रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शनिवार, 25 जून 2022 (11:45 IST)

शाहरुख खान आणि दिवानाः एका सिनेमामुळे बॉलीवूडला मिळाला नवा सुपरस्टार

1992 ची गोष्ट आहे, अमिताभ बच्चन आपल्या खुदागवाह पिक्चरमधून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. ते बॉक्स ऑफिसवर तर टिकले होते पण मुख्य नायक म्हणून त्यांचा काळ संपत आला होता.
 
आमिर आणि सलमान खानचं 'कयामत से कयामत तक' आणि 'मैंने प्यार किया' या दोन चित्रपटांमधून पदार्पण झालं होतं खरं पण त्यांचाही जम बसला नव्हता. म्हणजे जुनं जाऊन नवीन येण्याच्या मधला जो काळ असतो, तो हा काळ होता.
 
तेव्हा नवोदित दिग्दर्शख राज कंवर यांनी निर्माते गुड्डू धनोया यांच्याबरोबर एकत्र येत आपला पहिला चित्रपट 'दिवाना' काढण्याचं ठरवलं.
 
यात हिरो होते ऋषी कपूर आणि हिरोईन होती नव्याने स्टार झालेली दिव्या भारती. दुसरा हिरो होता अरमान कोहली.
 
मग शाहरूखची एन्ट्री कशी झाली?
या चित्रपटातल्या दुसऱ्या हिरोचा रोल अरमान कोहलीचा होता. (तोच अरमान कोहली जो बिग बॉसमध्ये आला होता.) पण काही कारणास्तव अरमानने हा चित्रपट सोडला आणि हा रोल एका नव्या हिरोला मिळाला. या हिरोचे कोणतेही चित्रपट आले नव्हते पण टीव्हीवर त्याने अनेक हिट सीरियल दिले होते.
 
जवळपास अर्धा पिक्चर झाल्यानंतर या हिरोची एन्ट्री होते. विनोद राठेडच्या आवाजातल्या 'कोई ना कोई चाहिये' हे गाणं पडद्यावर गात तो हिरो त्याची बाईक घेऊन बेफिकिर वृत्तीने एका होर्डिंगपाशी जाऊन थांबतो.
 
त्या हिरोचं नाव होतं शाहरूख खान. दिवाना त्याचा पहिला चित्रपट होता जो जून 25, 1992 ला रिलीज झाला. तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की सहाय्यक अभिनेत्याचा रोल करणारा हा हिरो एक दिवस बॉलिवुडवर राज्य करेल.
 
दिवाना भले शाहरूखचा पहिला पिक्चर असेल पण जेव्हा शाहरूखने हा चित्रपट साईन केला तेव्हा त्याच्या हातात चार-पाच चित्रपट होते. यातले काही चित्रपट म्हणजे 'दिल आशना है', 'राजू बन गया जेंटलमन', 'चमत्कार', 'किंग अंकल'.
 
शाहरूखने साईन केलेला सगळ्यात पहिला चित्रपट म्हणज हेमा मालिनीचा 'दिल आशना है'. या चित्रपटातही दिव्या भारती हिरोईन होती आणि याही चित्रपटात शाहरूखाचा मेन रोल नव्हता.
 
शेखर कपूरने मिळवून दिला रोल
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत निर्माते गुड्डू धनोया यांनी म्हटलं होतं की शेखर कपूर यांनी खूप आग्रह केल्यामुळे ते शाहरूखला भेटायला तयार झाले. पण तोवर शाहरूखने आपल्या तारखा 4-5 चित्रपटांना देऊन टाकल्या होत्या आणि त्याच्याकडे दिवानासाठी तारखा नव्हत्या.
 
पण शाहरूखला चित्रपटाची कथा आवडली होती आणि निर्मात्याला शाहरूख. दोन्ही बाजूंनी होकार आल्यावर चित्रपट साईन झाला. योगायोगाने सगळ्या चित्रपटांमध्ये सर्वात आधी 'दीवाना' चं शूटिंग संपलं आणि तो चित्रपट सगळ्यात आधी रिलीज झाला.
 
1992 साली आलेला हा चित्रपट हिट आणि गाणी सुपरहिट ठरली. ऋषी कपूर तर आधीपासूनच स्टार होते, चित्रपटाचे व्हीलन अमरिश पुरीही प्रसिद्ध होते, पण या पिक्चरने शाहरूख खान आणि दिव्या भारतीला एका रात्रीत स्टार बनवलं.
 
राज कंवरने पहिल्या चित्रपटाने आपल्याला प्रस्थापितांच्या पंक्तीतत आणून बसवलं.
 
चित्रपटाच्या यशावर काय म्हणाला शाहरूख?
या चित्रपटात शाहरूखने एका हट्टी, श्रीमंत, बेफिकिर, बालीश मुलगा एका जिद्दी, प्रेमात वेड्या असणाऱ्या प्रियकरात कसा बदलतो हे दाखवलं होतं.
 
खरंतर या भूमिकेत काहीही नवीन नव्हतं. ना शाहरूखला पूर्ण स्क्रीनटाईम मिळाला होता, ना या रोलमध्ये अभिनयाची जबरदस्त चुणूक दाखवायची संधी होती.
 
त्यावेळी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरूखने स्वतः म्हटलं होतं की, "मी दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी खूपच आनंदित आहे, कारण पिक्चर चांगला चालला. पण मला नाही वाटत की या चित्रपटाच्या यशात मी काही भूमिका बजावली आहे. माझं काम खूपच वाईट होतं - मी खूपच लाऊड, अतिरंजित, अनियंत्रित अभिनय केला. याची मी पूर्ण जबाबदारी घेतो. जर तुम्ही पूर्ण तयारीनिशी उतरला नाहीत तर असंच होतं."
 
"माझ्याकडे स्क्रीप्टही नव्हती. 'दिवानाचं शूटिंग बरंच उशीरा सुरू होणार होतं पण दुसऱ्या काही चित्रपटांचं शुटिंग कॅन्सल झालं आणि मी त्या तारखा दिवानाला दिल्या. मी जेव्हा स्वतःला स्क्रीनवर पाहिलं तेव्हा मी खूपच अनकंफर्टेबल झालो. मला याचं आश्चर्य वाटलं की लोकांना माझं काम आवडलं. कदाचित मी नवा होतो आणि म्हणून लोकांना आवडलो. पण 'दीवाना' मध्ये मी जे काम केलं ते ना मी लक्षात ठेवू इच्छितो ना तसं परत कधी करू इच्छितो."
 
पण तरीही 'दीवाना' चित्रपटात काहीतरी असावं की लोकांना शाहरूख खूप आवडला. कदाचित लोकांना शाहरूखमध्ये काहीतरी नवीन, ताजं, वेगळं सापडलं. तेही अशा वेळेस जेव्हा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला एका नव्या बादशाहचा शोध होता.
 
1992 साली चित्रपट समीक्षक निख्त काजमी यांनी लिहिलं की - शाहरूखचा रोल तोच जुना आणि चावून चोथा झालेला आहे पण त्यात त्याने नव्याने रंग भरले. शाहरूखने ज्याप्रकारे एका रागीट, बंडखोर आणि गोंधळलेल्या प्रियकराची भूमिका केली, तो अनुभव एका ताज्या हवेच्या झुळूकीसारखा होता. 'दीवाना' ने एक नवीन टॅलेंट बॉलिवूडला दिलं आहे."
 
पडद्यावर जी कोमलता, नात्यातला हळूवारपणा, समंजसपणा आणि रोमान्स यासाठी शाहरूख ओळखला जाऊ लागला त्याची पहिली झलक 'दीवाना'मध्येच पहायला मिळाली होती.
 
दोन्ही हात पसरून जगातलं सगळं प्रेम घेऊन आपल्या प्रेमिकेला कवेत सामावून घेण्याचं जे 'कसब' शाहरूखकडे आहे त्याचीही झलक 'दीवाना'तच दिसली होती. आठवा कसं 'ऐसी दिवानगी देखी नही' या गाण्यात शाहरूख कसरती दाखवत, हात पसरून आपल्या हृदयातली गोष्ट सांगतो.
 
आता लोकांना ते दोन्ही हात पसरून प्रेमाची कबुली देणारी कृती तोचतोचपणा आणणारी वाटते हा भाग वेगळा.
 
हा अजब योगायोग म्हणावा लागेल की 'दिवाना' चित्रपटाची अभिनेत्री दिव्या भारती आणि दिग्दर्शक राज कंवर यांचा फार कमी वयातच मृत्यू झाला.
 
दिव्या भारतीचा मृत्यू 'दिवाना' रिलीज झाल्यानंतर एकाच वर्षात झाला. तेव्हा तिचं वय होतं अवघं 19 वर्षं.
 
दिव्या भारती अगदी किशोरवयीन होती जेव्हा 1990 साली तिने वेंकटेशबरोबर एक तेलुगू आणि एका तामिळ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं.
 
हिंदीत आलेल्या 'विश्वात्मा' आणि 'शोला और शबनम' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, आणि दिव्या भारती स्टार झाली. पण तिचं करियर, तिच्या आयुष्यासारखंच अल्पावधीचं ठरलं.
 
चित्रपटांच्या गाण्यांनी लोकांना वेड लावलं
आज 30 वर्षांनीही 'दिवाना' चित्रपटाची गाणी प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाचं संगीतच तो हिट होण्याचं मुख्य कारण आहे असंही समजलं जातं. ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा चित्रपटाचं संगीत चांगलं असलं की पिक्चर हिट ठरायचे.
 
आपल्या फिल्मफेअरच्या जुन्या मुलाखतीत शाहरूख म्हणाला होता, "हा चित्रपट हिट होण्यात संगीताचा खूप मोठा हात आहे. लोकांनी असं म्हटलं असतं की संगीत छानच आहे, पण शाहरूखचं काम त्याहून जास्त चांगलं आहे तर किती बरं झालं असतं. पण हे तर नक्कीच खरं की राज कंवर यांनी गाण्यांचं उत्तम चित्रीकरण केलं, ऋषी कपूर, दिव्या, अमरिश पूरी आणि देवेन वर्मा सगळ्यांनी चांगलं काम केलं पण हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहिल ते नदीम श्रवणच्या संगीतासाठी."
 
समीरने लिहिलेल्या गाण्यांना नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केलं होतं. नदीम-श्रवण या काळात भरात होते . 1990 साली त्यांना 'आशिकी'साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1991 साली 'साजन'साठी आणि त्यानंतर 1992 मध्ये 'दीवाना'साठी सलग तिसऱ्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
 
'सोचेंगे तुम्हे प्यार करे कि नही' या गाण्यासाठी गायक कुमार सानूला फिल्मफेअर तर समीरला 'तेरी उम्मीद तेरा इंतजार' यासाठी बेस्ट गीतकार म्हणून फिल्मफेअर मिळालं.
 
'ऐसी दिवानगी देखी नही कही' हे शाहरूख आणि दिव्या भारतीवर चित्रित झालेलं एकमेव गाणं होतं. जर तुम्हाला संगीताचा कान असेल तर 1976 साली आलेल्या 'बायलू दारी' या कन्नड चित्रपटातलं गाणं ऐका. ते तुम्हाला या सुरावटीचं आढळेल.
 
शाहरूखकडून 'दिवाना' सारख्याचा ताजेपणाची आशा
आज पुन्हा 'दिवाना' पाहिला तर एक साधारण चित्रपट वाटतो. आजच्या काळात शाहरूखचं दिव्या भारतीच्या संमतीविना तिचा पाठलाग करणं, तिच्या घरी येणं, तिच्या अंगावर रंग टाकणं सगळं चुकीचं वाटतं. पण हा 90 च्या दशकातल्या मुल्यांवर आधारित चित्रपट होता.
 
हिंदी चित्रपटांचा एक नियम आहे तो म्हणजे जर दोन हिरो असतील तर शेवटी एक मरतो आणि एक जिवंत राहातो. या चित्रपटात शाहरूख खान आणि ऋषी कपूर मोजून दोन-तीन सीनमध्ये एकत्र दिसतात. एका सीनमध्ये ऋषी कपूर शाहरूखला पार्टीत घेऊन येतात आणि मिठी मारतात.
 
त्या फ्रेममध्ये दोन हिरो होते - एक 70 आणि 80 च्या दशकातला रोमँटिक हिरो आणि दुसरा जो येत्या काळात किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जाणार होता. ज्याचे चाहते भारतच नाही, ब्रिटन, जर्मनी, स्वित्झरलँड, दुबई, कतार. अफगाणिस्तान आणि आणखी कुठे कुठे पसरले आहेत.
 
'दिवाना' ने जगाला शाहरूख खान दिला. तो शाहरूख जो आज आपल्या करियरच्या त्या टप्प्यावर उभा आहे जिथे चाहत्यांना आणि समीक्षकांना एका नव्या 'दिवानगी' ची आशा आहे.