सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 1 जानेवारी 2020 (13:21 IST)

चांद्रयान-3 ला केंद्र सरकारची मंजुरी : इस्रोच्या प्रमुखांची माहिती

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान मोहिमेसंबंधी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं चांद्रयान-3 ला मंजुरी दिली असून यावर काम सुरु असल्याची माहिती के. सिवन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 
चांद्रयान-2 नं एक चांगली सुरुवात केली होती. हे यान चंद्रावर उतरू शकलं नसलं तरी ऑर्बिटर अजूनही कार्यरत असल्याचं के. सिवन यांनी म्हटलं. पुढील सात वर्षांपर्यंत ऑर्बिटर कार्यरत असेल, असं सिवन यांनी म्हटलं.
 
सतीश धवन अंतराळ केंद्रामधून 22 जुलै 2019 ला चांद्रयान-2 नं प्रक्षेपण केलं होतं. 28 ऑगस्टला या यानानं यशस्वीरित्या चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला.
 
त्यानंतर चंद्रभूमीवर पोहोचण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना 'चांद्रयान 2' च्या मून लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला होता.
 
"आम्हाला विक्रम मून लँडरचं चंद्रावरील ठिकाण सापडलंय आणि ऑर्बिटरनं लँडरची थर्मल इमेजही घेतलीय. मात्र अद्याप मून लँडरशी संपर्क झाला नाहीये. आम्ही संपर्कासाठी प्रयत्न करतोय. लवकरच संपर्क होईल," असं त्यावेळी इस्रो प्रमुख के सिवन यांनी सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी विक्रम मून लँडरचं ठिकाणं सापडल्याची माहिती त्यांनी दिली होती.
 
दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचे अवशेष सापडल्याची माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'नं दिली. 'नासा'नं विक्रम लँडरच्या अवशेषांचा फोटोही प्रसिद्ध केला होता.