शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (11:23 IST)

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीत तीन फूट खोल पुरलेल्या मडक्यात सापडलं जिवंत बाळ

उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये एका नवजात बालिकेला जिवंत पुरण्यात आल्याचं उघडकीला आलं आहे.
 
या तान्ह्या मुलीचे पालक कोण आहेत आणि कोणी तिला पुरण्याचा प्रयत्न केला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. बालिकेला 3 फूट खोल कबरीत पुरण्यात आलं होतं, असं बरेलीचे पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितलं.
 
एका गावकऱ्याने या तान्ह्या मुलीची सुटका केली. बरेलीतल्या रुग्णालयात सध्या या बाळावर उपचार करण्यात येत आहेत. चिमुकलीची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
प्रकरण कसं उघडकीस आलं?
बरेलीचे गावकरी दफनभूमीत गेले होते. त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा दवाखान्यातच मृत्यू झाला होता. स्वत:च्या मुलीला दफन करण्यासाठी 'तो' गावकरी कबर खणत होता. तेव्हा तीन फूट खड्डा खणल्यानंतर एका मडक्यात हे बाळ ठेवलेलं सापडलं, असं पोलिसांनी सांगितलं.
 
"बाळाला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तिथं तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आम्ही या बाळाच्या पालकांचा शोध घेत आहोत. हे सगळं जाणूनबुजून केलं असावं असा आम्हाला संशय आहे," असं सिंह यांनी सांगितलं.
 
याआधीही असे प्रकार घडले
2012 आणि 2014 मध्ये लहान मुलीला जिवंत पुरण्याच्या घटना समोर आल्या होत्या. 2012मध्ये उत्तर प्रदेशातल्याच एका तान्ह्या मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी तिला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला होता. एका आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यावरून असं करण्यात आलं होतं. आपल्या इतर मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी तान्ह्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केला होता.
 
तर 2014 मध्येही उत्तर प्रदेशात 7 वर्षांच्या मुलीला पुरण्याचा प्रयत्न केला होता. मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केलं होतं. तेव्हा गावकऱ्यांनी तिची सुटका केली होती.