शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (18:25 IST)

राहुल गांधीः पंतप्रधान भित्रे आहेत म्हणून चीनसमोर कणखरपणे उभे राहू शकत नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या करारावरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की पंतप्रधान भित्रे आहेत म्हणून चीनसमोर कणखरपणे उभे राहू शकत नाहीत.
 
गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभा आणि लोकसभेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल झालेल्या कराराबदद्ल भाष्य केलं होतं.
 
राजनाथ सिंह यांनी म्हटलं, " मला सभागृहाला हे सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की आपला दृढ निश्चय आणि दीर्घकालीन चर्चेचा परिणाम म्हणून चीनबरोबर पँगोंग नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यांवरून सैन्याने मागे हटण्याचा करार झालेला आहे."

याला प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी म्हटलं की, "सीमेवर एप्रिलच्या आधी जी परिस्थिती होती ती पूर्ववत व्हायला पाहिजे ही भारत सरकारची भूमिका असायला हवी होती. आता भारतीय सैन्य फिंगर 4 ला येणार असल्याचं सांगितलं जातंय. पण फिंगर 3 हाही भारताचा भाग आहे. (माझा) पहिलाच प्रश्न हा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुस्तानची पवित्र जमीन चीनच्या स्वाधीन केली."

"नरेंद्र मोदींनी चीनसमोर मान झुकवली आहे. आपली जमीन फिंगर 4 पर्यंत आहे पण पंतप्रधान मोदींनी फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंतची जमीन चीनला देऊन टाकली आहे. डेपसांग व्युहरचनात्मक भाग आहे.
 
चीन इथवर घुसलाय पण संरक्षण मंत्र्यांनी याबद्दल चकार शब्द काढला नाही. नरेंद्र मोदींनी आपली पवित्र जमीन चीनला दिली हेच सत्य आहे. याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. आता पुढे काय करायचं, काय पावलं उचलायची हा त्यांचा प्रश्न आहे," असंही ते पुढे म्हणाले.

गुरुवारी, 11 फेब्रुवारीला राजनाथ सिंह यांनी संसदेत म्हटलं होतं की, "चीन आपल्या सैन्याला उत्तर किनाऱ्यावर फिंगर 8 च्या पूर्वेला ठेवेल. याचप्रकारे भारत आपल्या सैन्याला फिंगर 3 च्या जवळ असलेलं कायम ठाणं, चौकी धन सिंह थापावर ठेवेल.

याचप्रकारे दक्षिण किनाऱ्यावरही दोन्ही पक्षांद्वारे पावलं उचलली जातील. परस्पर सहमतीने दोन्ही पावलं उचलली जातील आणि जी बांधकामं दोन्ही पक्षांनी एप्रिल 2020 नंतर दोन्ही किनाऱ्यांवर केली आहेत ती हटवण्यात येतील."