आलोक प्रकाश पुतुल
ज्या मुलावर प्रेम केलं, ज्याच्याशी प्रेमविवाह केला तो मुलगा मुसलमान आहे म्हणून केवळ घरच्यांनीच नाही, तर समाजानंही अंजली जैन आणि मोहमद्द इब्राहिम या जोडप्याला वेगळं केलं. पण छत्तीसगढमधल्या हायकोर्टानं जोडप्याच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे अंजली जैन यांना दिलासा मिळाला आहे.
अंजली बीबीसीशी बोलत होत्या, सखी सेंटरमधून मुक्त झाल्यावर पती मोहम्मद इब्राहिमबरोबर राहायचंय, असं त्यांनी सांगितलं. अंजली जैन आणि इब्राहिम या जोडप्याचा विवाह म्हणजे छत्तीसगढमधला 'लव जिहाद' मानला जात होता.
गेल्या आठ महिन्यांपासून अंजलीला आपल्या घरच्यांबरोबर राज्यातल्या आंदोलनं, निदर्शनांना सामोरं जावं लागत होतं. तसंच कारवाईनुसार गेल्या आठ महिन्यांपासून त्यांची रवानगी सखी सेंटरला करण्यात आली होती.
इब्राहिम आणि अंजली यांच्या वकील प्रियंका शुक्ला म्हणाल्या की, "हायकोर्टाने पोलीस अधीक्षकांच्या समोर अंजली जैन यांना सखी सेंटरमधून मुक्त करण्याचे आदेश आहेत. या कारवाईदरम्यान सखी सेंटरचे उच्च अधिकारी उपस्थित असावेत असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.''
अंजली जैन यांच्या धाकट्या बहिणीच्या पत्राच्या आधारे छत्तीसगड हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली. याशिवाय अंजलीच्या कुटुंबाच्यावतीने हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
अंजली जैन यांनी तिच्या वतीने उच्च न्यायालयात पत्र देखील लिहिले. "मी आठ महिने अतिशय वाईट अवस्थेतून गेले आहे. पण उशिरा का होईना मला निर्णय मिळालाय. कोर्टावरचा माझा विश्वास आणखीनच दृढ झाला आहे," अंजली बीबीसीला सांगत होत्या.
हे प्रकरण नेमकं काय होतं?
अंजली जैन इब्राहिम यांनी 25 फेब्रुवारी 2018 रोजी रायपूरच्या आर्य मंदिरात हिंदू पद्धतीनं लग्न केलं आणि यावेळेस इब्राहिम यांनी हिंदू धर्म स्वीकारून स्वतःचं नाव आर्यन आर्य असं बदललं. त्यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांबरोबरच समाजानंही "लव जिहाद"चा टॅग लावला. त्यावरून राज्यभरात फारच हलकल्लोळ माजला.
"आमच्या लग्नाची बातमी मिळाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात कोंडून ठेवलं. माझ्या पत्नीला सोडवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण त्याचा फायदा झाला नाही.'' असं मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी ऊर्फ आर्यन आर्य यांनी सांगितलं. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. इब्राहिम यांनीही छत्तीसगढच्या हायकोर्टात पत्नीला घरात कोंडल्याबद्दल याचिका दाखल केली.
परंतु यावेळेस या जोडप्याला न्याय मिळाला नाही. याप्रकरणी अंजलीनं विचार करावा आणि तोपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या घरीच राहावं असा आदेश कोर्टानं दिला. पण अंजली जैन बधणार नव्हत्या. त्यांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडून हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पतीच्या घराऐवजी हॉस्टेमध्ये जाऊन राहावं लागलं.
छळ केल्याचा आरोप
घरी परत गेल्यावर घरच्यांनी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे आरोपही अंजली यांनी कुटुंबियांवर ठेवले आहेत. मी आजारी राहावे म्हणून माझ्या वडिलांनी मला कसलीतरी औषधं दिली, असा आरोप अंजली यांनी केला आहे.
मोठ्या मुश्किलीनं पोलिसांचा नंबर मिळवून अंजली यांनी आपल्याच घरातून सुटका करून घेतली आणि घरातून बाहेर राहू द्यावे अशी विनंती कोर्टाला केली. त्यांनी घरच्यांबरोबरच हिंदू संघटना आणि पोलीस अधिकाऱ्यांवर छळ केल्याचे आरोप केले आहेत.
कोर्टाकडून अंजली आणि इब्राहिम यांच्या पक्षात निर्णय आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जी लढाई दिली आहे त्यात त्यांना यश प्राप्त झालं आहे.