गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (19:07 IST)

बिप्लब देव : श्रीलंका आणि नेपाळमध्येही सरकार स्थापनेची अमित शाहांची योजना

भाजप केवळ देशातच विस्तार करत नाहीये, तर शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. अमित शाह यांची श्रीलंका आणि नेपाळमध्ये सरकार बनविण्याची योजना आहे, असं वक्तव्यं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केलं आहे.
त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं भाजपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी हे विधान केलं.
बिप्लब देब यांनी एका सभेत बोलताना हे विधान केलं. "2018 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अमित शाह यांच्यासोबत अतिथीगृहात बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाचे नेते अजय जामवाल यांनी म्हटलं की, भाजपनं अनेक राज्यांत सरकार स्थापन केली आहेत. त्यावर अमित शाह यांनी म्हटलं की, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत."
आपण आपल्या पक्षाचा विस्तार शेजारी देशात करून तिथेही सरकार स्थापन करू, असं अमित शाहांनी सांगितल्याचंही बिप्लब देब यांनी म्हटलं.
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना दणदणीत पराभव स्वीकारावा लागेल तसंच केरळमध्येही भाजप सरकार स्थापन करेल, असंही बिप्लब देब यांनी म्हटलं.
 
बिप्लब देब यांनी अमित शाह यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. त्यांच्या नेतृत्वात भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनल्याचंही देब यांनी म्हटलं.
 
विरोधकांनी बिप्लब देब यांच्या विधानावर भाजप नेतृत्वानं स्पष्टीकरण द्यावं, असं म्हटलं आहे. सीपीआय (एम) चे नेते आणि माजी खासदार जितेंद्र चौधरी यांनी बिप्लब देब यांच्यावर टीका करताना म्हटलं की, त्यांना लोकशाही आणि घटनेचं आकलन नाहीये. चौधरी यांनी पुढे असंही म्हटलं की, देब यांनी दावा केल्याप्रमाणे अमित शाह यांनी वक्तव्य केलं असेल तर तो भारतानं अन्य देशातील अंतर्गत पक्षांमध्ये हस्तक्षेप करण्यासारखं आहे.
 
बिप्लब देव यांची काही वादग्रस्तं विधानं
बिप्लब देब यांनी याआधीही अशाच प्रकारची काही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. महाभारताच्या काळातही देशात इंटरनेट आणि सॅटेलाइटसारख्या सुविधा होत्या, असं बिप्लब देब यांनी म्हटलं होतं.
 
हस्तिनापुरात बसून संजय धृतराष्ट्राला कुरूक्षेत्रावरील युद्धाचा वृत्तांत देत होता. इंटरनेट, सॅटेलाइटसारख्या सुविधांमुळेच हे शक्य झालं असावं असंही बिप्लब देब यांनी म्हटलं.
एकदा त्यांनी युवकांना गाय पाळावी असाही सल्ला दिला होता.

सरकारी नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा तरूणांनी पानपट्टी टाकावं असंही एकदा बिप्लब देब यांनी म्हटलं होतं. देशातले तरूण सरकारी नोकरीच्या नादाने राजकीय पक्षांच्या मागे पळतात. आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ वाया घालवण्यापेक्षा पानाचं दुकान टाकलं तर किमान आर्थिक प्राप्ती तरी होईल, असं देब यांनी म्हटलं होतं.
 
गौतम बुद्धांनी अनवाणी पायांनी जपान, म्यानमार, तिबेटचा प्रवास केला होता, असं वक्तव्य देब यांनी केल्याचं वृत्त टेलिग्राफनं दिलं होतं. कोलकत्यामधील प्रेसिडन्सी कॉलेजमधील माजी प्राध्यापक सुभाष रंजन यांनी गौतम बुद्ध या देशांमध्ये कधीही गेले नसल्याचं म्हटलं होतं.