मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (17:16 IST)

कोरोना व्हायरस : बेडसाठी आंदोलन करणाऱ्या कोव्हिड रुग्णाचा मृत्यू

नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी बेड मिळत नसल्याने एका कोरोनाबाधित रूग्णाने महानगरपालिकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले.
 
या रूग्णासह आणखी एक रूग्ण आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके होते. तीन दिवस सतत प्रयत्न करूनही या रूग्णांना बेड मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नाशिक महानगरपालिकेच्या परिसरात आंदोलन केल्यानंतर तातडीने अँब्युलन्स बोलवून त्यांना नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
 
यातले एक पेशंट बाबासाहेब कोळे यांचा त्याच रात्री मृत्यू झाला. त्यांची ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी होती. त्यामुळे प्रश्न उभा राहिला आहे की बाबासाहेब कोळेंच्या मृत्यूला जबाबदार कोण?
 
नक्की काय घडलं?
कोव्हीड पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवस त्यांना बेड मिळत नव्हता असं त्यांच्या घरच्यांनी म्हटलं आहे.
 
"आम्ही त्यांना दोन-तीन दिवसांपूर्वी बिटको हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथून दुसऱ्या दवाखान्यात गेलो, तिथून सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. मेडिकल कॉलेजने सांगितलं बेड नाहीये. आम्ही अनेक ठिकाणी गेलो पण बेड मिळाला नाही, शेवटी आम्ही सिव्हील हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना ऑक्सिजन सिलिंडर लावला," कोळेंच्या पत्नीने स्थानिक पत्रकारांना सांगितल्याचं NDTV ने म्हटलंय.
 
बाबासाहेब कोळे महानगरपालिकेत आले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल फक्त 38 असल्याच्या बातम्याही स्थानिक माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये नंतर अॅडमिट करण्यात आलं त्या हॉस्पिटल प्रशासनानेही म्हटलं की त्यांना दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.
 
त्यांची ऑक्सिजन लेव्हल 45 इतकी कमी होती. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले पण रात्री 1 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
 
स्थानिक प्रशासन सतत दावा करतंय की पुरेसे बेड उपलब्ध आहेत तरीही बाबासाहेब कोळेंवर ही वेळ का आली हा प्रश्न उरतोच. सतत तीन दिवस फिरूनही त्यांना बेड का उपलब्ध झाला नाही?
 
नाशिक शहरात किती बेड उपलब्ध?
बाबासाहेब कोळेंच्या ठिय्या आंदोलन आणि नंतर झालेल्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की शहरात पुरेस बेड उपलब्ध आहेत आणि कोणीही घाबरून जाऊ नये.
 
रूग्णांनी काही ठराविक हॉस्पिटल्समध्येच दाखल होण्याचा आग्रह धरू नये, इतर ठिकाणी चांगल्या सेवा आणि बेड आहेत असंही ते म्हणाले होते.
 
नाशिक शहरात खाजगी आणि सरकारी मिळून 900 ऑक्सिजन बेड सध्या आहेत तर 4330 बेड्स कोरोना पेशंटसाठी उपलब्ध आहेत. यापैकी 1 एप्रिल पर्यंत 1400 साधे बेड तर 800 ऑक्सिजन बेड रिकामे आहेत अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
 
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कालच्या आढावा बैठकीत आता खाजगी हॉस्पिटल्समधले 80 टक्के बेड्स अधिग्रहित करायला सांगितले आहेत. नाशिक जिल्हा आणि सिव्हिल हॉस्पिटल मिळून 196 व्हेंटिलेटर्स आहेत तर 23 व्हेंटिलेटर्स अजून इंस्टॉल केलेले नाहीत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोव्हिड आणि नॉन कोव्हिड मिळून 300 बेड वाढवण्यात येणार आहेत.
 
तरीही बाबासाहेव कोळेंना बेड का मिळाला नाही?
पॉझिटिव्ह झाल्यानंतर तीन दिवस बाबासाहेब कोळेंना बेड मिळाला नाही. सतत वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण कुठेही बेड मिळाला नाही असं घरच्यांचं म्हणणं आहे.
 
नाशिक मनपासमोर आंदोलन करताना काढलेला त्यांचा एक व्हीडिओ बीबीसी मराठीकडे आलेला आहे. त्यात ते महानगरपालिकेच्या प्रागंणात एका खुर्चीवर बसलेत, आणि त्यांना ऑक्सिजन लावलेला दिसतोय. व्हीडिओत मागे आवाजही येत आहेत की, "साहेब बिटकोला गेले होते ते दोन दिवस."
 
त्यांचा हाताला ऑक्सिजन मीटरही लावला आहे ज्यात त्यांची ऑक्सिजन लेव्हल 38 दिसते आहे.
 
सामन्यतः निरोगी माणसाची ऑक्सिजन लेव्हल 95 किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. 70 खाली गेली तर अशा रूग्णाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते.
 
एकीकडे प्रशासन बेड असल्याचा दावा करतंय तर दुसरीकडे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना आपला जीव गमवावा लागतोय.
 
प्रशासनाचं म्हणणं काय?
गुरूवारी, एप्रिल 1, ला झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पात्रकार परिषदेत बोलताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं की, "या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसंच सामाजिक कार्यकर्ते दीपक डोकेंवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करायला सांगितला आहे."
 
दीपक डोके यांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने वारंवार त्यांच्याशी संपर्क केला पण त्यांचा नंबर बंद येतोय.
 
"बाबासाहेब कोळे प्रकरणी प्राथमिक माहिती मी घेतली, अंतिम चौकशीसाठी समिती नेमली आहे, त्याचा अहवाल आल्यावर तुम्हाला सांगेन. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोळे पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवस घरी राहिले.
 
काल त्यांच्या मेव्हण्याबरोबर सिव्हिल हॉस्पिटलला गेले तिथे त्यांना सांगण्यात आलं की इथे बेड उपलब्ध नाहीयेत. तिथे सामाजिक कार्यकर्ते डोके उभे होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्यासोबत चला आम्ही तुम्हाला बेड उपलब्ध करून देतो आणि ते सरळ त्यांना महानगरपालिकेच्या प्रागंणात घेऊन आले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पेशंटलाही फोन करून बोलवलं. त्यांनी ठिय्या दिल्यावर अतिरिक्त आयुक्तांनी दोन अँम्ब्युलन्स मागवल्या आणि त्यांना बिटको हॉस्पिटलला पाठवलं. बाबासाहेब कोळेंना अॅडमिट केलं तर दुसऱ्या पेशंटचा ऑक्सिजन 98 होता, तो घरी गेला परत," असं महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं.
 
याप्रकरणी पूर्ण चौकशी होईल. ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले होते, खरंच गेले होते का? याचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. त्यांनी जो ऑक्सिजन सिलिंडर लावला तो कुठून मिळाला, ते मध्ये कुठे रेंगाळले का याचीही चौकशी करण्यात येईल. कोणी दोषी आढळलंच तर कडक कारवाई करण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं.
 
प्रशासन म्हणतंय बेड आहेत आणि लोकांना बेड मिळत नाहीये असं का या प्रश्नांच उत्तर देताना महानगरपालिका आयुक्त यांनी म्हटलं की, "मी मीटिंगला येण्याआधी सेट्रल बेड रिझर्व्ह सिस्टमला फोन करून माहिती घेतली तर 328 लोकांनी बेडसाठी फोन केले होते त्यापैकी 218 जणांना बेड उपलब्ध करून दिलेले आहेत. राहिलेल्या लोकांना काही चॉईस बेड हवे होते तर ते बेड देता आले नाहीत."
 
पण याच पत्रकार परिषदेत भुजबळांनी हेही मान्य केलं की हेल्पलाईनवर फोन केला की बेड्स नाही म्हणून सांगतात. "माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. वर्तमानपत्रातूनही हे येतंय, बेड्स नाही म्हणून सांगतात. मागच्या वेळेस लाट आली होती तेव्हा आपण अॅप तयार केलं होतं. लोकांना सगळी माहिती मिळत होती. एकेका म्युनिसिपल अधिकाऱ्याला दोन-दोन हॉस्पिटल्सची जबाबदारी दिली होती. आताही तसे करण्याचे आदेश दिले आहेत."
 
पेशंटला बेड नाकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई करा असेही आदेश त्यांनी दिले.
 
हा सगळा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची स्टंटबाजी असल्याचंही आयुक्तांनी म्हटलं.
 
'आमचा माणूस गेला आणि तुम्ही सरकारला वाचवायला स्टंटबाजी म्हणताय'
या प्रकरणी बाबासाहेब कोळेंच्या घरच्यांचीही बीबीसी मराठीने संपर्क साधला. ज्या मेहुण्याबरोबर ते सिव्हिल हॉस्पिटलला आणि नंतर महानगरपालिकेत आंदोलनाला गेले होते, त्यांच्याशी आम्ही बोललो.
 
"आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. कालपासून आम्ही पाहातोय, आमची बदनामी केली जातेय. मीडिया फक्त प्रशासनाला, सरकारला वाचवायचा प्रयत्न करतेय. आमचा माणूस मेला आणि तुम्ही स्टंटबाजी म्हणताय. त्यांना बेड मिळाला नाही हे तर सत्य आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलली जातेय. दीपक डोकेंना आम्ही आधी ओळखतही नव्हतो. आम्हाला ते सिव्हिल हॉस्पिटलपाशी भेटले. त्यांनी आम्हाला मदत केली, आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. आमची ठरवून बदनामी केली जातेय," त्यांनी उद्विग्नपणे सांगितलं आणि फोन ठेवून दिला.
 
दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हटलं आहे.
 
या प्रकरणी कारवाई म्हणून सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.