मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:34 IST)

गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून घरचा आहेर, शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून समज

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्यानंतर भाजपनेच आता पडळकर यांचे कान टोचले आहेत.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सभ्य भाषेत बोलण्याची समज दिली आहे.  
ते म्हणाले, "यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समजावलं होतं. आताही आम्ही जाहीरपणे सांगत आहोत. जे बोलायचं ते नीट आणि योग्य भाषेत बोलायला हवे."
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि पडळकर यांच्यातही जोरदार वाद रंगलाय. "चोरासारखे धंदे बंद करा. शरद पवार यांची बरोबरी करण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील," अशी टीका मिटकरी यांनी केली.
 
अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. पण त्यापूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी जाऊन पुतळ्याचे अनावरण केलं.
"या पुतळ्याचं अनावरण चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हावं अशी आमची इच्छा होती. पण शरद पवार यांचे विचार आणि वागणं हे अहिल्यादेवींच्या उलट आहे," अशी टीका पडळकर यांनी केली होती.