शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नेहमीच खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा होती- बरखा बिश्त

‘स्टार भारत’वरील ‘काळभैरव रहस्य-2’ मालिकेत टीव्हीवरील नामवंत आणि लोकप्रिय अभिनेत्री बरखा बिश्त सेनगुप्ता ही भैरवी या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.
 
‘काळभैरव रहस्य-2’मधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी माहिती देताना बरखाने सांगितले की या मालिकेत मी भैरवी ही गूढ व्यक्तिरेखा साकारणार आहे. मालिकेतील माझ्या प्रवेशामुळे वीर, भैरवी आणि अर्चना असा प्रेमत्रिकोण तयार होईल. मी आयुष्यात प्रथमच खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याने त्याबद्दल मी खूप उत्सुक झाले आहे. ही भूमिका मी कशा तर्‍हेने साकारणार आहे, त्याची मलाही उत्सुकता लागली आहे.
 
ती म्हणाली की मी आजवर कधीच खलनायिकेची भूमिका साकारलेली नाही पण भैरवीच्या भूमिकेने माझं लक्ष वेधून घेतलं. मला एकदा खलनायिकेची भूमिका साकारून पाहायची होतीच आणि भैरवीच्या भूमिकेद्वारे मला ही संधी मिळाली. काळभैरव रहस्य या मालिकेची दुसरी आवृत्ती आता प्रसारित होत असून अशा मालिकेत मला भूमिका रंगविण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. या व्यक्तिरेखेची संकल्पना मला फार आवडल्याने मी ही संधी घेतली.
 
रात्रीच्या वेळी चित्रीकरण करणं हे कठीर जातं का? असे विचारल्यावर ती म्हणाली की मी आता टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात बरीच वर्षं असून रात्रीच्या वेळी चित्रीकरण करणं ही गोष्ट माझ्यासाठी काही नवी नाही. आपल्या शरीराला दिवस-रात्रीची सवय झाल्यामुळे रात्रीच्या वेळी काम करताना अधिक ताण येतो आणि अधिक दमणूक होते, हे खरं असलं, तरी त्याची मला सवय झाली आहे. किंबहुना कधी कधी रात्रपाळीत काम करताना अधिक मजा येते.
 
अनेक बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका रंगविणार्‍या बरखाचे बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये भूमिका रंगविणं हे स्वप्न होतं आणि राम-लीला या चित्रपटात तिने भूमिका रंगविली होती. तसेच आगामी काळात बॉलीवूडच्या आणखी काही चित्रपटांमध्ये भूमिका रंगविण्यास तिला नक्कीच आवडेल असे ती म्हणाली.
 
कलाकारांबद्दल संबंधावर बोलतान ती म्हणाली की आमचे सर्वांचे एकमेकांशी खेळीमेळीचे संबंध आहेत. मी जरी या मालिकेत आताच सहभागी झाले असले, तरी मी या सर्वांना अनेक वर्षं ओळखत आहे, असं मला वाटतं. गौतम आणि आदिती यांना मी पूर्वीपासूनच ओळखत होते. तसेच या मालिकेची संकल्पना अगदी नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून अशी संकल्पना आतापर्यंत टीव्हीवर सादर झालेली नाही. शापवाणी वगैरे विषयांबद्दल मला पूर्वीपासूनच खूप उत्सुकता होती आणि म्हणूनच मी या मालिकेतून त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
भावी योजनाबद्दल बोलत असताना बरखा म्हणाली की सध्या तरी काळभैरव रहस्य-2 या मालिकेतील तिने भैरवीच्या भूमिकेवर सारं लक्ष केंद्रित केलं आहे. ही भूमिका जास्तीत जास्त अचूकतेने साकारणं हे माझं ध्येय आहे, असे तिने स्पष्ट केले.