गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (12:21 IST)

काँग्रेस आमदार नसीम खान यांनी खरंच 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या? : बीबीसी फॅक्टचेक

काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात नसीम खान आपल्या प्रचार सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्यावर देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावा असं आव्हान देत आहेत.
 
हा व्हीडिओ व्हॉट्स अपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
 
व्हीडिओमध्ये मुंबईच्या चांदिवली भागाचे आमदार नसीम खान एका व्यासपीठावर उभे आहेत आणि तिथं अन्य काही लोक बसलेले दिसत आहेत.
 
परंतु आम्ही तपासणी केली असता, असं लक्षात आलं की व्हीडिओतल्या ठरावीक भागात बदल करण्यात आलेला आहे आणि हा व्हीडिओ चुकीच्या संदर्भात व्हायरल करण्यात आला आहे.
हा व्हीडिओ तीन वर्षं जुना असल्याचं बीबीसीने केलेल्या तपासणीत समोर आलं आहे.
 
व्हीडिओमध्ये 'मुशायरा मीडिया' नावाचं एक चिन्ह दिसत आहे. त्यावरून शोध घेतला असता यूट्यूबवर एक लिंक सापडते, ज्यावरून नसीम खान यांचं पूर्ण भाषण ऐकता येऊ शकतं.
 
व्हीडिओ प्रकाशित करणाऱ्या या अधिकृत पेजनुसार नसीम खान यांचा हा व्हीडिओ 13 मार्च 2016 रोजीचा आहे. मुंबईतील साकीनाका भागातील गुलिस्ताने उर्दू अदबद्वारे एका शायरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात काँग्रेस पक्षाचे आमदार नसीम खान मुख्य अतिथी होते.
या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, "दिल्लीमध्ये यमुना किनारी श्री श्री रविशंकर यांनी राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवणार का, असं मला मोदींना विचारायचं आहे. मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावं."
 

नसीम खान यांच्या या वक्तव्याची मोडतोड करून चुकीच्या संदर्भात तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.
 
या व्हीडिओबद्दल बीबीसीनं नसीम खान यांच्याशीही संपर्क साधला. ते म्हणाले की, "व्हायरल झालेला व्हीडिओ खोटा आहे. त्याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगासह साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे."
 
"विधानसभा निवडणुकांमध्ये माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची कृती केली जात आहे," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.