शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:38 IST)

आसाम विधानसभा निवडणूक : भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मिळाल्याने गोंधळ, चार अधिकारी निलंबित

दिलीप कुमार शर्मा
आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (1 एप्रिल) मतदान झालं. यादरम्यान काही ठिकाणी तुरळक स्परुपात हिंसाचाराच्या घटना घडल्या.
पण सर्वांत मोठा वाद ईव्हीएमच्या संदर्भात निर्माण झालेला आहे. मतदान झाल्यानंतर संबंधित ईव्हीएम भाजप उमेदवाराच्या वाहनात आढळून आल्यामुळे याठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर चार मतदान अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची माहिती मिळाली आहे.
तसंच या मतदान केंद्रात नव्याने मतदान करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
1 एप्रिल रोजी आसाममधील 39 जागांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर काहीच तासांनी एक व्हीडिओ व्हायरल होऊ लागला.
एका खासगी वाहनातून ईव्हीएम घेऊन जात असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसून येत होतं.
आसामचे ज्येष्ठ पत्रकार अतानु भुयां यांनी या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी ट्वीट करताना लिहिलं, "पथारकांदी येथे भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम आढळून आल्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे."
 
गाडी कुणाच्या मालकीची?
सदर घटना बराक घाटी परिसरातील करीमगंज येथे कानीसेल भागात घडली आहे.
याठिकाणी स्थानिकांनी एका पांढऱ्या बोलेरो कारमध्ये कथित ईव्हीएम मशीन पाहिली होती.
ही गाडी भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची पत्नी मधुमिता पॉल यांच्या नावावर आहे.
या व्हीडिओत स्थानिक नागरिक कृष्णेंदू यांच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याचं सांगत आहेत. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ते या घटनेची माहिती देत आहेत.
राहुल गांधी, प्रियांका गांधी, बदरुद्दीन अजमल यांचं प्रश्नचिन्ह
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर सोशल मी़डियावर या प्रकाराची चर्चा रंगली आहे. लोक प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी हा व्हीडिओ शेअर केला. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
प्रियांका गांधी यांनी ट्वीट करताना लिहिलं, "प्रत्येक वेळी निवडणुकीदरम्यान खासगी वाहनांतून ईव्हीएम घेऊन जातानाचे, त्यांना पकडण्यात आल्याचे व्हीडिओ समोर येतात. ही वाहनं साधारणपणे भाजप उमेदवारांची किंवा त्यांच्या सहयोगींची असतात. अशा प्रकारच्या घटनांची माहिती मिळते. पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.
तर काँग्रेस नेते राहुल गांधींनीही याबाबत ट्वीट केलं. ते म्हणाले, "निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी खराब, भाजपची नीयत खराब आणि लोकशाहीची परिस्थिती खराब."
हे प्रकरण समोर आल्यानंतर AIUDF चे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी ट्विट करून लिहिलं, "ध्रुवीकरण, मतखरेदी, उमेदवार खरेदी, दोन मुख्यमंत्री, CAA असा सगळ्या बाजूंनी अपयशी ठरल्यानंतर ईव्हीएम चोरी करणं हा शेवटचा उपाय आहे. ही लोकशाहीची हत्या आहे.
 
निवडणूक आयोगाने अहवाल मागवला
संबंधित घटनेचा व्हायरल व्हीडिओ समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने आसामच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याचा सविस्तर अहवाल मागितला आहे.
आसामच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या एका अहवालानुसार, मतदान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच पुढील तपासही करण्यात येत आहे.
1 एप्रिल रोजी 9 वाजण्याच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांचं वाहन खराब झालं होतं. त्यावेळी क्षेत्र अधिकाऱ्यांनी पर्यायी वाहनाची व्यवस्था आहे किंवा नाही त्याचा शोध घेतला. मतदान प्रतिनिधीने एका गाडीची सोय केली. पण ती गाडीची मालकी कुणाची आहे, हे तपासलं नाही, असं त्या अहवालात म्हटलं आहे.
 
भाजप जिल्हाध्यक्षांचं म्हणणं काय?
करीमगंजचे भाजप जिल्हाध्यक्ष सुब्रत भट्टाचार्य यांनी या घटनेबाबत बीबीसीला प्रतिक्रिया दिली.
ते म्हणतात, "लोक या घटनेची माहिती नसताना बिनबुडाचे आरोप करत आहेत. आमच्या पक्षाची यावर कोणतीच प्रतिक्रिया नाही. रस्त्यात अधिकाऱ्यांचं वाहन नादुरुस्त झालं होतं. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका वाहनातून लिफ्ट घेतली, अशी ही घटना आहे.
"खासगी गाडीत फक्त एक वाहनचालकच होता. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसह संपूर्ण स्टाफ गाडीत बसले. पण काही वेळाने काही असामाजिक तत्वांनी गाडी थांबवली. या घटनेला वेगळं रंग देण्यात आलं. त्यांनी गाडीची तोडफोड करून लोकांना मारहाणही केली.
या संपूर्ण प्रकरणावर भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची प्रतिक्रिया मिळवण्याचाही बीबीसीने प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.