मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (12:22 IST)

जपान हगीबिस चक्रीवादळ : एक ब्लँकेट आणि एका बिस्किटाच्या आधारे काढावी लागली रात्र...

"मी आणि माझी वहिनी घरात होतो. ती विकलांग आहे. पुराचा फटका आमच्या घरालाही बसू शकत होता. आम्हाला या ठिकाणी एक ब्लँकेट आणि खायला एक बिस्कीट दिलं," जेम्स बॅब सांगत होते.
 
जपानला हगीबिस वादळाचा तडाखा बसला आहे. वादळामुळे झालेला तुफान पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे जपानमधील जनजीवन विस्कळीत झालंय. अनेकांची घरं उद्धवस्त झाली आहेत. जेम्स त्यांपैकीच एक.
 
जेम्स सध्या पश्चिम टोकियोमधील हाचिओजी निवारा गृहात आहेत. त्यांच्या घराजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आला होता. त्यामुळे त्यांना निवारा गृहात हलवण्यात आलं.
 
टोकियोच्या उत्तर भागातील तोचिगीमध्ये राहणारे अँड्र्यु हिगिन्स हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. गेल्या सात वर्षांपासून जपानमध्ये राहणाऱ्या हिगिन्स यांनी यापूर्वी आलेली चक्रीवादळंही अनुभवली आहेत.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मला वाटतंय, की जपाननं यावेळेस चक्रीवादळाचा अधिक गांभीर्यानं विचार केला होता. वादळ धडकण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत लोक तयारी करत होते. या काळात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी लोकांनी जमवून ठेवल्या होत्या."
 
गेल्याच महिन्यात फक्साई नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा जपानला बसला होता. या वादळामध्ये 30 हजार घरांचं नुकसान झालं होतं. त्यातील अनेक घरं अजूनही तशाच अवस्थेत आहेत.
 
"गेल्या वादळातच माझ्या घराचं छप्पर उडालं होतं. त्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये यायला लागलं. माझ्या घराचं काय होणार, याची मला काळजी आहे," 93 वर्षांचे वृद्ध सांगत होते. ते चिबामधल्या तातेयामातल्या निवारा गृहात राहत आहेत.
साठ वर्षांतलं सर्वात विध्वंसक वादळ
जपानला हगीबिस चक्रीवादळाने झोडपलं असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत.
 
गेल्या 60 वर्षांतलं हे सगळ्यात विनाशकारी वादळ आहे. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे.
 
जपानमध्ये या वादळानं आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला आहे. या वादळाच्या धक्क्यातून जपान हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
 
ताशी 225 किलोमीटर वेगानं हे वादळ जपानच्या किनाऱ्यावर धडकलं आहे.
 
जपानमध्ये जवळपास 14 ठिकाणी नद्यांनी आपली पात्रं ओलांडली आहेत.
 
हगीबिस उत्तर दिशेकडे सरकत असून रविवार (13 ऑक्टोबर) पर्यंत हे वादळ उत्तर पॅसिफिकडे सरकेल.
शनिवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता चक्रीवादळाने जपानला लक्ष्य केलं. नागनो, टोकियो आणि हाकोनला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जवळपास पाच लाख घरांमधला वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. माउंट फुजीजवळ असलेल्या हाकोनमध्ये शुक्रवार (11 ऑक्टोबर) आणि शनिवारी (12 ऑक्टोबर) विक्रमी पाऊस झाला.
 
उत्तर नागानो प्रांतातील चिकुमा नदीच्या काठावर असलेल्या रहिवासी निवासी भागांत, घरांमध्ये घुसलेलं पाणी काढण्यासाठी प्रयत्न करत होते. नद्यांमधील पाण्याची पातळी आता कमी होत असल्याचं वृत्त बीबीसीच्या रुपर्ट विंगफिल्ड-हेस यांनी दिलं आहे.
 
भूस्खलनामुळं काही मृतदेह दबलेले असू शकतात तर पाण्याची पातळी वाढल्यामुळं काही जण त्यांच्या कारमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेले असतील, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
 
15 लोक अजूनही बेपत्ता आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
 
वादळाला सामोरं जाण्यासाठी काय तयारी?
चक्रीवादळ जपानच्या दिशेनं सरकत असताना जवळपास 70 लाख लोकांना त्यांची राहती घरं सोडण्याची सूचना करण्यात आली होती.
 
पन्नास हजार लोकांनी निवारा गृहात आश्रय घेतला.
 
चक्रीवादळाचा इशारा मिळाल्यानंतरच अनेक नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा करायला सुरूवात केली. त्यामुळे अनेक सुपर मार्केट्स ओस पडले होते.
 
अनेक बुलेट ट्रेनची सेवा थांबविण्यात आली होती. त्याचप्रमाणे टोकियोमधील मेट्रो सेवाही शनिवारपासून (12 ऑक्टोबर) ठप्प होती. एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली.
 
जपानमध्ये सध्या रग्बी वर्ल्ड कप सुरू आहे. चक्रीवादळामुळे इंग्लंड-फ्रान्स आणि न्यूझीलंड-इटली हे सामने रद्द करण्यात आले. या स्पर्धेच्या 32 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सामने रद्द झाले आहेत.