सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (19:02 IST)

संजय राठोड कोण आहेत? ते सध्या चर्चेत का आहेत?

साभार -फेसबुक
नीतेश राऊत
बीबीसी मराठी
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल."
 
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
 
या आरोपांबद्दल संजय राठोड यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला होता. पण त्यांचा फोन नॉट रिचेबल होता.
 
संजय राठोड कोण आहेत? त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
 
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
 
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
 
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.
 
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
 
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.
 
'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'
संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.
 
राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."
 
पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.
संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.
 
ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली. "