रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (16:45 IST)

IRCTC च्या शेअर्सची नोंदणी : भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग कंपनीच्या शेअर्सविषयी जाणून घ्या

इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' (IRCTC) च्या शेअर्सची आज (14 ऑक्टोबर) BSE आणि NSE मध्ये नोंदणी झाली. म्हणजेच आजपासून हे शेअर्स ट्रेंडिंगसाठी खुले झाले.
 
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी खुल्या असणाऱ्या या आयपीओसाठी तब्बल 112 पटींनी जास्त अर्ज आले होते. म्हणजेच हा आयपीओ 112 पट 'ओव्हरसबस्क्राईब' झाला होता.
 
अर्ज करणाऱ्यांना 320 रुपये प्रति शेअरच्या किंमतीनुसार हे शेअर्स अलॉट करण्यात आले तर मुंबई शेअर बाजारात - BSE मध्ये आज या शेअर्सची 644 रुपये किमतीनं नोंदणी करण्यात आली.
 
राष्ट्रीय शेअर बाजारात- NSE मध्ये या IRCTCच्या शेअर्सची नोंदणी 626 रुपयांनी करण्यात आली आहे. म्हणजे IRCTCच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे पहिल्याच दिवशी जवळपास दुप्पट झालेले आहेत.
 
IRCTC च्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजेच संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असलेल्या शेअर्ससाठी 109 पटींनी जास्त मागणी आली होती. तर लहान गुंतवणूकदारांसाठीच्या कॅटेगरीमध्ये 15 पटींनी जास्त अर्ज आले. बिगर संस्थात्मक गुंतवणूकादारांसाठीच्या हिश्श्यासाठी 355 पटींनी जास्त अर्ज आले होते.
 
या आयआससीटीच्या एका शेअरची किंमत रु.320 ठरवण्यात आली. पण लहान गुंतवणूकदारांना हे शेअर्स 10 रुपयांच्या सवलतीने देण्यात आल्याने 310 रुपये प्रति शेअरने हे समभाग लहान गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत.
IRCTC ही कंपनी भारतीय रेल्वेला अधिकृतपणे अन्न, बाटलीबंद पाणी आणि ऑनलाईन तिकीट विक्री सेवा पुरवते. देशभरातल्या रेल्वे स्टेशन्समध्ये आणि रेल्वेगाड्यांमध्ये ही कंपनी 'खानपान' सेवा पुरवते.
 
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात IRCTCचा IPO बाजारात आला होता.
 
आर्थिक वर्ष 2019-2020साठीच्या सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमानुसार हे समभाग (शेअर्स) विकले जाणार होते. कंपनीचे कर्मचारी, किरकोळ गुंतवणूकदार यांना अंतिम मूल्यापेक्षा सवलतीच्या दरात हे शेअर्स देण्यात आले.
 
3 ऑक्टोबरपर्यंत हा IPO खुला होता .
 
IRCTC च्या आयपीओबद्दल...
 
या IPO द्वारे 2 कोटी 1 लाख 60 हजार शेअर्सची विक्री करण्यात येणार होती. कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी हा 12.60% हिस्सा होता. या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू (Face Value) होती 10 रुपये. फेस व्हॅल्यू म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअरची मूळ किंमत जिची नोंदणी सर्टिफिकेटवर असते.
 
विक्रीसाठीच्या या एकूण शेअर्सपैकी 1 लाख 60 हजार इक्विटी शेअर्स हे पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले.
 
कंपनीचे किरकोळ गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'ऑफर प्राईस' वर 10 रुपयांची सवलत मिळाली. ऑफर प्राईस म्हणजे IPO दरम्यान ज्या किंमतीला शेअर्स देण्यात येतात, ते मूल्य.
 
या IPOसाठी शेअर्ससाठी 315-320 रुपयांचा प्राईस बँड ठरवण्यात आला होता. म्हणजेच या शेअर्ससाठी अर्ज करणाऱ्यांनी 315 ते 320 रुपयांच्या दरम्यान बोली लावायची होती.
 
या समभाग विक्रीद्वारे 640 कोटी रुपयांचं भांडवलं उभं करण्याचं उद्दिष्टं होतं. समभाग विक्रीतून मिळणारे हे पैसे IRCTCला मिळणार नाहीत तर हे पैसे समभाग विक्री करणाऱ्या भारत सरकारच्या खात्यात जमा होणार होते.
IRCTC नेमकं काय काम करते?
IRCTC ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही कंपनी येते. देशभरातल्या रेल्वेगाड्यांमध्ये आणि स्टेशन्सवर खानपान सेवा देण्याचे अधिकार अधिकृतपणे फक्त या कंपनीला देण्यात आले आहेत. 'रेल नीर' या ब्रँडने IRCTCचं बाटलीबंद पाणी विकलं जातं.
 
शिवाय ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सेवाही हीच कंपनी पुरवते. irctc.co.in या वेबसाईटवरून वरून ऑनलाईन रेल्वे बुकिंग करता येतं. 'Rail Connect' या अॅप द्वारेही बुकिंग सेवा उपलब्ध आहेत.
 
याशिवाय ही कंपनी पॅकेज डील्स, बजेट हॉटेल बुकिंग्स, लाऊंज सेवाही देते.