शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (11:55 IST)

वर्ल्ड कपः धोनीचा षटकार, फडकणारा तिरंगा, आणि मंतरलेली रात्र

-पराग फाटक
धोनीने नुवान कुलसेकराला तो षटकार लगावला आणि टाळ्या, शिट्या, भारतमाता की जय यांनी न्यूजरुम गदगदून गेली. आनंदातिरेकाने जादू की झप्पी दिल्या जात होत्या. पेढ्यांचे बॉक्स फिरू लागले. काहींच्या डोळ्यात विजयाश्रू होते, काही प्रचंड आनंदाने निशब्द झाले होते.
 
भारत अजिंक्य, धोनीचा विजयी षटकार हे शब्द माझ्या हातून टाईप होत आहेत यावर विश्वासच बसत नव्हता. आपण काहीतरी अद्भुत टाईप करतोय हे लक्षात येत होतं. शिक्षण संपल्यानंतर मिळालेली नोकरी, जेमतेम काही महिने झाले होते. नव्याची नवलाई कायम असतानाच धोनीने जेवढी वर्ष काम करेन तेवढा काळ पुरेल असा क्षण मिळवून दिला.
 
युवराज-सचिनची मिठी, सचिनला खांद्यावर घेऊन मैदानात निघालेली मिरवणूक, प्रत्येक खेळाडूने व्यक्त केलेल्या भावना, गॅरी कर्स्टन या अवलियाला खेळाडूंनी दिलेली मानवंदना, धोनीचं भाषण हे सगळं शब्दात मांडलं, वेबसाईटवर दिसू लागलं. विश्वविजेत्या संघाच्या फोटोंची फोटोगॅलरी तयार केली. तासाभरात हे सगळं आटोपून ऑफिसातून बाहेर पडलो आणि एका महासागरात हरवून गेलो.
 
तिरंगा घेऊन चाहते बाईक, गाड्या घेऊन फिरत होते. कुणी भारतीय संघाचे टीशर्ट घालून जनगणमन म्हणत होतं. कुणी वर्तुळाकार फेर धरून नाचत होते. सचिन सचिनचा गजर काही ठिकाणी सुरू होता. सचिन, धोनी यांचे फोटो घेतलेली माणसं प्रचंड आनंदी दिसत होती. सीएसटी ते चर्चगेट शोभायात्रा असावी इतके ढोलताशे, बँड दिसत होते.
 
भारताचे इतके झेंडे एकत्र कधीच पाहिले नव्हते. चर्चगेट स्टेशन, वानखेडे स्टेडियमबाहेर, मरिन ड्राईव्हवर माणसंच माणसं. एखाद्या कार्याला बोलवूनही येणार नाहीत इतकी माणसं स्वत:हून तिथे आली होती. प्रत्येकाला वर्ल्डकप घेऊन वानखेडे स्टेडियमच्या बाहेर पडणाऱ्या भारतीय संघाला पाहायचं होतं.
 
ठाणे, बदलापूर, टिटवाळा, पनवेल, विरार-मुंबईच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांनी गर्दी केली होती. अनोळखी माणसं एकमेकांना शुभेच्छा देत होती. आताएवढी फोटो, सेल्फीची क्रेझ नव्हती पण भारताने वर्ल्डकप जिंकला त्या रात्री मी तिथे होतो हे सांगण्यासाठी असंख्य फोटो निघत होते. चक दे इंडिया वाजत होते. तिरंगा फडकावलेली माणसं मरिन ड्राईव्हवर गाड्या घेऊन फिरत होती.
 
खेळ मनं जोडतात या उक्तीचा प्रत्यय खऱ्या अर्थाने त्या रात्री आला. त्या रात्री तिथे जमलेल्या प्रत्येकात समान दुवा क्रिकेट होतं. प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं होतं. तिथे श्रीमंत-गरीब भेद नव्हता. स्त्रीपुरुष असा दुजाभाव नव्हता. आहे रे आणि नाही रे मधली दरी पुसून टाकणारा क्षण होता.
 
130 कोटी लोकांना एकत्र आणणाऱ्या फारच मोजक्या गोष्टी आहेत. क्रिकेट त्यापैकी एक आहे याची पुरेपूर जाणीव त्या रात्री झाली. क्रिकेटविश्वाचा मानबिंदू असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तो शेवटचा वर्ल्डकप असणार आहे हे माहिती होतं. सचिनचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न हे देशवासीयांचं स्वप्न झालं होतं.
 
वर्षानुवर्षे सचिनने अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं समर्थपणे पेललं. सचिनला पाहत क्रिकेटची गोडी लागलेल्या शिलेदारांनी त्याच्या साथीने विश्वविजेता होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. नव्वदीत जन्मलेल्या नवभारताच्या नायकांच्या आगमनाची ती वर्दी होती. चार वर्षांपूर्वी 2007 मध्ये धोनीच्याच नेतृत्वात भारताने ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळीही विजयी वीरांचं मुंबईने थाटामाटात स्वागत केलं.
 
खुल्या बसमधून निघालेली संघाची विजयी मिरवणूक काही तास चालली होती. रांचीसारख्या छोट्या शहरात वाढलेल्या धोनी नावाच्या माणसाचं हे दशक असेल याची ग्वाही त्या रात्रीने दिली. जीवघेणा ठरू शकेल असं आजारपण उराशी बाळगत युवराजने संपूर्ण स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या, विकेट्स काढल्या, कॅच पकडले.
 
झोकून देणं काय असतं हे युवराजने त्या वर्ल्डकपमध्ये दाखवून दिलं. धोनीच्या षटकारासाठी पाया रचणारा गौतम गंभीर तेव्हा आणि नंतरही चर्चेत मागे राहिला पण शतकाचा टिळा न लागलेली ती खेळी अजरामर होती. संघातल्या सहकाऱ्याच्या यशाने आनंदून जाणारी ती फौज होती. त्या विश्वविजयानंतर आजपर्यंत भारताने एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही. यातूनच त्या क्षणाचं दुर्मीळत्व सिद्ध होतं.
 
1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला चीतपट केलं आणि वर्ल्डकपवर नाव कोरलं. 2007मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकला. चारच वर्षात भारताने पुन्हा तो मुकूट पटकावला. वर्ल्डकप हा त्या अकरा लोकांचा नसतो. ते एका पिढीचं स्वप्न असतं. तो वर्ल्डकप जिंकताना टीव्हीवर पाहणं, गच्ची-बाल्कनी, सोसायटीची आवारं, नाक्यावरची टीव्हीची दुकानं इथे जल्लोष करणं हा एक सामूहिक आनंदाचा भाग असतो.
 
सर्वसामान्यांच्या आयुष्यात अमाप आनंदाचे क्षण फारच कमी येतात. धोनीब्रिगेडने त्यादिवशी समस्त देशवासीयांना आनंदी होण्यासाठी टॉनिकच दिलं. त्या रात्री माणसं दु:खं विसरली. सार्वजनिक ठिकाणी भर गर्दीत बेभान होऊन नाचण्यासाठी कारण दिलं. त्या विजयाने अवघडलेपणाची झूल भिरकावून दिली. व्यक्त व्हायला निमित्त दिलं. अनेकजण फक्त वर्ल्डकपवेळी क्रिकेट बघतात. त्यांचा विश्वास धोनीसेनेने सार्थ ठरवला. क्रिकेटविश्वावर खेळात आणि आर्थिक आघाडीवरही यापुढे भारताचंच राज्य असेल याची खूणगाठ बांधून देणारा तो विजय होता.
 
वानखेडे मैदानावरून भारतीय संघाची बस बाहेर निघाली आणि जल्लोषाची लाट उसळली. आत बसमध्ये आनंदोत्सव सुरू होता. आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक टिपण्यासाठी चाहते वेडे झाले होते. चाहत्यांचा अखंडित प्रवाह रोखणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. सभा, रॅलीवेळची गर्दी, दंगलीवेळचा जमाव वेगळा आणि आपण जिंकलोय या आनंदात एकत्र जमलेला जनसागर वेगळा. त्या रात्री आनंदाला गालबोट लागेल असं कुणीही वागलं नाही.
 
मुंबई तशीही कायम जागी असते, त्या रात्री उजळली होती. विजय विश्वास देतो, उत्साह देतो. जगायला बळ देतो. कपिलच्या टीमने जो इतिहास घडवला ते पाहिलेली मंडळी जुन्या आठवणी सांगत होती. त्या रात्री कोणीही झोपलं नाही. दिवसरात्र एक करण्याचा तो क्षण होता. ती रात्र मंतरलेली होती. त्य़ा रात्री, इतिहासाच्या सोनेरी पानावर झळाळत्या वर्तमानाने मोहोर उमटवत भविष्याला आनंदाचा ठेवा सोपवला. याचि देही याचि डोळा तो क्षण अनुभवून परतू लागलो तेव्हा पूर्वेला झंजूमंजू होऊ लागलं होतं.