चित्रा वाघ : शरद पवार माझा बापच आहे, आज त्यांची आठवण येतेय
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या चालवत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.
चित्रा वाघ यांनी यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांनी कारवाई करावी असं त्या म्हणाल्या आहेत.
उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री नसते तर त्यांनी संजय राठोडला फाडून खाल्ल असतं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
त्यांच्या पतीवर झालेले लाच घेतल्याचे आरोप आणि त्या प्रकरणी आता दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या,
"एफआयआरची कॉपी माझ्या घरी पाठवायला तुमच्याकडची माणसं संपली आहेत का. माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला. तो त्या ठिकाणी नव्हता. आता जनतेला कळू द्या की खरं काय आहे ते," असं आव्हान चित्रा वाघ यांनी दिलं आहे.
"आज मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. 2017 मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी एफआयआरची कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावच नाहीये."
"त्या केसमध्ये त्यांना चित्रा वाघ यांना अडकवायचं होतं. त्यांनी मुंबई बँकेला पत्र पाठवलं. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या 30 लाखांच्या लोनची माहिती द्या. जे कर्ज मी घेतलंच नाही त्याची माहिती मागितली होती."
"लोकांवरील 2011 पासूनच्या केसेस एसीबीकडे पेडिंग आहेत, त्यांच काय झालं? या केसमधल्या मुख्य आरोपी डॉ. गजानन भगतची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केला. मी न्यायालयात लढेन. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघांना दिली जात आहे."
"मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी रोज बोलणार. जोपर्यंत संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही."
ही तक्रार आम्ही स्यू मोटोमध्ये घेऊ शकत नाही असं पोलिसांनी लिहून द्यावं मग पुढे पाहाते असं आव्हान सुद्धा चित्रा वाघ यांनी दिलं आहेत - पूजा चव्हाण प्रकरण : पोलीस स्वतःहून म्हणजेच स्यू मोटो गुन्हा कधी दाखल करू शकतात?
पूजा आणि त्यांचा परिवाराच्या बदनामीचा कुठलाही हेतू नाहीये, गुन्हेगाराला जात नसते, असं चित्रा वाघ पुढे म्हणाल्यात.