सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (12:16 IST)

पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का बनलीय?

-गणेश पोळ
राष्ट्रवादीचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतेय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसनं भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून समाधान अवताडे यांनी अर्ज भरला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचा एक आमदार सोलापूरच्या 4 तालुक्यातल्या राजकारणावर प्रभाव टाकतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते.
 
तसंच, सध्याची महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता ही निवडणूक ठाकरे सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचीही झाली आहे. दुसरीकडे भाजपसाठी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याची आणखी एक संधी असणार आहे.
 
भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे हे उपस्थित होते, तर समाधान आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमूख, माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. मंगळवारी (30मार्च) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही बाजूंनी हाय व्होल्टेज भाषणं झाली.
 
17 एप्रिलला इथं मतदान आहे तर 2 मे रोजी निकाल येणार आहे.
 
सध्या भगीरथ भालके यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट, तर समाधान आवताडे यांच्याकडे दांडगा जनसंपर्क असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ही लढत अतीतटीची होणार आहे.
 
याआधी भारत भालके यांच्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना तिकिट मिळावं, असं काही कार्यकर्त्यांना वाटत होतं, तर इतरांना त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तिकिटाचे दावेदार मानत होते.
 
हा वाद इतका शिगेला पोहोचला की राष्ट्रावादीचा उमेदवार अंतिम करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांना पंढरपुरात यावं लागलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करावी लागली. एका पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते पंढरपूरला येतात यावरून ही निवडणूक पक्षासाठी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येतं.
 
लढत इतकी चुरशीची का?
संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.
 
या पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्या होतेय. पण या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी चांगली कंबर कसल्याचं दिसतंय.
 
सध्या महाविकास आघाडी सरकारवर चहूबाजुंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. वाझे प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत पराभव झाला तर प्रतिमेला आणखी धक्का बसू शकतो.
 
दुसऱ्या बाजूला पंढरपूर हे महाराष्ट्रालं मोठं तीर्थक्षेत्र आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर इथं चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचं कामाचा मोठा प्रकल्प आहे. इथं मोठी बाजारपेठ आहे. अशा ठिकणी आपला आपला आमदार असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, अस पंढरपूरस्थित दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक सांगतात.
 
"महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र आल्यापासून भाजपचा राज्यात कुठंही विजय झाला नाही," असं म्हणत जयंत पाटील यांनी ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायती जिकंल्याचा असा दावा केला आहे.
 
तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीला टार्गेट केलं आहे. "महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. हे महाविकास आघाडी सरकार नसून ते महावसुली सरकार आहे," असा आरोप पाटील यांनी पंढरपूरच्या सभेत केला.
 
सहानभूती विरुद्ध जनसंपर्क
ही पोटनिवडणूक सहानुभूती, जनसंपर्क, राजकीय अनुभव आणि बंडखोरी या कारणांवरून गाजू शकते.
 
2019मध्ये याठिकाणी राष्ट्रवादीचे भारत नाना भालके, भाजपचे सुधाकर परिचारक, तर शिवसेनेकडून समाधान अवताडे यांच्यात लढत झाली होती. तेव्हा भारत नाना भालके 13 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते. तसंच भारत भालके 2009, 2014 आणि 2019 असं सलग तीनवेळा निवडून आले होते.
 
आता त्यांच्या दुख:द निधनाच्या सहानभूतीची लाट भगीरथ भालके यांच्यासोबत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भगीरथ भालके यांनी त्यांचे वडील भारत भालके यांच्या सारखी टोपी आणि पोषाख घातला होता.
 
"नानांचा मी केवळ रक्ताचा वारसदार नाही तर विचारांचाही वारसदारही आहे. नानांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला मतदान करा," असं म्हणून त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. अर्ज भरल्यानंतर भगीरथ भालके यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा लोक अनेकदा भावनिक झाले, असं तिथं उपस्थित लोकांनी सांगितलं.
 
पण भालके यांच्याकडे सहाभूतीची लाट असली तरी त्यांनी नुकताच 'फुल टाईम' राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचा म्हणावसा जनसंपर्क नसल्याचं सांगितलं जातं. भालके यांच्यकडे असेलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने अनेकदा शेतकऱ्याची बिले थकवली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात नाराजी आहे.
 
दुसरीकडे, "मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांनी वैयक्तिक पातळीवर चांगली बांधणी केली आहे. ते स्वत: उद्योजक आणि कंत्राटदार आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मंगळवेढा तालुक्यावर त्यांची चांगली पकड आहे. पण त्यांना पंढरपूरमध्ये चांगली मेहनत घ्यावी लागणार आहे" असं संजय पाठक सांगतात.
 
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर केलेल्या भाषणात आवताडे यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्दांना हात घातला. "पंढरपूराला MIDCची गरज आहे. सध्या तरुणांना रोजगाराची किंवा व्यवसायाची व्यवस्था नाही. पाणी, वीज, रस्ते सुधारण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे डाळिंब, द्राक्षे या फळ बागांना फटका बसलाय. तसंच ऊस शेतकरी अडचणीत आहे," हे मुद्दे आवताडे यांच्या भाषणातून दिसून आले. पंढरपुरात आवताडे यांची पकड नाही पण. पंढरपूरच्या परिचारक गटाने त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे.
 
बंडखोरीचं फटका दोघांना?
गुरुवारी (31 मार्च) पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. यामध्ये 38 पैकी 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
 
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल आहे. पण यात समाधान आवताडे यांचे सख्खे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शैला गोडस पण रिंगणात उतरल्या आहेत, त्यामुळे बंडखोरीचा फटका दोघांना बसू शकतो, असं पाठक यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितलं.