1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (19:09 IST)

संजय राठोड समर्थकांवर कारवाई करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश

Uddhav Thackeray orders action against Sanjay Rathore supporters
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशारीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
 
त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
 
आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले.
या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
 
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.