सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (17:46 IST)

महाविकास आघाडीच्या मोर्च्याविरोधात भाजपचं आंदोलनाचं हत्यार, पोलिसांच्या मुंबईकरांना ‘या’ सूचना

shivsena
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शनिवारी (17 डिसेंबर) मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
 
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडूनही शनिवारी मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात निदर्शनं केली जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप ‘माफी मागो’ आंदोलन करणार आहे.
 
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. परंतु काही अटीशर्थींसह आता मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.
 
आता एकाच दिवशी (17 डिसेंबर) महाविकास आघाडी आणि भाजप म्हणजेच सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरणार असल्याने यावरून राजकारण तापलं आहे.
 
ही दोन्ही आंदोलनं नेमकी कशी होणार आहेत? आंदोलनात कोण-कोण सहभागी होणार आहे? आणि सामान्य मुंबईकरांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
महाविकास आघाडीचा मोर्चा कसा असेल?
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं याबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्यासाठीच महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या,” असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
 
“हीच वेळ आहे जागं होण्याची आणि महामोर्चात सहभागी होण्याची,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
 
महाविकास आघाडीच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे असे नेते उपस्थित राहणार आहेत.
 
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
 
महाविकास आघाडीने आपल्या बैठकीत तिन्ही पक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना जमवण्याचा आदेश दिले आहेत.
 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यातूनही कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
दक्षिण मुंबईत भायखळा पासून ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीपर्यंत (सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर) महाविकास आघाडीचा मोर्चा आहे.
 
महाराष्ट-कर्नाटक प्रश्नी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्त्वात एक बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमाभागासंदर्भात केलेली वक्तव्य आपली नसून ते ट्वीट त्यांनी केलं नाही असं स्पष्ट केलं. परंतु यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारवर टीका केली आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, “बसवराज बोम्मई यांच्या नावाने ज्या ट्वीटर खात्यावरून चिथावणीखोर ट्वीट करण्यात आले ते खातं बनावट होतं. हा खुलासा करण्यास एवढे दिवस का लागले? आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि हे केवळ ऐकून आले आले.”
 
शनिवारी (17 डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रामुख्याने या मुद्यांवर घोषणाबाजी केली जाईल. तसंच प्रमुख नेते या मुद्यांवरूनच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील.
 
‘मोर्चा शांततेत निघावा’
महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, “जो काही मोर्चा आहे तो शांततेत निघावा. जी काही परवानगी आहे ती त्यांना दिलेली आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करू. परंतु कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे याकडे आम्ही लक्ष देऊ.”
 
भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन
महाविकास आघाडीच्या पाठोपाठ आता भाजपनेही शनिवारी (17 डिसेंबर) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांची वक्तव्ये समाजमाध्यमांवर येत आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि वारकरी यांचा अपमान केला जात आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान समोर आल्यानंतरही उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत.”
 
आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.
 
ते म्हणाले, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन पुस्तके पाठवली आहेत. त्यांनी ती वाचावी अशी आमची अपेक्षा आहे. संजय राऊत हे आपलं अज्ञान पाजळण्याची संधी कधीच सोडत नाही. डॉक्टर-कंपाऊंडर प्रकरणातही त्यांनी अज्ञान पाजळलेलं आहे. आता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाबाबत भ्रम निर्माण करण्यापर्यंत गेली आहे.अशी खोटी माहिती पसरवणे, ही अक्षम्य चूक आहे. या पद्धतीने खोटं पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे?”
 
"डॉ. बाबासाहेबांबाबत इतकं अज्ञान आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा मूलभूत अधिकार आणि त्यावर आधारित संविधान त्यांनी दिलं, गरीब, दलित, शोषित समाजाला आवाज डॉ. आंबेडकरांनी दिला, हे तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे का?” असा टोलाही त्यांनी लगावला.
 
आशिष शेलार म्हणाले, “शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानावरचा वाद निर्माण केला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे का करत आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
मी कशा करता माफी मागू - राऊत
“घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करावा हे आम्ही सहन करणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलंय. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी महाराष्ट्राचे मग देशाचे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांच्यावरून भाजप राजकारण करत आहे. याची भाजपला लाज वाटली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “मी कशाकरता माफी मागू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे म्हटलं म्हणून का माफी मागू. आंबेडकर महाराष्ट्राच्या घराघरात जन्माला आले आहेत,” असं संजय राऊत यांनी पुढे म्हटलंय. “वारकरी संप्रदायाविषयी आम्हाला नितांत आदर आहे. वारकरी संप्रदाय जे भाजप पुरस्कृत आहेत त्याच संघटना बोलत आहेत,” असं सुषमा अंधारे यांच्याविरोधात होत असलेल्या आंदोलनाबाबत राऊत म्हणालेत.
 
मुंबईकरांसाठी सूचना
मुंबई पोलिसांनी काही अटी-शर्थींसह महाविकास आघाडी आणि भाजपच्या आंदोलनाला परवानगी दिली आहे.
 
विरोधकांनी आपला मोर्चा शांततेत काढावा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवावी, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी 11 वाजता भायखळा येथून सुरू होईल. त्यानंतर जिजामाता उद्यान मोहम्मद अली रोड ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघेल.
 
महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रमुख नेत्यांसाठी एक ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर या ट्रकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
 
या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत सकाळच्या सत्रात काही मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्याची शक्यता आहे. तसंच ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असल्याने शनिवारी सकाळी इस्टर्न एक्सप्रेस हायवे, पनवेल आणि ठाण्यातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोडींची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासाचं नियोजन त्यानुसार करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.

Published By -Smita Joshi