शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (19:13 IST)

सियाचिन : जगातल्या सर्वात धोकादायक युद्धभूमीवर भारतीय सैन्यानं गाजवलेल्या पराक्रमाची कहाणी

रेहान फजल
बीबीसी प्रतिनिधी
रशियातला टुंड्रा प्रदेश जगातली सर्वात धोकादायक युद्धभूमी मानली जाते.
1942 सालच्या हिवाळ्यात स्टालिनग्राडमध्ये रशियन सैन्याने हिटलरच्या सैन्याचा पराभव केला आणि दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी मिळाली.
 
बर्फाच्छादित स्कर्दू आणि गिलगिटमध्ये पाकिस्तानी टोळ्यांविरोधात मेजर जनरल थिमैय्या यांच्या 19 इंफंट्री डिव्हिजनने 1948 साली दिलेला लढा शौर्य आणि पराक्रमाचं मूर्तीमंत उदाहरण आहे.
मात्र, या सगळ्या लढाया सियाचिनमध्ये गेल्या 36 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षासमोर काहीच नाहीत. कारण या भागात युद्ध करणं तर सोडाच एक श्वास घेणंसुद्धा पराक्रमापेक्षा कमी नाही.
 
13 एप्रिल 1983 चा दिवस होता. वेळ पहाटे साडे पाच वाजताची. कॅप्टन संजय कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन 'चिता' हेलिकॉप्टर बेस कॅम्पवरून रवाना झालं.
या हेलिकॉप्टरच्या मागे आणखी दोन हेलिकॉप्टर्स होती. दुपारपर्यंत स्क्वाड्रन लीडर सुरिंदर बैंस आणि रोहित राय यांनी अशी 17 उड्डाणं केली. कॅप्टन संजय कुलकर्णी यांच्यासोबत एक जेसीओ आणि 27 भारतीय जवानांना सियाचीनच्या बिलाफोन्डलाजवळ हेलिकॉप्टरमधून खाली उतरवण्यात आलं.
 
'Beyond N J 9842 - The Siachen Saga' या पुस्तकात लेखक नितीन गोखले लिहितात, "लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेल्या संजय कुलकर्णी यांनी मला सांगितलं होतं - जमिनीपासून काही फूट उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून सकाळी सहा वाजता आमच्यापैकी चौघांनी खाली उड्या मारल्या."
 
"मला आठवतं खालचा बर्फ किती खोल आणि मजबूत आहे, हे तपासण्यासाठी मी 25 किलो वजनाचं पिठाचं पोतं खाली टाकलं. त्यावरून खालचा बर्फ बऱ्यापैकी टणक असल्याचं आम्हाला कळलं."
 
"खाली उड्या मारल्यानतंर आम्ही त्या ठिकाणी एक तात्पुरता हेलिपॅड तयार केला. हेलिकॉप्टर अर्धा मिनिट या बर्फावर उतरू शकेल, अशी व्यवस्था आम्ही केली. त्या दिवसाचा अविस्मरणीय किस्सा म्हणजे त्या दिवशी व्हिजिबिलिटी शून्याहूनही कमी होती आणि तापमान होतं उणे 30 अंश सेल्सियस."
 
उतरताच एका जवानाचा मृत्यू
बिलाफोन्डलाला हेलिकॉप्टरमधून खाली उतरण्याच्या तीन तासातच रेडियो ऑपरेटर मंडल यांना अत्यंत उंचावर होणारा 'हेप' आजार झाला. त्यांचा मृत्यू झाला.
 
मात्र, या मृत्यूचा भारतीय सैन्याला एक प्रकारे फायदाच झाला. रेडियो ऑपरेटरच नसल्याने रेडियोने काम केलं नाही आणि त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय जवान तिथे आहेत, याचा जराही सुगावा लागला नाही.
 
बिलाफोन्‍डलाला उतरल्यानंतर थोड्याच वेळात बर्फाचं मोठं वादळ आलं आणि त्यामुळे कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला.
 
नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'Full Spectrum India's Wars 1972-2020' या पुस्तकात एअर व्हॉईस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम लिहितात, "16 एप्रिलला वातावरण स्वच्छ झालं आणि तेव्हा कुठे अधिक जवान आणि वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. मात्र, तोवर एका जवानाचा मृत्यू झाला होता आणि उर्वरित 27 पैकी 21 जवानांना 'फ्रॉस्ट बाईट' म्हणजेच 'शीतदंश' झाला होता."
 
पाकिस्तानने बर्फात घालायचे विशेष कपडे जर्मनीहून मागवले
सियाचिनमधल्या या युद्धावर ब्रूकिंग्ज इन्स्टिट्युशनचे सीनिअर फेलो स्टीफन कोहेन यांनी केलेलं वक्तव्य बरंच गाजलं.
 
ते म्हणाले होते, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षाची तुलना टक्कल पडलेल्या दोन अशा व्यक्तींशी करता येईल जे एकाच कंगव्यासाठी भांडत आहेत."
 
जवळपास 23 हजार फूट उंचावर 75 किमी लांब आणि जवळपास 10 हजार चौरस किमी परिसरात पसरलेल्या सियाचिन ग्लेशियरचा भाग इतका दुर्गम आहे की 1972 सालापर्यंत भारत आणि पाकिस्तान दोघांनीही या भागातल्या सीमेविषयी स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं.
 
70 च्या दशकात काही अमेरिकी कागदपत्रांमध्ये NJ 9842 पासून पुढचा काराकोरम रेंजचा परिसर पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आणि इथेच भारताचं डोकं ठणकलं.
 
या भागावर दावा मजबूत करण्यासाठी पाकिस्तान पाश्चिमात्य गिर्यारोहकांनाही इथे पाठवत असल्याचं भारताला कळलं. 80 च्या दशकात उंच भागात सहज वावरता येईल, असे कपडे पाकिस्तान जर्मनीकडून खरेदी करत असल्याची माहिती रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेला मिळाली.
 
रॉचे प्रमुख म्हणून काम केलेले विक्रम सूद त्याकाळी श्रीनगरमध्ये तैनात होते. त्यांनी स्वतः 15 कोरच्या बादामी बागेत असेलल्या मुख्यालयात जाऊन तिथले कमांडर लेफ्टनंट जनरल पी. एन. हून यांना पाकिस्तानच्या कारवायांची माहिती दिली होती. पाकिस्तान हे कपडे खरेदी करतोय ते पिकनिकसाठी नव्हे, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
अर्जुन सुब्रमण्यम पुढे लिहितात, "भारतीय जवान सियाचिनमध्ये उतरत असताना पाकिस्तानचे जनरल जिया उल हक स्कर्दूमध्ये बुरजिल फोर्स या बटालियनला सियाचिनमध्ये राहण्याचं प्रशिक्षण देत होते. एप्रिल किंवा मे महिन्यात ही बटालीयन सियाचिनला तैनात करण्याची योजना होती. मात्र, भारतीय जवान त्याआधीच पोहोचले. बुरजिल फोर्सने 25 एप्रिल 1984 रोजी पहिल्यांदा हल्ला चढवला. मात्र, भारतीय जवानांनी हा हल्ला परतवून लावला."
 
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेश मुशर्रफ हेदेखील त्यावेळी तिथेच तैनात होते. 'In The Line Of Fire' या आपल्या आत्मकथेत ते लिहितात, "मार्चमध्ये तिथे जाण्यात यावं, असा सल्ला मी दिला. मात्र, दुर्गम भाग आणि खराब हवामानाचं कारण देत उत्तरेकडचे जनरल ऑफिसर कमांडिंगने माझ्या सल्लाचा विरोध केला. 1 मे रोजी तिथे जावं, असा सल्ला त्यांनी दिला. ते कमांडर असल्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन करण्यात आलं आणि इथेच आमचं चुकलं. आम्ही पोहोचलो तेव्हा भारतीय जवानांनी आधीच उंच भागावर कब्जा केला होता."
 
दोन आठवडे जवानाचं पार्थिव बर्फातच
सियाचिनच्या बर्फाच्छादित डोंगरावर पोस्ट उभारण्यापेक्षा तिथल्या उणे 30-40 अंश तापमानात टिकून राहणं, जास्त अवघड होतं आणि त्याहूनही अधिक कठीण होतं मृत्यू झालेल्या जवानांचे पार्थिव खाली नेणं. 90 च्या दशकात सोनम सॅडिलवर HAPE आजारामुळे एका गोरखा जवानाचा मृत्यू झाला होता.
 
त्याचं पार्थिव बेस कॅम्पवर नेण्यासाठी हेलिपॅडपर्यंत आणण्यात आलं. मात्र, काही अत्यावश्यक सामुग्री पोहोचवायची असल्याने पायलट त्याकामात होते. त्यामुळे जवानाचं पार्थिव संध्याकाळीच खाली नेता येईल, असं त्यांनी सांगितलं.
 
नितीन गोखले आपल्या 'Beyond N J 9842 - The Siachen Saga' या आपल्या पुस्तकात सांगतात, "संध्याकाळी इंधन संपल्याने पार्थिव दुसऱ्या दिवशी नेऊ, असं पायलटने सांगितलं. दुसऱ्या दिवशी आणखी काही महत्त्वाचं काम आलं. अशाप्रकारे त्या जवानाचं पार्थिक खाली न्यायला दोन आठवडे लागले. गोरखा रोज जवानाचं पार्थिव हेलिपॅडपर्यंत न्यायचे. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याने ते पुन्हा परत आणायचे."
 
तब्बल 20 दिवस सहकारी जवानाचं पार्थिव बंकरमध्ये सोबत ठेवल्यामुळे या जवानांना मतिभ्रम झाला. ते त्या पार्थिवाशी असं वागायचे जणू तो जवान जिवंत आहे. ते त्याचं जेवणही वेगळं ठेवायचे. अधिकाऱ्यांना हे कळल्यावर त्यांनी पार्थिवाला P-1 म्हणजे प्रेफरन्स-1 घोषित केलं. प्राधान्यक्रम यादीत पार्थिवाचा नंबर लागल्याने अखेर ते पार्थिव खाली नेण्यात आलं.
 
पार्थिव थिजल्याने अडचण
सियाचिनच्या त्या सर्वोच्च युद्धभूमीत मृत्यू झालेल्या जवानांचे पार्थिव खाली नेणाऱ्या पायटल्सचीही आपापली कहाणी आहे. बरेचदा पार्थिव खाली उतरवण्यात उशीर होत असल्याने पार्थिव थिजायचे. चेतक हेलिकॉप्टर्समध्ये एकच पार्थिव ठेवण्याची जागा असते. अनेकदा तर जवानांना मृत्यू झालेल्या आपल्या सहकारी जवानांची हाड मोडून त्यांना स्लिपिंग बॅगमध्ये भरून हेलिकॉप्टरमध्ये ठेवावं लागलं.
 
ब्रिगेडियर आर. ई. विलियम्स यांनी 'The Long Road to Siachen : The Question WHY' हे पुस्तक लिहिलं आहे. यात ते लिहितात, "जखमी जवानांना हेलिकॉप्टरने खाली आणणं सोपं होतं. मात्र, मृत जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने खाली उतरवणं तेवढंच कठीण होतं. बरेचदा आम्हाला अत्यंत अमानुष पद्धतीने पार्थिवाला दोरीने बांधून खाली ढकलावं लागे. मात्र, याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. कारण अनेक दिवस पार्थिव बर्फात राहिल्यामुळे दगडासारखे टणक व्हायचे."
 
बर्फात अडकले
लेफ्टनंट कर्नल सागर पटवर्धन 1993-94 साली युनिट 6 जाटच्या जवानांसोबत सियाचिनमध्ये तैनात होते. एकदा लघुशंकेसाठी ते तंबूबाहेर पडले आणि नुकत्याच पडलेल्या बर्फात कमरेपर्यंत अडकले.
 
पटवर्धन सांगतात, "मी त्या बर्फातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना माझा बूट एका छिद्रात अडकला. मी बराच प्रयत्न करून पाय बुटात टाकला. पण तोवर बुटात बर्फ भरला होता. मी खरंतर माझ्या टेंटपासून फक्त 10 मीटर अंतरावर होतो. पण, ओरडूनही उपयोग नव्हता. कारण जोरात वारं वाहत असल्याने माझा आवाज टेंटपर्यंत पोहोचलाच नसता. शेवटी कसाबसा मी टेंटपर्यंत पोहोचलो आणि मदतीसाठी हाक मारली.
 
मला लगेच स्लिपिंग बॅगमध्ये झोपवण्यात आलं आणि माझं शरीर उबदार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. बर्फाच्या संपर्कात आलेल्या पायाला वाचवणं, हे पहिलं प्राधान्य होतं. सहकाऱ्यांनी स्टोव्ह पेटवून बर्फ वितळवायला सुरुवात केली. मी ताबडतोब माझे ओले मोजे काढले आणि तळपाय घासायला सुरुवात केली. तब्बल तीन तासांनंतर मी नॉर्मल झालो."
 
स्वयंपाक बनवण्यात अडचण
सियाचिनमध्ये तैनात 2 बिहार बटालीयनचे शिपाई राजीव कुमार यांनी नितीन गोखलेंना सांगितलं, "तिथे स्वयंपाक बनवणं सर्वात कठीण काम आहे. साधा भात शिजवण्यासाठी कुकरच्या 21 शिट्ट्या घ्याव्या लागायच्या."
 
जवानांसाठी लष्कराकडून हाय प्रोटीन डाएट दिलं जातं. मात्र, सियाचिनमध्ये एवढ्या उंचीवर भूकच लागत नसल्याने कुणीही हा आहार खात नाही. बहुतांश जवानांच्या कातडीचा रंग काळा पडतो. अनेकांना झोप येत नाही. एवढ्या उंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झोपयेत नसल्याचं डॉक्टर सांगतात.
 
सामान्यपणे सियाचिनमध्ये तैनात जवानांना आयात केलेले गरम मोज्यांचे 9 जोड दिले जातात. जे जवान हे मोजे वापरत नाही त्यांना बराच त्रास होतो.
 
सियाचिनमध्ये कमांडर म्हणून काम केलेले लेफ्टनंट जनरल पी. सी. कटोच सांगतात, "एकदा मी सेंट्रल ग्लेशियरमधल्या एका चौकीत थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी मला पुढच्या चौकीवर जायचं होतं. सूर्य उगवायच्या तासभर आधी मी चालायला सुरुवात केली. प्रवासाचा पहिला टप्पा स्नो स्कूटरने पार केला. माझा मूर्खपणा झाला आणि बर्फाच्या हवेपासून कानाचं संरक्षण करण्यासाठी मी लोकरीची कानटोपी घातली. काही वेळानंतर मला कानच नसल्याचं मला वाटलं. संध्याकाळपर्यंत मी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पला पोहोचलो. तोवर माझ्या दोन्ही कानांना 'फ्रॉस्ट बाईट' (शीतदंश) झाला होता. पुढचा महिनाभर मला झोपताना कुशीवर वळता येत नव्हतं, एवढा त्रास मला होता."
 
पाकिस्तानी पोस्टला आग
2 बिहार बटालियनमधले एक अधिकारी कॅप्टन भरत यांनी नितीन गोखलेंना सांगितलं, "आमच्या पहलवान पोस्टपासून अगदी 300 मीटर अंतरावर पाकिस्तानची पोस्ट होती. एक दिवस त्यांच्या तंबूला आग लागली आणि काही मिनिटातच त्या चौकीची राख झाली. आमची पोस्ट त्यांच्या अगदी जवळ असल्याने मदतीला येऊ का म्हणून विचारलं. मात्र, त्यांनी आमची मदत घ्यायला नकार दिला.
 
मात्र, मी इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या चौकीवर आपली हेलिकॉप्टर्स जवळपास रोजच यायची. मात्र, मी तिथे 110 दिवस होतो. या 110 दिवसात त्यांच्या चौकीवर त्यांची हेलिकॉप्टर्स फक्त दोनदा आली. आपल्याकडे आणि त्यांच्याकडे देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं."
 
फुफ्फुस आणि मेंदूत पाणी
काश्मीरमध्ये कमांडर म्हणून काम केलेले जनरल अता हैसनन सांगतात, "बाना चौकीवर तयार करण्यात आलेला बर्फाचा पलंग तीन टायरच्या डब्यांच्या उंचीचा असेल. त्यावर तिथे तैनात एकमात्र शिपाई आणि एक अधिकारी एकमेकांच्या पायावर पाय ठेवून झोपायचे. सर्वात आधी अधिकारी शिपायाच्या पायावर पाय ठेवून झोपायचे. थोड्या वेळाने शिपायी अधिकाऱ्याला म्हणायचा - सर आता पुरे झालं. आता जास्त वजन होतंय. थोड्या वेळासाठी मी पाय वर ठेवतो."
 
सियाचिन ग्लेशिअरवर ऑक्सिजनची कमतरता, अत्याधिक थंडी, अतिनील किरणं (अल्ट्रा व्हायोलेट रेज) यांचा सामना तर करावा लागतोच. मात्र, त्याशिवाय तिथे अत्यंत कमी आर्द्रता असते. याचाही शरीरावर मोठा परिणाम होत असतो. याशिवाय, सियाचिन ग्लेशियरवर जवानांना दीर्घकाळ एकट्याने घालवावा लागतो. जेवणही डबाबंद असतं. प्यायला स्वच्छ पाणी मिळवण्यासाठीही बरेच परिश्रम घ्यावे लागतात. तंबूत वीजही नसते आणि याउपर शत्रूंच्या हल्ल्याची भीती. ही सगळी परिस्थिती जवानांची कसोटी बघणारी ठरते.
 
सियाचिनच्या उंचीवर एका सुदृढ जवानाच्या फुफ्फुसातल्या ऑक्सिजनची पातळी समुद्र सपाटीवर रहाणाऱ्या फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीएवढी असते. सियाचिनमध्ये सर्वात जास्त त्रास हा फुफ्फुसात आणि मेंदूत पाणी जमा होण्याचा होतो.
 
एकेकाळी सियाचिनमध्ये 100 पैकी 15 जवानांना हेप आजार व्हायचा. मात्र, डॉक्टरांच्या परिश्रमामुळे आज 100 पैकी फक्त एका व्यक्तीला हा आजार होतो.
 
कारगिल युद्धापेक्षाही जास्त मृत्यू सियाचिनमध्ये
 
सियाचिनमध्ये आजही आपल्या जवानांचा मृत्यू होतो. मात्र, हे मृत्यू बहुतांश दुर्घटनेत होतात. सियाचिनहून परतल्यानंतर जवानांचं वजन खूप कमी झालेलं असतं. त्यांना खूप झोप येते. विसरभोळेपणा वाढतो आणि कामेच्छाही कमी होते.
 
एका अंदाजानुसार भारत सरकार जगातली सर्वात उंचावरची युद्ध भूमी असलेल्या सियाचिनमध्ये रोज 6 कोटी म्हणजे वर्षाला 2190 कोटी रुपये खर्च करतं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी सियाचिनमध्ये 5000 जवान तैनात केले आहेत.
 
भारत सरकारने या जवानांसाठीचे खास कपडे आणि गिर्यारोहणासाठीच्या उपकरणांवर आतापर्यंत जवळपास 7500 कोटी रुपये खर्च केले आहेत. सियाचिनमधल्या तैनातीसाठी प्रत्येक जवानाला जो किट दिला जातो त्याची किंमत जवळपास 1 लाख रुपये इतकी असते. यात 28 हजार रुपये कपड्यांसाठी, 13 हजार रुपये स्लिपिंग बॅग, 14 हजार रुपये ग्लोव्ह्ज आणि साडे बारा हजार रुपये बुटांवर खर्च होतात.
 
1984 पासून आतापर्यंत भारताच्या जवळपास 869 जवानांचा सियाचिनमध्ये मृत्यू झाला आहे. कारगिल युद्धात मृत्यू झालेल्या जवानांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. यातले 97% जवानांचा पाकिस्तानशी झालेल्या युद्धात नव्हे तर खराब वातावरणामुळे मृत्यू झाला आहे.