सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:16 IST)

रितेश देशमुख राजकारणात उतरण्याची तयारी करत आहेत का ?

हर्षल आकुडे
रितेश देशमुख यांची महाराष्ट्रासह देशातली ओळख ही अभिनेता म्हणून आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
 
तेव्हापासून आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 2014 ला आलेल्या 'लय भारी' या अॅक्शनपॅक चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला.
 
रितेशचा 'हाऊसफुल 4' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या प्रमोशनसाठी रितेश देशमुख आपल्या सहकलाकारांसोबत ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. पण चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच निवडणुकीला उभ्या असलेल्या आपल्या दोन भावांसाठीही तो जोरदार प्रचार करतानाही दिसत आहेत.
 
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना तीन मुलं. थोरले अमित देशमुख गेली दहा वर्षे आमदार आहेत. रितेश यांनी बॉलीवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे. तर जिल्हा परिषद सदस्य असलेले धीरज पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.
 
विधानसभा निवडणुकीत अमित देशमुख हे लातूर शहर तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून उभे आहेत. दोघांच्याही प्रचारात देशमुख कुटुंबीय आक्रमकपणे उतरले आहेत. नुकत्याच आयोजित एका प्रचारसभेत रितेश देशमुख यांनी आपल्या भावांच्या प्रचारासाठी एक तडफदार भाषण केलं.
सोप्या गोष्टींची सवय नाही
आपल्या भाषणादरम्यान रितेश यांनी म्हटलं, "लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघांना प्रचंड मोठा वारसा आहे. विलासराव देशमुख, शिवराज पाटील-चाकूरकर आणि दिलीपराव देशमुख यांचा वारसा या मतदारसंघांना लाभला आहे. आपले आमदार अमित देशमुख आणि आज धीरज देशमुखसुद्धा हा वारसा चालवणार आहेत, याची ग्वाही मला तुमच्या उत्साहात दिसते."
 
"मुंबईत असताना बऱ्याच वेळा मला लोकांनी विचारलं,की यावेळी निवडणुकीला उभे राहणार आहात का? अवघड परिस्थिती आहे. त्यावेळी मी म्हटलं, अवघड परिस्थिती असली तर काय झालं? आम्ही लातूरकर आहोत, सोप्या गोष्टींची आम्हाला सवय नाही. तुमचा आशीर्वाद असेल, प्रेम असेल आणि विश्वास असेल तर इथं कुठलीही गोष्ट अडचणीची आहे, असं मला वाटत नाही."
राजकीय परिस्थितीवर भाष्य
भाषणात रितेश यांनी पुढं म्हटलं, "आमचा व्यवसाय अॅक्टींगचा आहे. आम्हाला मेकअप करून कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागतं. तेव्हाच चांगलं दिसतो. यांच्या रस्त्यात इतके खड्डे आहेत. निवडणुकांपूर्वी हे खड्डे भरतील. हे म्हणजे मेकअप करण्यासारखं आहे. मेकअप किती जरी चांगला असला तरी तो खरा चेहरा लपवू शकत नाही. तुमचा खरा चेहरा लोकांसमोर येणार आणि आलेला आहे. मी विरोधकांना सांगू इच्छितो, की तुम्ही आता काळजी करा."
 
बॉलीवूड अभिनेते राजकीय घडामोडींवर भाष्य करणं सहसा टाळताना दिसतात. पण रितेश देशमुख सडेतोड भाषणं करतात. गेल्या काही काळात तसंच यंदाच्या निवडणुकीत ते बऱ्यापैकी सक्रीय झाले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीकाही करताना दिसतात. एरवी फक्त आकर्षक फोटों आणि चित्रपटविषयक प्रमोशनने भरलेलं त्यांचं ट्विटर अकाऊंट यंदा राजकीय पोस्टनी फुलून गेलं आहे.
बॉलीवूडवर लक्ष केंद्रीत
रितेश यांच्या राजकारणाच्या प्रवेशावर तसंच निवडणूक लढवण्याबाबत वारंवार चर्चा होत असतात. पण राजकारणात उतरण्याची त्यांची मानसिकता सध्यातरी नाही, असं सकाळचे वरीष्ठ पत्रकार हरी तुगावकर सांगतात.
 
त्यांनी सांगितलं, "राजकीय कुटुंबातून असल्यामुळे रितेशच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल बोललं जातं. पण सध्या रितेशनी अभिनय क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रीत केलेलं आहे. बहुतांश वेळ ते मुंबईतच असतात. रितेश देशमुखांना अनेकदा राजकारणावर प्रश्न विचारले जातात. आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या शक्यता त्यांनी त्या-त्या वेळी फेटाळून लावल्या आहेत."
 
लोकसभेची तयारी?
लोकसभा निवडणुकीपूर्वी रितेश देशमुख लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा होती. तेव्हा रितेश यांनी सध्या आपला तसा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं.
नुकत्याच झालेल्या भाषणातही रितेश यांनी म्हटलं, "विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत माहीममधून मला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे, अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. पण आपण लातूरचे आहे. आपली सुरूवात लातूरमध्ये झाली आणि शेवटही लातूरमध्येच होणार."
 
याचा अर्थ रितेश भविष्यात लातूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का, असा घेता येईल या प्रश्नाला उत्तर देताना तुगावकर यांनी लातूर मतदारसंघाची स्थिती समजावून सांगितली.
 
"2009 पासून लातूरचा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित झालेला आहे. त्यामुळे सध्यातरी इथे अजून दहा वर्ष तरी खुल्या प्रवर्गातील उमेदवार उभा राहू शकत नाही."
 
बिलकुल शक्यता नाही
रितेश देशमुख यांचे काका आणि माजी मंत्री दिलीप देशमुख यांनीही रितेश राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनाही रितेश राजकारणात येण्याची शक्यता नाही असं वाटतं.
 
ते सांगतात, "रितेशबाबत वारंवार अफवा पसवरल्या जातात. पण त्यांचा मार्ग वेगळा असल्याचं रितेशने आधीच सांगितलं आहे. मुळात त्यांच्या घरातील त्याचे दोन भाऊ राजकारणात असताना त्यांच्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध नाही. तो आपल्या भावांसाठी प्रचार करत असतो. प्रचार करणारे राजकारणात येतातच असं नाही किंवा प्रचार केला म्हणजे राजकारणात प्रवेश करणार आहे, असा अंदाज बांधू नये."
 
तुगावकर सांगतात, "अमित देशमुखांना विलासराव देशमुखांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. ते निवडणुकीला उभे आहेत. आता धीरज निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे सध्यातरी देशमुख कुटुंबातून या दोघांवरच लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
 
ते पुढे सांगतात, "पण राजकारणात परिस्थितीवरसुद्धा काही गोष्टी अवलंबून असतात. देशमुख हे मुळात राजकीय कुटुंब आहे. पुढच्या काळात राजकीय परिस्थिती कशी राहते त्यावरसुद्धा काही गोष्टी अवलंबून आहेत."