1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (09:38 IST)

नरेंद्र मोदींनी स्तुती केलेल्या अकोल्यातील शेतकऱ्यावर का आली आत्महत्येची वेळ?

ashok chouhan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर सरकारी अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यामधून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता दिसून येत असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली.  
 
राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे सोमवारी (5 ऑगस्ट) अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केलं होतं. या घटनेवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
"त्या सहा शेतकऱ्यांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर 'मराठा'नावाचं हॉटेल आहे. नोटाबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्या काळात मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती," असं चव्हाण यांनी सांगितलं. त्यांच्या याच कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनीच 'मन की बात'मधून घेतली होती.