सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा - प्रविण दरेकर

वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त टीव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.
 
वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
 
"एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसंच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी," अशीसुद्धा त्यांनी मागणी केली आहे.
 
दुसरीकडे बीबीसी मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं आहे.
 
"मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर यावर निर्णय होईल, मला कुठल्याही राजीनाम्याची माहिती नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
राजीनाम्यासाठी दबाव
पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात संजय राठोड याचं नाव भाजपकडून घेण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव असल्याच्या चर्चा आहेत.
 
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असं उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
 
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
 
"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.
 
सध्या संजय राठोड नॉटरिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी या मुद्द्यावर कुठलंही भाष्य अजून केलेलं नाही.
 
"यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय. असंही होता कामा नये आणि कोणावर अन्यायही होता कामा नये," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल."
 
संजय राठोड कोण आहेत?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
 
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
 
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
 
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.
 
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
 
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
 
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.
 
'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'
संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.
 
राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."
 
पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.
संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.
 
ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली. "