच्या (771) नावावर आहेत तर सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळे (36) यांच्या नावावर आहेत.
 
या मैदानावर आतापर्यंत 24वनडे तर एकमेव ट्वेन्टी-20 खेळवण्यात आली आहे.
 
सुनील नरिनने याच मैदानावर 5 डिसेंबर 2011रोजी वनडे पदार्पण केलं आहे.
 
2011 वर्ल्डकप स्पर्धेत रिकी पॉन्टिंगच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 260 रन्स केल्या. युवराज सिंह आणि सुरेश रैना यांनी सहाव्या विकेटसाठी केलेली 74रन्सची भागीदारी संस्मरणीय ठरली.
 
2002 मध्ये वेस्ट इंडिजने ख्रिस गेलचं शतक आणि रामनरेश सरवानच्या 99रन्सच्या बळावर 324 रन्सचा डोंगर उभारला. भारतीय संघाने राहुल द्रविडचं शतक आणि संजय बांगरच्या 41बॉलमध्ये 57 रन्सच्या खेळीच्या आधारे थरारक विजय मिळवला.
 
या मैदानावर वनडेत सर्वाधिक रन्स राहुल द्रविड (342) तर सर्वाधिक विकेट्स कपिल देव (10) यांच्या नावावर विकेट्स आहेत.
 
या मैदानावरील संस्मरणीय क्षण
लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध 1986-87मध्ये खेळताना टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन्सचा टप्पा ओलांडला होता.
 
भारताचे वर्ल्डकपविजेते कर्णधार आणि सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी याच मैदानावर न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हॅडली यांचा 431 विकेट्सचा विक्रम मोडला होता.
 
ऑक्टोबर 1999 मध्ये सचिन तेंडुलकरने याच मैदानावर कारकीर्दीतलं पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं होतं.