रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (21:42 IST)

कोरोना व्हायरस महाराष्ट्र : दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग का वाढतोय?

-मयांक भागवत
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट केलं. देशातील कोरोना हॉटस्पॉट 10 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील 8 जिल्हे आहेत. एकट्या मार्च महिन्यातच महाराष्ट्रात तब्बल 6 लाख 18 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.
 
कोरोना संसर्ग राज्यभरात झपाट्याने पसरतोय. महाराष्ट्रात कोव्हिड-19 व्हायरसमध्ये दोन म्युटेशन (बदल) आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयाने मान्य केलंय. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असल्याचं दिसून येत आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, संसर्गजन्य आजारात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना थैमान घालताना पहायला मिळतोय.
 
पण, कोव्हिड-19 संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एक गोष्ट तज्ज्ञांना प्रकर्षाने जाणवतेय. ती म्हणजे, लहान मुलांमध्ये वाढलेला कोरोनाचा संसर्ग.
 
महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये वाढला कोरोना संसर्ग?
महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त झाली. सद्य स्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 60 टक्के केसेस एकट्या महाराष्ट्रात आढळून येत आहेत.
 
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत युवा आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांसोबत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त आढळून आलंय.
 
शून्य ते 10 वयोगटातील रुग्णसंख्या
1 मार्चला राज्यात शून्य ते 10 वयोगटातील 71,908 मुलं कोरोनाबाधित होती.
31 मार्चला शून्य ते 10 वयोगटातील कोरोनाग्रस्त मुलांचा आकडा 87,105 वर जाऊन पोहोचला.
महिनाभरात कोरोनाग्रस्त लहान मुलांची संख्या 15,197 ने वाढली.
(रिपोर्ट- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग)
 
11 ते 20 वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या
1 मार्चला 11 ते 20 वयोगटात 1 लाख 43 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली होती.
31 मार्चला हा आकडा वाढून 1 लाख 82 हजारावर जाऊन पोहोचला.
(रिपोर्ट- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग)
 
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात राज्यात कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 6 लाख रुग्णांपैकी 15,197 लहान मुलं आहेत.
शून्य ते 20 वयोगटातील मुलं एकूण रुग्णसंख्येच्या 10 टक्के आहेत.
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,
 
30 मार्च 2021 पर्यंत मुंबईत शून्य ते 10 वयोगटातील 6706 तर, 11 ते 20 वयोगटातील 16,431 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
शून्य ते 10 वयोगटातील 17 तर 11 ते 20 वयोगटातील 32 मुलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
'लहान मुलांमध्ये वाढलाय कोरोना संसर्ग'
डॉ. देवीप्रसाद राव जनरल फिजीशिअन आहेत. मुंबईच्या विलेपार्ले भागात वैद्यकीय सेवा देतात. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मार्चच्या सुरूवातीपासून आत्तापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या 20 लहान मुलांवर उपचार केले आहेत. कोव्हिड-19 चा संसर्ग लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरताना दिसून येतोय. सहा वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये इंन्फेक्शन आढळून आलंय."
 
"मुलांना खोकला, सर्दी आणि कफसारखी सौम्य स्वरूपाची लक्षणं दिसून येत आहेत. संसर्गानंतर दोन-तीन दिवसात ही मुलं बरी होतात. मुलांचा आजार फार तीव्र स्वरूपाचा नसतो," असं डॉ. राव पुढे म्हणतात.
 
कोव्हिड-19 चा प्रसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पसरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत सर्वांत जास्त केसेस मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गात इमारतींमध्ये आहेत.
 
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, "लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला आहे. या मुलांना सौम्य लक्षणं असतात. पण, ही मुलं सुपर स्पेडर असण्याची शक्यता आहे."
 
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत फरक काय?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमध्ये दोन म्युटेशन (बदल) झाल्याची माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, म्युटेट झालेला व्हायरस रोगप्रतिकारशक्तीला चकमा देतोय. त्यामुळे संसर्ग जास्त प्रमाणात पसरतोय. लहान मुलांमध्ये संसर्गाला हे कारण आहे?
 
यावर बोलताना डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, "कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2 टक्के मुलं पॉझिटिव्ह येत होती. आता ही संख्या 10 टक्क्यांपर्यंत पोहोचलीये. याचं एक कारण व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन असू शकतं. यूकेमध्ये झालेल्या अभ्यासात कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होत असल्याचं समोर आलं होतं."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर फार कमी आहे. मृत्यूदर कमी असणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
 
"हवामान बदल झाला की लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप येणं सामान्य आहे. मात्र, आता लहान मुलांच्या ओपीडीमध्ये रुग्ण आला की त्याला कोव्हिड टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत," असं डॉ. वानखेडकर सांगतात.
 
फोर्टिस रुग्णालयाच्या चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. जेसल सेठ सांगतात, "2020 च्या तूलनेत गेल्या 15 दिवसात लहान मुलांमध्ये संसर्ग खूप जास्त आहे. काहीवेळा मुलांना संसर्ग होतो आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला आजार होतो. एक चांगली गोष्ट म्हणजे लहान मुलांना व्हायरसमुळे गंभीर आजार होत नाहीये."
 
लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची कारणं काय?
औरंगाबादचे चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. अमोल अन्नदाते सांगतात, "लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलाय. पण, मुलांमध्ये जास्त गंभीर आजार आढळून आला नाहीये."
 
लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची कारणं पुढीलप्रमाणे -
 
कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये मुलं घरीच होती. त्यामुळे मुलांमध्ये केसेस कमी होत्या.
आता मुलं घरच्यांसोबत बाहेर पडू लागली आहेत. मुलांच्या इतर अॅक्टिव्हिटी सुरू झाल्या आहेत.
गेल्यावर्षीच्या तूलनेत मुलं लोकांमध्ये जास्त मिसळू लागली आहेत.
कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संपर्क वाढला आहे.
बीबीसीशी बोलताना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयाच्या चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. जेसल सेठ सांगतात, "फेब्रुवारीपासून लहान मुलांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. याचं ठोस कारण सांगता येणार नाही. पण, मुलं लोकांमध्ये जास्त मिसळू लागली आहेत हे कारण असू शकतं. परिक्षा संपल्यामुळे खेळण्यासाठी मुलं एकमेकांच्या जास्त संपर्कात येत आहेत."
 
अंधेरीत रहाणाऱ्या मिलिंद राणे (नाव बदललेलं) यांच्या 13 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झालीये. बीबीसीशी बोलताने ते म्हणतात, "आमच्या घरी चौघांना कोरोनाचा संसर्ग झालाय. माझ्या मुलीला अत्यंत सौम्य लक्षणं आहेत."
 
काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात 18 वर्षाखालील 8.5 टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलांमध्ये इतर वयोगटाच्या तूलनेत मृत्यूदर फार कमी आहे. मात्र, लहान मुलांना गंभीर आजार झाल्याच्या केसेस आढळून आल्या आहेत.