मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:12 IST)

कोरोना : 24 तासात 89,129 रुग्णांची नोंद, सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच इतके रुग्ण

गेल्या 24 तासात (3 मार्च) भारतात कोरोनाचे 89 हजार 129 रुग्ण रुग्ण सापडले. 2020 च्या सप्टेंबर महिन्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येत रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 714 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 इतकी झाली असून, यातील 6 लाख 58 हजार 909 सक्रीय कोरोनाग्रस्त आहेत.
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 1 लाख 64 हजार 110 जणांचा मृत्यू झाला, तर 1 कोटी 15 लाख 69 हजार 241 जण उपचारानंतर बरे झाले.
भारतात आतापर्यंत 7 कोटी 30 लाख 54 हजार 295 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू, मुंबईत आठनंतर मॉल्स बंद
राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.
27 मार्च (रात्री 12वाजल्यापासून), रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास, 1 हजार रुपये दंड बजावण्यात येणार आहे.
सर्व सार्वजनिक ठिकाणं 27 मार्चपासून रात्री आठ ते सकाळी सात बंद असतील.
मास्कविना आढळणाऱ्या व्यक्तीला 500रुपये दंड ठोठावण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला 1,000 रुपये दंड करण्यात येणार आहे.
गार्डन आणि चौपाट्या या पब्लिक जागा रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहतील. सिनेमा गृह, मॉल आणि हॉटेलं रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहणार मात्र होम डिलिव्हरी मात्र सुरू राहतील.
लग्न समारंभाला 50पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंत्यविधीला 20पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही.
विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक प्रशासनाला ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. क्वारंटीन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर तसं फलकाद्वारे सूचित करणं आवश्यक करण्यात आलं आहे. घरात क्वारंटीन व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात येणार आहे.
15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे.