शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (12:20 IST)

काश्मिरमध्ये बंगालमधील मजुरांची हत्या : ही माझ्या मुलाची शेवटची वेळ ठरेल हे कुणाला ठाऊक होतं?'

- प्रभाकर.एम
काश्मीर खोऱ्यात कट्टरतावाद्यांनी पाच मजुरांची हत्या केल्याची बातमी मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशीरा टीव्ही चॅनेल्स आली आणि तिथून हजारो किलोमीटर दूर पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये भयाण शांतता पसरली.
 
गावकऱ्यांनी लगेच काश्मीर खोऱ्यात मजुरीसाठी गेलेल्या आपापल्या नातेवाईंकांशी संपर्क केला. काही जण सुदैवी ठरले. मात्र, काही दुर्दैवी. अशाच काही दुर्दैवी लोकांपैकी एक आहेत अजिदा बीबी. त्यांचे पती कमरुद्दीन यांची कट्टरतावाद्यांनी हत्या केली.
 
सफरचंद तोडीच्या हंगामात या गावातून शेकडो तरुण दरवर्षी मजुरीसाठी काश्मीर खोऱ्यात जात असतात. रात्री पोलिसांच्या एका पथकानेही जिल्ह्यातल्या बहालनगर आणि ब्राह्मणी गावांचा दौरा केला. काल रात्रीपासूनच या गावांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
 
बुधवारी सकाळपासूनच काँग्रेस नेते अधीर चौधरींसह वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मंडळी पीडितांच्या घरी जाऊन सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं आहे.
 
मुर्शिदाबादच्या सागरदिघी ठाण्याचे प्रभारी सुमित विश्वास यांनी सांगितलं, "बहालनगर गावातून तिथे गेलेले 15 मजूर एकाच घरात भाड्याने राहत. मंगळवारी संध्याकाळी कट्टरतावाद्यांनी त्यांना घराबाहेर काढत अंदाधुंद गोळीबार केला. यात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला."
 
"मृतांमध्ये रफिक शेख (28), कमरुद्दीन शेख (30), नईमुद्दीन शेख (30), मुरसालिम शेख (30) आणि रफिकुल शेख (30) यांचा समावेश आहे. याशिवाय जहिरुद्दीन गंभीर जखमी झाले आहेत. अनंतनागमधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे." मृतांमध्ये सर्वात दुर्दैवी ठरले कमरुद्दीन शेख. ते बुधवारीच (30 ऑक्टोबर) घरी परतणार होते.
 
कमरुद्दीन यांच्या पत्नी अजिदा बीबी सांगतात, "सोमवारीच त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी तिथे परिस्थिती खराब असल्याचं सांगत बुधवारी ट्रेनने घरी परतणार असल्याचं म्हटलं होतं. मंगळवारी रात्री टीव्हीवर बातमी बघितल्यानंतर त्यांना खूप फोन केले. मात्र, काहीच उत्तर मिळालं नाही."
 
मध्यरात्रीनंतर गावात पोलीस आले. तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. मात्र, रात्री पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना कुठलीच अधिकृत माहिती दिली नाही.
 
कमरुद्दीन यांचे नातलग फिरोज शेख सांगतात, "खोऱ्यात अशांततेचं वातावरण असल्यामुळे कमरुद्दीन यांची यावर्षी तिथे जायची इच्छा नव्हती. मात्र, इतर सगळे जाणार असल्याने तो 15 दिवस जाण्यासाठी तयार झाला. इथे परतल्यावर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याला शेतात धानाची कापणी करायची होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं."
 
बहालनगरचे कमरुद्दीन शेख यांच्यामागे एक मुलगा आणि मुलगी आहेत. गावात त्यांच्याकडे अल्पशी जमीन आहे. रफीक यांचे वडील गफूर म्हणतात, "काय करणार? इथे काम नाही. म्हणूनच सफरचंद तोडणीच्या हंगामात गावातली तरुण मुलं दोन-तीन महिन्यांसाठी काश्मीर खोऱ्यात जातात. ही माझ्या मुलाची शेवटची वेळ ठरेल हे कुणाला ठाऊक होतं?" रफिकुल यांचे वडील सादिकुल शेख यांनी सांगितलं, "रफिकुल 27 दिवसांआधीच काश्मीरला गेला होता."
लोकसभेत काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्याचे खासदार अधीर चौधरी यांनी म्हटलं, "केंद्र सरकार काश्मीर खोऱ्यात परिस्थिती सुधारल्याचा खोटा दावा करत आहे. सरकारच्या दाव्यावर विश्वास ठेवूनच जिल्ह्यातले अनेक मजूर यंदा तिथे गेले होते. मात्र, तिथे परिस्थिती सामान्य नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होतं." अधीर यांनी बुधवारी सकाळी बहालनगरला जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली.
 
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या म्हणाल्या, "युरोपीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याच्या दिवशीच इतकी मोठी घटना घडली. यावरूनच खोऱ्यात परिस्थिती सुधारली नसल्याचं स्पष्ट होतं."
 
तृणमूल काँग्रेसचे मुर्शिदाबाद जिल्ह्यातले एक नेते जहिरूल शेख सांगतात, "परिसरातले शेकडो तरुण मजुरीसाठी खोऱ्यात जात असतात. या तरुणांना जीव मुठीत धरून खोऱ्यात जावं लागू नये, यासाठी यापुढे या तरुणांना इथेच रोजगार मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करेल."
 
सागरदिघीतून तृणमूल काँग्रेसचे आमदार सुब्रत साहा म्हणतात, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही पीडित कुटुंबांच्या सोबत आहोत." या गावांमधली पाच घरंच नाही तर दोन्ही गाव मृतांचे पार्थिव गावात येण्याची वाट बघत आहेत.