शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (19:57 IST)

IndvsEng : रोहित शर्माची दीड शतकी खेळी, अजिंक्य रहाणेच्या साथीने डाव सावरला

रोहित शर्माचं शतक आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईतल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सहा बाद 300 धावांची मजल मारली.
 
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऋषभ पंत 33 तर अक्षर पटेल 5 धावांवर खेळत होता.
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सामन्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळत असल्यानं पंधरा हजार चाहते एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये जमा झाले होते. रोहितनं त्यांना अजिबात निराश केलं नाही. त्यानं 161 धावांची खेळी रचून भारताच्या डावाची भक्कम पायाभरणी केली.

खरं तर चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं पहिली टेस्ट जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया चांगला प्रतिकार करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती.
 
पण शुभमन गिल आणि विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानं भारतीय संघ सुरुवातीला संकटात सापडला होता. रोहितनं आधी चेतेश्वर पुजारा आणि मग अजिंक्य रहाणेसह भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.
 
विराट कोहलीचा भोपळा
या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण इंग्लंडचा सलामीवीर ओली स्टोननं दिवसाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला शून्यावरच पायचीत केलं.
 
पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेतेश्वर पुजाराला सोबत घेऊन रोहित शर्मानं 85 धावांची भागीदारी रचली.
 
मात्र पुजारा 21 धावांवर बाद झाला आणि पुढच्याच षटकात पाठोपाठ पुढच्या ओव्हरमध्ये मोईन अलीनं विराट कोहलीचा शून्यावर त्रिफळा उडवला तेव्हा स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. कोहलीलाही आपण बाद झालो यावर क्षणभर विश्वास बसला नाही. संपूर्ण कारकीर्दीत विराट भोपळाही न फोडता माघारी परतण्याची ही अकरावीच वेळ आहे.
 
विराट बाद झाल्यानं भारतीय टीम 2 बाद 86 असा संकटात सापडली. तेव्हा अजिंक्य रहाणे रोहितच्या मदतीला धावून आला.
 
अजिंक्यची रोहितला साथ
रोहित आणि अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी रचली.
 
रोहित बाद झाला, तोवर त्यानं 231 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 2 षटकारांसह 161 धावांची खेळी रचली होती. त्यानं 130 चेंडूंमध्येच शतकाची वेस ओलांडली आणि कारकीर्दीतलं सातवं कसोटी शतक साजरं केलं.
 
रोहितनं टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध शतक साजरं केलं. त्यानं याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन, वेस्ट इंडीजविरुद्ध दोन आणि श्रीलंकेविरुद्ध एक कसोटी शतक झळकावलं होतं.
 
दुसरीकडे अजिंक्य रहाणेनं 149 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 67 धावांची खेळी रचली. तर रविचंद्रन अश्विन 13 धावांवर बाद झाला.
 
इंग्लंडकडून जॅक लीच आणि मोईन अलीनं प्रत्येकी दोन तर ऑली स्टोन आणि जो रूटनं प्रत्येकी एक विकेट काढली
 
प्रेक्षकांना मैदानात प्रवेश
या सामन्याकडे क्रिकेट चाहते खास लक्ष ठेवून आहेत कारण लॉकडाऊननंतर भारतात पहिल्यांदाच प्रेक्षकांना मोठ्या स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला.
 
पहिल्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी चेपॉक परिसरातल्या या स्टेडियमबाहेर प्रेक्षकांनी तिकिटासाठी रांगा लावल्या होत्या. ऑनलाईन तिकिटनोंदणी असूनही सकाळी झुंबड उडालेली पाहायला मिळाली.
स्टेडियममध्ये नेमहीच्या क्षमतेपेक्षा निम्म्या म्हणजे 15 हजार प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केलं होतं. तसंच मास्क लावणं आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य करण्यात आलं आहे.
 
दरम्यान चेन्नई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या कोव्हिडचे 1572 रुग्ण उपचार घेत आहेत.
 
चेन्नई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार शहरात सध्या कोव्हिडचे 1572 रुग्ण उपचार घेत आहेत.