शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (17:34 IST)

कोरोना व्हायरसः अमरावतीत लॉकडाऊन आणखी आठ दिवस वाढवला

मयांक भागवत, नितेश राऊत
बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती शहरात पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
8 मार्च 2021 पर्यंत अमरावतीत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अमरावती महापालिका, अचलपूर तसेच जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका नव्याने कंटेंमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणीही लॉकडाऊन राहणार आहे.
 
विदर्भात कोव्हिड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागलाय. मुंबई, पुणे या महानगरांना मागे टाकत अमरावती जिल्हा कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट बनलाय. दिवसागणिक अमरावतीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
 
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके बीबीसीशी बोलताना सांगतात, "अमरावतीत कोव्हिड-19 व्हायरसची पसरण्याची क्षमता (Transmission Capacity) वाढल्याचं दिसून आलंय."
पूर्व विदर्भातील या जिल्ह्यात कोव्हिड-19 चा संसर्ग पसरण्याचं नेमकं कारण काय? कोव्हिड-19 चा मोठ्या प्रमाणावर उद्रेक कोणत्या कारणांमुळे झाला? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
व्हायरसचं म्युटेशन कारणीभूत?
अमरावतीमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे म्युटेशन झालेला व्हायरस कारणीभूत आहे? यावर डॉ. साळुंके म्हणतात, "हे एक कारण असू शकतं. यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे."
 
दुसरीकडे, या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
 
अमरावतीमधील चार कोरोनाग्रस्त रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले होते.
 
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायलॉजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. राजेश कार्यकर्ते सांगतात, "या चार नमुन्यांमध्ये आम्हाला E484Q हे म्युटेशन आढळून आलं. हे एक एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील एंटीबॉडी याला कमी प्रमाणात ओळखतात."
 
"त्याचसोबत व्हायरसमध्ये D614G म्युटेशन झालेलं आढळून आलं. हे म्युटेशन जगभरात पहायला मिळालयं. हे एक फास्ट स्प्रेडिंग म्युटेशन आहे. पण, आपल्याकडे यूके, दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमधील म्युटेशन आढळून आलेलं नाही," असं डॉ. कार्यकर्ते पुढे म्हणाले.
 
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्हायरस आपली जनुकिय संरचना बदलतो. याला म्युटेशन म्हणतात. कोरोना व्हायरसचे जगभरात आत्तापर्यंत अनेक म्युटेशन आढळून आले आहेत.
 
डॉ. ऋषीकेश नागलकर सांगतात, "अमरावतीत 19 केसेसमध्ये म्युटेशन झाल्याचं आढळून आलंय. याला कोव्हिड-19 ची दुसरी लाट म्हणावं लागेल."
 
अमरावतीचा पॉझिटिव्हीटी रेट 48 टक्के
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
 
अमरावती जिल्ह्याचा (दैनंदिन) कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 48 टक्के आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एकूण तपासण्यांपैकी 48 टक्के लोकांना कोव्हिड-19 चा संसर्ग झालाय
तर आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय
'कोव्हिड-19 व्हायरसची परसण्याची क्षमता वाढली'
अमरावती जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागलीये.
 
राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके आरोग्य विभागाच्या टीमसोबत अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
 
डॉ. साळुंके सांगतात, अमरावतीत कोव्हिड-19 चा संसर्ग पसरण्याची तीन प्रमुख कारणं आहेत :
 
लोक कोरोना गायब झालाय असं समजून मास्क न घालता फिरतायत
व्हायरस आपलं रूप बदलतो. व्हायरसमध्ये झालेला बदल (Mutation) देखील एक कारण असू शकतं. यावर आम्ही अभ्यास करत आहोत
अमरावतीत कोरोना व्हायरसची पसरण्याची क्षमता (Transmission Capacity) वाढली आहे हे दिसून येतंय
तज्ज्ञांच्या मते, विदर्भात गेल्या काही दिवसात तापमानात बदल झालाय. उत्तरभारतातील थंडीच्या लाटेमुळे तापमान कमी झालंय. तापमानात 8 ते 10 अंशांचा फरक पहायला मिळतोय.
 
"वातावरण बदलाचा लाभ व्हायरस प्रसाराकरता झाला," असं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
 
कुटुंबच्या कुटुंब कोरोनाच्या विळख्यात
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका आणि अमरावती महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आढळून आली आहे.
 
डॉ. सुभाळ साळुंके पुढे सांगतात, "कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात कुटुंबातील 1-2 व्यक्ती पॉझिटिव्ह येत होत्या. पण, अमरावतीत कुटुंबच्या कुटुंब पॉझिटिव्ह आहेत. हा नवा ट्रेन्ड पहायला मिळतोय. ही अत्यंत चिंतेची बाब आहे."
 
'50 टक्के लोकांची कोरोना चाचणी पॉ़झिटिव्ह'
अमरावतीत कोरोना व्हायरसचा हा प्रसार शहर आणि जिल्ह्यातील काही पॉकेट्समध्ये दिसून आलाय.
 
डॉ. साळुंके पुढे सांगतात, "अमरावतीत काही भागात 50 टक्के लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आहे. असं झालेलं आपण कधीच ऐकलेलं नाही. सुदैवाने व्हायरसचा प्रसार काही भागापूरताच मर्यादीत आहे."
 
एकीकडे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 8.8 टक्क्यांवर पोहोचलाय.
 
का वाढले न्यूमोनियाचे रुग्ण?
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये न्यूमोनियाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.
 
अमरावतीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. ऋषीकेश नागलकर सांगतात, "विदर्भात थंडी वाढली आहे. गारपीट झाली. तापमानात बदल झाल्यामुळे अस्थमा आणि न्यूमोनियाचे रुग्ण वाढले आहेत."
 
अमरावतीत गेल्या काही दिवसात न्यूमोनियाचं प्रमाण वाढल्याचं डॉ. साळुंके सांगतात.
 
डॉ. सुभाष साळुंके म्हणतात, "अमरावती आणि अकोल्यात कोव्हिड-19 संसर्गामुळे न्यूमोनियाच्या घटनांमध्ये वाढ झालीये. कोरोनाग्रस्त रुग्णांना न्यूमोनिया लवकर होत असल्याचं आढळून आलंय."
 
'लोकांमधील कोरोनाची भीती संपली'
अमरावतीची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची कारणं काय, यासाठी आम्ही बीबीसी मराठीचे स्थानिक प्रतिनिधी नितेश राऊत यांना शहराची परिस्थिती विचारली. त्यांच्या माहितीनुसार,
 
लोकांच्या मनातून कोरोना व्हायरसची भीती गेलीये
लोक मास्कचा वापर करत नाहीत. प्रशासनाच याकडे दुर्लक्ष झालं
गर्दीवर नियंत्रणासाठी योग्य खबरदारी घेतली नाही
ग्रामपंचायत निवडणूक, नेत्यांचे दौरे, प्रचार, आंदोलनं यामध्ये मोठया प्रमाणावर गर्दी झाली
सरकारने घाललेले निर्बंध नागरीकांनी पाळले नाहीत
 
संसर्ग नियंत्रणासाठी काय करतंय प्रशासन?
जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने खालील गोष्टी केल्यात :
 
प्रत्येक आठवड्यात शनिवार रात्रीपासून से सोमवार सकाळपर्यंत शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
या दिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहातील अशी माहिती, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिलीये.
हॉटेल, आस्थापना रात्री 8 वाजता बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दुध आणि भाजीपाला दुकानं सकाळी 6 वाजेपासून 10 वाजेपर्यंत खुली रहातील
खासगी वाहतूक, पालिकेची बससेवा, रिक्षा बंद रहातील
या काळात जीम, व्यायामशाळा, चित्रपटगृह, सलून, ग्रंथालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय
अनावश्यक फिरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे
 
बीबीसीसी बोलताना डॉ. सुभाष साळुंके म्हणतात, "माझ्यामते आपल्याला 15 दिवसात या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं लागेल. तसं शक्य झालं नाही तर, मोठा विस्फोट होईल आणि हा संसर्ग राज्यभरात पसरेल."
 
अमरावतीत बेड्सची उपलब्धता
वाढणाऱ्या रुग्णसंख्येसाठी अमरावतीमध्ये बेड्सची उपलब्धता आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाला भेट दिली.
 
अमरावती जिल्ह्यात किती बेड्स कोरोनासाठी आहेत याची माहिती आम्हाला मिळाली. ती पुढिलप्रमाणे
 
आयसोलेशन बेड्स- 777
ऑक्सिजन बेड्स- 381
आयसीयू- 288
व्हॅन्टिलेटर्स- 109